मुंबई दि. ४ : वनवा विझवताना गंभीररित्या भाजल्याने जखमी झालेल्या चांदवणे येथील वनरक्षक सदाशिव त्र्यंबकअप्पा नागठाणे यांचा उपचारा दरम्यान काल दि. ३ जानेवारी २०१८ रोजी सुर्या हॉस्पीटल, पुणे येथे मृत्यू झाला. वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करून कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच श्री. नागठाणे यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्याची माहिती ही दिली.
भोर उप वन विभागाच्या हद्दीत करंजगाव फॉरेस्ट कंपांर्टमेंट नंबर ४५३ आणि आपटी फॉरेस्ट कंपार्टमेंट नंबर ४५० येथे दि. २८ डिसेंबर २०१७ रोजी अचानक आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर बायरबिटरच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणताना वनरक्षक सदाशिव त्र्यंबकअप्पा नागठाणे गंभीररित्या भाजून जखमी झाले होते. आग लागलेली जागा दुर्गम आणि अति उताराची होती. ही आग विझवताना श्री. नागठाणे यांच्यासमवेत वन परिक्षेत्र अधिकारी के.एम.येळे व इतर सात वनरक्षक आणि वनपाल उपस्थित होते. आगीचे स्वरूप मोठ्या प्रमाणात विखुरल्याने २-२/ ३-३ च्या गटाने आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरु होते. परंतु श्री. नागठाणे यांच्या अंगावर आगीचा लोळ आल्याने ते गंभीररित्या भाजले आणि जखमी झाले. त्यांना उपजिल्हा रुग्णालय, भोर येथे उपचारासाठी दाखल केले पण लगेच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पुण्यातील सुर्या हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले. वैद्यकीय उपचार सुरु असताना काल दि. ३ जानेवारी २०१८ रोजी त्यांचे निधन झाले.
वन आणि निसर्ग संरक्षणासाठी जीवाची पर्वा न करता श्री. नागठाणे यांनी आपले कर्तव्य बजावले. त्यांच्या या समर्पणाला सलाम आहे, अशा शब्दात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पुणे वन विभागाच्या सर्व वरिष्ठ वन अधिकारी यांनी श्री. नागठाणे यांच्या कुटुंबिंयांची भेट घेऊन सांत्वन केले आहे.
००००
No comments:
Post a Comment