मुंबई, दि. 27 : राज्यातील खेड्यांच्या परिवर्तनासाठी राज्य शासनाने हाती
घेतलेल्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशन मिशन)साठी श्री
सिद्धीविनायक गणपती न्यासाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दहा कोटी
रुपयांचा धनादेश दिला. श्री सिद्धीविनायक न्यासाच्या वतीने मंदिराचे अध्यक्ष आदेश
बांदेकर यांनी हा धनादेश आज विधानभवनातील कार्यक्रमात दिला.
राज्यातील 1000 खेड्यांचे रूपांतर आदर्श खेड्यामधे
करुन त्यामध्ये शाश्वत विकासासह ती
सर्वांगीणदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी राज्य शासनाकडून ग्राम सामाजिक परिवर्तन
अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या सहाय्यासाठी सिद्धीविनायक न्यासाकडून
10 कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले. या अर्थसहाय्याचा धनादेश आज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्त करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी
स्थापन करण्यात आलेले ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान फाऊंडेशन हे सरकारी व
सार्वजनिक भागिदारीतून साकारणारे आगळेवेगळे मंच आहे. या अभियानात सहभागी होणारे
सिद्धीविनायक न्यास ही पहिलीच सामाजिक धर्मादाय संस्था आहे. ग्रामीण भागाच्या
परिवर्तनासाठी सहभागी झाल्याबद्दल सिद्धीविनायक न्यासचे मी अभिनंदन करतो आणि आभार
मानतो.
राज्यातील खेड्यांच्या विकासासाठी आगळा वेगळा उपक्रम
राबविल्याबद्दल श्री. बांदेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन
केले.
या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम)
एकनाथ शिंदे, आमदार सुनील प्रभू,
मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, श्री सिद्धिविनायक मंदिराचेकोषाध्यक्ष सुमंत घैसास, विश्वस्त
भरत पारिख, आनंद राव, संजय सावंत,
महेश मुदलियार, गोपाळ दळवी, सुबोध आचार्य, विशाखा राऊत, पंकज
गोरे, कार्यकारी अधिकारी संजीव पाटील, उप
कार्यकारी अधिकारी रवी जाधव आदी उपस्थित होते.
००००

No comments:
Post a Comment