केंद्रीय सचिवांनी व्यक्त केले समाधान
मुंबई, दि. 3 : केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजना असलेल्या अमृत, स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत, प्रधानमंत्री आवास योजना, राष्ट्रीय जीवन्नोन्नत्ती अभियानाच्या कामांवर महाराष्ट्र प्रगतपथावर असून त्याबाबत केंद्रीय नगरविकास व गृहनिर्माण सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी समाधान व्यक्त् केले, अशी माहिती मुख्य सचिव सुमीत मल्लिक यांनी आज येथे दिली.
मंत्रालयात मुख्य सचिवांच्या दालनात केंद्रीय नगर विकास सचिवांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांच्यासह ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कल्याण-डोंबीवली, सोलापूर, पिंपरी-चिंचवड येथील महापालिका आयुक्त उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्रात सुरु असलेल्या अमृत,
स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत आदी योजनांचा आढावा घेण्यात आला. स्वच्छ भारत योजने अंतर्गत राज्य शासनाच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त करतानाच या अंतर्गत हाती घेतलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे केंद्रीय नगरविकास सचिवांनी कौतुक केले. राज्यातील शहरी भाग स्वच्छ करण्याबाबतचे उद्दिष्ट लवकरात लवकर गाठावे यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना श्री.मिश्रा यांनी दिल्या.
राज्यातील 44 शहरांमध्ये अमृत अभियानांतर्गत विविध कामे सुरु आहेत. ही कामे 2020 पर्यंत पूर्ण करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री.मिश्रा यांनी यावेळी केले. या प्रकल्पातील विविध टप्प्यावरील कामे 2018 मध्ये पूर्ण करण्यासाठी उद्दिष्ट ठरवून त्याची पुर्तता करावी, असेही श्री.मिश्रा यांनी सांगितले. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राज्यातील आठ शहरांचा समावेश आहे. या प्रकल्पांतील कामाचा वेग वाढवावा तसेच दर महिन्याला त्याचा आढावा मुख्य सचिवस्तरावर नियमित घेण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेचा देखील आढावा घेण्यात आला.
0000

No comments:
Post a Comment