Wednesday, 28 March 2018

पुनर्वसित गावांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार - चंद्रकांत पाटील

मुंबई, दि.28: पुणे जिल्ह्यातील भाटघर, वीर व मुळशी धरणांतर्गत पुनर्वसित गावांना नागरीसुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
या संदर्भात सदस्य संग्राम थोपटे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती.
त्यास उत्तर देताना श्री. पाटील म्हणाले, पुनर्वसनाचा कायदा हा ब्रिटीशकालीन राजवटीतील असल्याने कुठल्याही खासगी धरणग्रस्तांचे पुनर्वसन करता येत नाही. यासाठी मुळशी धरणाला निधी उपलब्ध करून देता येणार नाही. 1976 च्या पुनर्वसन कायद्यांतर्गत 23 प्रकल्पग्रस्त गावांचा आढावा घेऊन यावर पुढील कार्यवाही केली जाईल.
भाटघर प्रकल्पातर्गत पुनर्वसित गावांना रस्त्यासाठी प्रस्ताव तयार करून रस्ते विकासाकरिता तात्काळ निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. पुनर्वसितांच्या बाबतीत वेगवेगळे प्रश्न आहेत.याबाबत बैठक घेऊन कुठली कामे अपूर्ण आहेत हे पाहून या कामाला प्राधान्य देऊन ते मार्गी लावण्यात येईल. तसेच या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील.
मुळशी प्रकल्पाची मालकी टाटा पॉवर कंपनीची असून, सदर प्रकल्पाची देखभाल व सोयीसुविधाही टाटा पॉवर कंपनीमार्फत करण्यात येते. वीर प्रकल्पांतर्गत नागरी सुविधा कामांना रु. 20.42 लक्ष रकमेस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून, उर्वरीत सुविधांची अंदाजपत्रके तयार करुन त्यास प्रशासकीय मान्यता देण्याचे नियोजित आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अजित पवार, राहूल कुल, जयकुमार गोरे यांनी सहभाग घेतला.
००००

No comments:

Post a Comment