Thursday, 21 December 2017

ठाणे शहर परिसरातील वाहतूक समस्या सोडविण्याबाबत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार -डॉ. रणजित पाटील

        नागपूर, दि. 21 : ठाणे शहरातील तसेच ठाणे-बेलापूर रस्ता कळवा, मुंब्रा व घोडबंदर परिसरातील वाहतूक सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. या संदर्भात प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन निधी देण्याबाबत सकारात्मक निर्णय आठवड्याभरात घेऊ, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
            सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना डॉ. पाटील म्हणाले की, मुंबई प्राधिकरण क्षेत्रातून लाखो नागरिक कामानिमित्त येत असतात. मुंबईतील नागरी सुविधांचा लाभ घेता यावा यासाठी मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पाचा विस्तार मुंबई महापालिका क्षेत्राबाहेरील प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या ठाणे, नवी मुंबई, पनवेल, वसई, विरार, मीरा-भाईंदर, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, खोपोली, कल्याण व डोंबिवली क्षेत्रामध्ये करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला.
            मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्याकरिता विटावा ते कोपरी दरम्यान खाडी पूलाची उभारणी करणे आहे कळवा ते आत्माराम पाटील चौक दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण करणे. या संबंधीचे प्रस्ताव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे प्राप्त झाले आहेत.  लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार हा प्रस्ताव प्राधिकरणाच्या स्तरावर तपासण्यात येत आहे.
            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री दिलीप वळसे-पाटील, संदीप नाईक यांनी भाग घेतला.
00000

No comments:

Post a Comment