Wednesday, 3 January 2018

अपूर्ण सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने निधी देणार - चंद्रशेखर बावनकुळे


·         जिल्हयातील सिंचन प्रकल्पांचा आढावा
·         आवश्यक निधीचे प्रस्ताव तात्काळ सादर करा
·         कोच्छी, खिंडसी प्रकल्प जूनअखेर पूर्ण
·         पेंच कॅनल आणि वितरीकांच्या दुरुस्तीला प्राधान्य
·         गोसेखुर्द निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी निधी
            नागपूर, दि.3 :  कोच्छी, खिंडसी, तसेच पेंच प्रकल्पातील अपूर्ण राहिलेली कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधींचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना करतानाच जिल्हयातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याला प्राधान्य देवून प्रत्यक्ष सिंचन क्षमता वाढविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले.
विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या सभागृहात सिंचन प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. त्याप्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, मुख्य अभियंता ए.आर. कांबळे, अधीक्षक अभियंता एल. पी. इंगळे, कार्यकारी अभियंता सर्वश्री जे.बी. तुरखेडे, एस.डी. ढवळे, के.बी. फरकाडे, एन.डी. सहारे, पी.एन. पाटील, एच.डी. चंदेवार, श्री. बानु बाकोडे, जे.जी. गवळी आदी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हयातील अपूर्ण सिंचन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करुन शेतकऱ्यांना सिंचनाचा सुविधा निर्माण करण्याला प्राधान्या देण्यासाठी दोन वर्षाचा कालबध्द कार्यक्रम तयार करुन आवश्यक असलेल्या निधीचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना करताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कोच्छी सिंचन प्रकल्प तसेच खिंडसी या दोन्ही प्रकल्पाचे काम जून2019 पर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले 200 कोटी रुपये उपलबध्द करुन देण्यासाठी मंत्रालयास्तरावर पाठपुरावा करण्यात येईल.
पेंच प्रकल्पातील मुख्य कालवा दुरुस्ती व पाटचाऱ्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करुन ही कामे प्रकल्पाचा भाग म्हणून करण्यात यावी. हा प्रकल्पसुध्दा जून-2019अखेरपर्यंत पूर्ण होईल यादृष्टीने नियांजन करताना 222 कोटी रुपयाचा निधी उपलब्धतेबाबत विशेष बैठक घेण्यात येईल. या प्रकल्पाअंतर्गत 15 कामापैकी 14 कामे सुरु झाली आहे. डावा व उजव्या कालाव्यासाठी 13 कोटी व 16 कोटी  रुपये निधीची आवश्यकता आहे. या प्रकल्पाअंतर्गत अपूर्ण असलेली कामे निर्धारित वेळात पूर्ण करावी, अशा सूचनाही बैठकीत पालकमंत्र्यांनी दिल्यात.
गोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत पुनर्वसनाची अपूर्ण कामे पूर्ण करुन तसेच प्रकल्पासाठी मागणीनुसार आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहेत. प्रकल्प पूर्ण करण्याचया दृष्टीने कामाचे नियोजन करण्याच्या सूचना करतानाच उपसा सिंचन योजनेसाठी 24 तास वीज पुरवठा करण्यासंदर्भातही महावितरण विभागाला पालकमंत्र्यांनी सूचना दिल्यात. यामध्ये अंभोरा भाग-1 व भाग-2, तसेच छत्रापूर आदी सिंचन योजनांचा समावेश आहे. पेंच प्रकल्पाअंतर्गत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देतांना नदीमधून थेट कॅनलमध्ये पाणी उचलण्यासंदर्भातील प्रस्तावाची तात्काळ अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हयातील अपूर्ण सिंचन प्रकल्प तसेच सिंचन क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना संदर्भातील प्रस्तावासाठी आवश्यक असलेल्या निधीसंदर्भात माननिय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनुसार विविध योजनांचा आढावा घेण्यात येवून आवश्यक निधी संदर्भातील प्रस्तावानुसार निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहिती यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
00000000

No comments:

Post a Comment