नागपूर, दि. 20 : शहरांमध्ये काँक्रिटीकरणामुळे होणाऱ्या तापमानवाढीवर उपाययोजना म्हणून विकासकांकडून विकसित करण्यात येणाऱ्या प्लॉटमध्ये 30 टक्के जमीन ही क्राँक्रिटीकरण अथवा पार्कींगखाली न आणता मोकळी ठेवून तेथे उद्यानासाठी जागा ठेवावी अथवा तेथे झाडे लावावीत असा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विधानपरिषदेत दिली.
प्रदूषणाच्या अनुषंगाने सदस्य अनंत गाडगीळ यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते. श्री. कदम पुढे म्हणाले की, नवीन इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सोय करणे बंधनकारक केलेले आहे. मात्र जुन्या इमारतींमध्येही ही यंत्रणा करण्याच्या सूचना दिल्या जातील. वायू प्रदूषणाबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की, वायू प्रदूषण करणाऱ्या नव्याने शोध लागलेल्या पीएम-2.5 या सूक्ष्म कणांचे डिझेल गाड्यांतून होणारे उत्सर्जनाचे प्रमाण तपासण्यासाठी पर्यावरण विभागामार्फत परिवहन विभागाला कळविण्यात येईल. नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने नदी संवर्धन योजना हाती घेतली आहे. त्या माध्यमातून नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही ते म्हणाले.
पर्यावरण राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील म्हणाले की, प्रदूषण रोखण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. सध्या मुंबई व पुण्यामध्ये वायूप्रदूषण मोजण्यासाठी 25 मशीन लावण्याचे काम हाती घेतले असून आतापर्यंत 19 मशीन लावण्यात आल्या आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी शासनामार्फत सीएनजी, एलपीजीवर चालणाऱ्या वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येत आहे. येत्या काळात बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यात येईल. मुंबई मध्ये नीरी तसेच आयआयटीच्या सहयोगातून हवेतील धूर ओढून घेणाऱ्या मशीन तयार करण्यात आल्या असून त्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर चाचण्या सुरु आहेत, असेही ते म्हणाले.
या लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य सर्वश्री शरद रणपिसे, प्रविण दरेकर, अनिल भोसले यांनी सहभाग घेतला.
००००
No comments:
Post a Comment