नागपूर दि. 4 : पेंच प्रकल्पावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यानुसार लाभ क्षेत्रात पिकांचे नियोजन करण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित कृषी अधिकाऱ्यांना दिले.
सिंचन भवन येथील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी आमदार सर्वश्री प्रा. अनिल सोले, डी. मल्लिकार्जून रेड्डी, सुधाकर कोहळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होते.
उपलब्ध जलसाठ्यानुसार पिकांच्या लागवडीसाठी कृषी विभागाद्वारे उपाययोजना कराव्यात. तसेच कमी पाण्यामध्ये येणाऱ्या पिकांचे शेतकऱ्यांनी उत्पादन घ्यावे. पेंच प्रकल्पामधील 2 लाख शेतकऱ्यांना पीक पद्धत बदलविण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करावे. त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
कृषी अधिकारी व कृषी सहाय्यकांनी प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्यक्ष भेटी देऊन कमी पाण्यामध्ये येणाऱ्या पिकाबाबत माहिती द्यावी व ती पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करावे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कामठी, मौदा, रामटेक, पारशिवनी, सावनेर या पाच तालुक्यामध्ये पाच डिजीटल मेळाव्यांचे आयोजन करण्यात येईल. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप व रब्बी पिकांचे नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
निम्न वेण्णा प्रकल्पांचा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतला. उपकालव्यांचे खोलीकरण व सिमेंटीकरण करण्यात येणार आहेत. त्याकरीता शासन सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. निम्न वेण्णा प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी उपाययोजना तयार असून त्याकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री.बावनकुळे यांनी बैठकी दरम्यान सांगितले.
कोरड्या राखेच्या उपयोगितेविषयी आंतरराष्ट्रीय परिषदेचे 15 ते 17 डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. याबाबत आवश्यक सहकार्य करण्यात येणार आहे.
मानेवाडा चौक ते दिघोरी चौकामधील सिमेंट रस्त्याच्या कामातील युटीलीटी स्थानांतरणाची कामे लवकरात लवकर पूर्ण करुन 31 मार्चपर्यंत संपूर्ण रस्त्याचे काम करण्याचे आदेश पालकमंत्री बावनकुळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
कामठी, मौदा व नागपूर ग्रामीण तालुक्यातील सिंचन विभागाच्या वापरात नसलेल्या शासकीय जमिनीवर नागपूर सुधार प्रन्यासद्वारे घरकुलासाठी जमीन राबविण्याबाबत बैठकीदरम्यान चर्चा करण्यात आली.
बिना या गावाचे पुनर्वसनाकरीता पर्यायी जमीन उपलब्ध करुन देण्याबाबत पालकमंत्री बावनकुळे यांनी जिल्हा पुनवर्सन अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
मोखेबर्डी उपसा सिंचन अंतर्गत भिवापूर तालुक्यातील सेलोटी, वाणी, पिपरडा (रिठी) गावच्या परिसरातील लाभ क्षेत्रातील सुटलेल्या भूभागात पाणी देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी बैठकी दरम्यान सांगितले.
जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या आढावा बैठकी दरम्यान दुग्ध व्यवसाय, मत्स्यव्यवसाय या योजना जनतेला लाभ देण्यात यावा. तसेच त्याकरीता आवश्यक मार्गदर्शन व सुविधा लाभार्थ्यांना पुरविण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment