Monday, 26 March 2018

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यामागे शासन खंबीरपणे उभे राहील - सहकार मंत्री सुभाष देशमुख


मुंबई, दि. 26 : ऊस उत्पादक शेतकऱ्यांमागे शासन खंबीरपणे उभे राहील, तसेच साखर कारखानदारी अडचणीत येणार नाहीत यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सहकारी मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
साखर कारखान्यासमोरील अडचणी तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने नियम 97 अन्वये सदस्य अमरसिंह पंडित व अन्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना श्री. देशमुख बोलत होते.
श्री. देशमुख म्हणाले, राज्यातील बंद असलेले साखर कारखाने सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही आहेत. ऊस उत्पादक शेतकरी, शेतमजूर, साखर कारखाने हे टिकले पाहिजेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ग्राहकांना विकण्याचा साखरेचा दर व उत्पादकांना विकण्याचा साखरेचा दर वेगळा असावा या सदस्यांच्या मागणी संदर्भात ते म्हणाले,  ग्राहकांच्या साखरेचा दर व उत्पादकांच्या साखरेचा दर वेगळा ठेवण्याबाबत शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने वेग-वेगळा दर कसा ठरवावा याबाबतच्या उपायांचा सविस्तर प्रस्ताव द्यावा असे केंद्र शासनाने कळविले आहे. साखर कारखान्यांची वीज निर्मिती खरेदी करण्याबाबतच्या 100 मे.वॅ.बाबतचा करार करण्यात आला आहे. उर्वरित 200 मे.वॅ.बाबत करार करण्यात येईल. साखर कारखान्यांनी इथॉनॉलचे उत्पादन जास्त करावे. तसेच साखरेची निर्यात कशी वाढेल यासाठी हे पाहणे आवश्यक आहे. साखर कारखाने आणि उत्पादक क्षेत्रात शेतकऱ्यांच्या अडचणीबाबत आजच सभापतींच्या दालनात बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सर्व संबंधीत सदस्यांनी उपस्थित राहून उपयुक्त सूचना कराव्यात, असेही श्री.देशमुख यांनी यावेळी सांगितले.
या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य सर्वश्री अमरसिंह पंडित, रामहरी रुपनवर, जयंत पाटील, डॉ.सुधीर तांबे यांनी सहभाग घेतला होता.
००००

No comments:

Post a Comment