Monday, 26 March 2018

जमीन मालकांच्या परवानगी शिवाय जमीन अधिग्रहण होणार नाही - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील


मुंबई, दि.26 : पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर, अहमदाबाद डहाणू चौपदरीकरण, पालघर मधून जाणारी बुलेट ट्रेन इत्यादी प्रकल्पांसाठी स्थानिक रहिवाश्यांच्या जमिनी अधिग्रहणाचे काम सुरु आहे, हे अधिग्रहण करताना राष्ट्र निर्मितीच्या दृष्टीने महत्वाच्या प्रकल्पांना ग्रामसभेच्या परवानगीची अट राज्यपालांनी एका अधिसूचनेद्वारे काढून टाकली असली तरी जिल्हाधिकारी यांची परवानगी आणि जमीन मालकांच्या परवानगी शिवाय जमीन अधिग्रहित करता येत नाही असे  महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला ते बोलत होते.
            श्री पाटील पुढे म्हणाले, या प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या नागरिकांना योग्य तो मोबदला दिला जाणार असून विस्थापितांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. मिळालेल्या भरपाईची 65 टक्के रक्कम भरल्यास पर्यायी जमीन देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आतापर्यंत 65 टक्के जमिनी अधिग्रहीत झाल्या असून सुमारे नव्वद टक्के जमिनींचा ताबा मिळाल्यावर या प्रकल्पांच्या कामाची निविदा काढण्यात येणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली.
            उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री आनंद ठाकूर, हेमंत टकले, भाई जगताप, ॲड. राहूल नार्वेकर,श्रीमती विद्या चव्हाण आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.
००००

No comments:

Post a Comment