v मेयोच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचा आढावा
v 12 व्हेंटीलेटरसाठी दीड कोटी रुपये
v क्षयरुग्णांसाठी एंडोब्रॉकीअल अल्ट्रा सोनोग्राफी
v आरोग्यासोबतच नातेवाईकांसाठी सुविधा
v बाळरोग व स्त्रीरोग विभागासाठी अत्याधुनिक साहित्य
नागपूर दि. 4 : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव साजरा करत असतांना वैद्यकीय महाविद्यालयात सर्वसामान्य जनतेला दर्जेदार व अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा यासाठी औषधशास्त्र विभागात 12 व्हेंटीलेटरर्स बसविण्यासाठी दीड कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच इतर विभागांमध्ये आवश्यक सुविधांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो)चा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येत असून यादृष्टीने आयोजनाबाबतची बैठक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी तेथील आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी आमदार विकास कुंभारे, आरोग्य उपसंचालक डॉ.संजू जयस्वाल, अभ्यागत मंडळाचे सदस्य उमेश शिंदे, सुभाष कोटेचा, श्रीमती गिता छाडी, असरफ पटेल, रविंद्र डोंगरे, विजय मोटघरे यांचेसह अधिष्ठाता डॉ. श्रीमती अनुराधा श्रीखंडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीमती संध्या मांजरेकर, डॉ.रवि चव्हाण आदी उपसिथत होते.
रुग्णालयात येणाऱ्या सर्व रुग्णांना वैद्यकीय उपचार तातडीने उपलब्ध होण्यासाठी विभागनिहाय आवश्यक असलेल्या सुविधांची माहिती घेतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सुवर्ण महोत्सवानिमित्त मेयोच्या आरोग्य सुविधेमध्ये जास्तीतजास्त कशी वाढ करता येईल यादृष्टीने विभाग प्रमुखांनी प्रस्ताव सादर करावेत. जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठान निधीतून पाच कोटी रुपयाचा निधी यासाठी देण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आवश्यक सुधारणा तसेच विभागांसाठी स्वतंत्र इमारतीसाठी बैठक घेऊन त्या सोडविण्यात येईल.
रुग्णालयाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असलेले बाळरोग शास्त्र विभागासाठी पीआयसीयुसह आवश्यक यंत्रसामुग्रीसाठी 25 लक्ष रुपये, व्हेंटीलेटरसाठी दीड कोटी रुपये, क्षयरोग व छातीशास्त्र विभागातील अल्ट्रासोनोग्राफी तसेच आवश्यक साहित्यासाठी एक कोटी 2 लक्ष रुपये, स्त्रीरोग व प्रसृती शास्त्र विभागातील अतिदक्षता विभागाकरिता दोन व्हेंटीलेटर, मॉनिटर व डिफ्रेबीलेटर करीता 30 लक्ष रुपये, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, शरीरक्रिया शास्त्र विभाग, ईएनटी, पीएसएम, नेत्रशास्त्र विभाग, त्वचा शास्त्र विभाग, विकृतीशास्त्र विभाग, रक्त पेढी, अस्थीव्यंगोपचार शास्त्र, कोलस्टोरेज व यंत्रसामुग्री तसेच बधीरीकरणशास्त्र विभागासाठी आवश्यक असणारे यंत्रसामुग्रीसाठी निधी देण्यात येणार असल्याचे यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
नर्सिंग विभागातील 70 रिक्त पदे भरण्याबाबत तसेच पाळणाघर सुरु करण्याबाबत आढावा घेतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महात्मा ज्योतिबा फुले, जन आरोग्य सेवेत ही रिफलेसमेंट, निरिफलेसमेंट व इतर शस्त्रक्रीयांचा अंतर्भाव करण्या संदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश यावेळी दिलेत.
प्रारंभी अधिष्ठाता श्रीमती अनुराधा श्रीखंडे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात महाविद्यालयामध्ये सुरु असलेल्या विविध विकास योजनांबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष निधीमधून 24 कोटी रुपये प्राप्त झाले असून याअंतर्गत झालेल्या कामांची माहिती दिली. सुवर्ण महोत्सवनिमित्त आयोजन समितीचे सचिव डॉ.रवि चव्हाण यांनी सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त तयारी संदर्भात माहिती दिली. तसेच डॉ.सचिन हिवसे यांनी विषयसूचीचे सादरीकरण केले.
रस्ते अपघातातील जखमींना भेट
रस्ते अपघातात झालेल्या जखमींना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रुग्णालयामध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच औषधोपचाराबद्दल माहिती घेतली. जखमींवर संपूर्ण औषधोपचार करण्याच्या सूचना यावेळी दिल्यात.
****


No comments:
Post a Comment