मुंबई, दि. 26 : महाराष्ट्र पोलीस
दलासाठी बुलेट प्रतिरोधक (बुलेटप्रुफ) जॅकेट पुरविण्याबाबत सर्व निकष व
प्रक्रियांचे पालन करूनच कानपूर येथील एम.के.यू. प्रा. लि. या कंपनीकडून या
जॅकेटचा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले होते. पुरविण्यात आलेल्या जॅकेटपैकी
1432 जॅकेट बुलेट प्रतिरोध बाबतच्या तपासणीत अपात्र ठरल्याने परत करण्यात आले
आहेत. कंपनीकडून 1432 जॅकेटचा नव्याने पुरवठा झाल्यानंतर तपासणीमध्ये पात्र
ठरल्यानंतरच पोलीस दलास वाटप करण्यात येतील, असे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
यासंदर्भात सदस्य सरदार तारासिंग
यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने डॉ. पाटील यांनी सभागृहाला माहिती
दिली की, केंद्रीय गृहमंत्रालयाने निश्चित
करुन दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाने 5
हजार बुलेटप्रुफ जॅकेट्सची विहित पद्धतीने इ-निविदा पद्धतीने खरेदी प्रक्रिया
राबवून पात्र ठरलेल्या एम.के.यू. कंपनीला पुरवठा आदेश दिले. खरेदी करण्यात आलेल्या
बुलेटप्रुफ जॅकेटची तपासणी केंद्र सरकार अंतर्गतच्या चंदीगड येथील केंद्रीय
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा या एकमेव प्रयोगशाळेकडून करण्यात येते.
संबंधित पुरवठादार कंपनीने
बुलेटप्रुफ जॅकेट्स तयार करण्यासाठी परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या बॅलेस्टिक
मटेरियलच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे सीमा शुल्क माफीसाठी अर्ज केला.
परंतु, प्रमाणपत्र प्राप्त न झाल्याने
तसेच पोलीस दलाला तात्काळ बुलेटप्रुफ जॅकेटचा पुरवठा करणे आवश्यक असल्याने सीमा
शुल्काची रक्कम समाविष्ट करुन 5 हजार ऐवजी 4 हजार 614 जॅकेटचा पुरवठा करण्याचे
सुधारित आदेश पुरवठादारांना देण्यात आले. त्यानुसार पुरवठादार कंपनीने 4 हजार 614
जॅकेटचा पुरवठा केला आहे.
चंदीगड येथील केंद्रीय न्यायसहायक
वैज्ञानिक प्रयोगशाळेत घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये एके-47 च्या फैरीविरुद्ध (Fire) अपात्र ठरल्याने पुरविण्यात आलेल्या बुलेटप्रुफ जॅकेट्सपैकी
1432 जॅकेट्स कंपनीस परत करण्यात आले. तर 3122 जॅकेट्स पोलीस दलाला वाटप करण्यात
आले आहेत. कंपनीने नव्याने 1432 जॅकेट्स पुरविल्यानंतर चंदीगड येथील प्रयोगशाळेतून
बॅलेस्टिक तपासणी करण्यात येईल आणि तपासणीत पात्र ठरल्यास पोलीस दलाला जॅकेट्स
पुरविण्यात येतील, असेही डॉ. पाटील यांनी
यावेळी सांगितले.
या चर्चेत सदस्य सुनील केदार यांनीही
सहभाग घेतला.
००००
No comments:
Post a Comment