Tuesday, 27 March 2018

ठाणे सिडको प्राधिकरणातील कंत्राटी नेमणुकांची चौकशी करणार -डॉ.रणजित पाटील


मुंबई, दि. 27 : ठाणे सिडको प्राधिकरणात कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात आलेल्या ज्या पदांवर सिडको दक्षता कक्षाने आक्षेप घेतलेले आहेत अशा नेमणुकांची चौकशी करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
            सदस्य अनिल कदम यांनी ठाणे सिडको प्राधिकरणाचे 87 अधिकाऱ्यांवर एसीबीने केलेल्या कारवाईबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, ठाणे प्राधिकरणात गैरव्यवहार व अनियमितता प्रकरणी कारवाई सुरु असताना सेवा निवृत्त अधिकारी विवेक मराठे यांची सिडकोच्या बोर्डाने सल्लागार पदी कंत्राटी नेमणूक केली असली तरी त्यावर कारवाई करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सन 1987 ते फेब्रुवारी 2018 पर्यंत ठाणे जिल्ह्यातील सिडको प्राधिकरणात गैरव्यवहार, अनियमितता प्रकरणी 85 आरोपींविरुद्ध कारवाई झाली आहे. त्यामध्ये 15 सापळे रचून सिडको प्राधिकरणाचे 18 अधिकारी व खासगी तीन अशा 21 लोकसेवकांवर लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. त्यासोबतच या प्रकरणी 21 जण दोषी आढळून आले असून 12जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले असल्याचेही डॉ. पाटील यांनी सांगितले.
सिडको प्राधिकरणातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि पारदर्शकतेसाठी धोरणात्मक बदल करण्यासंदर्भात सदस्य डॉ. सुनील देशमुख यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना डॉ. पाटील म्हणाले, सिडको प्राधिकरणात पूर्वीपासूनच दक्षता कक्ष (व्हिजिलन्स सेल) सुरु करण्यात आले आहे. भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. भ्रष्टाचार थांबविणे आणि पारदर्शकतेसाठी प्रशासनाने प्रभावीपणे काम करण्याच्या सूचना देण्यात येतील, असेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सर्वश्री उन्मेश पाटील, बाबुराव पाचर्णे, प्रशांत बंब, सुनील प्रभू यांनी चर्चेत सहभाग घेतला.
००००



No comments:

Post a Comment