नागपूर. 27: सध्या 'निपाह' व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक आरोग्य संस्थेने निपाह व्हायरसमुळे अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.त्यामुळे जनतेने यासंदर्भात सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, निपाह व्हायरस हा वटवाघळाच्या माध्यमातून फळांमध्ये आणि फळांतून प्राणी तसेच माणसांत पसरतो. 1998 मध्ये सर्वात आधी मलेशियाच्या कांपुंग सुंगई निपाहमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे त्याला निपाह व्हायरस असे नाव देण्यात आले. सर्वात आधी डुकरांमध्ये याचे परिणाम पाहायला मिळाले होते. 2004 मध्ये बांगलादेशात या व्हायरसचा प्रकोप पाहायला मिळाला.
या व्हायरसची लक्षणे
हा व्हायरस थेट संसर्ग झालेला व्यक्ती तसेच प्राण्याच्या संपर्कात आल्यास होऊ शकतो. हा व्हायरस मेंदूवर थेट हल्ला करतो. त्यामुळे ताप, थकवा, बेशुद्धावस्था अशी लक्षणे आढळतात. ही लक्षणे आढळल्यास तात्काळ उपचार घ्यावेत. उपचार न घेतल्यास पुढील 24 ते 48 तासामध्ये संबंधित व्यक्ती कोमामध्ये जाण्याची शक्यता असते. अनेक रुग्णांमध्ये मेंदू, श्वासोश्वास आणि हृदयाच्या ठोक्याशी निगडीत समस्या वाढल्याचे निदर्शनास आले. ताप, थकवा, शुद्ध हरपणे, चक्कर येणे,उलट्या होणे, मळमळणे, अस्वस्थ वाटणे ही लक्षणे साधारणत: 7 ते 10 दिवस आढळतात. सुरुवातीच्या टप्प्यावर श्वासाशी संबंधित काही त्रास होतोय का, हे तपासून पाहणे अत्यावश्यक आहे.
अशी घ्या काळजी
सध्या निपाह या व्हायरसचा धोका टाळण्यासाठी कोणतेही औषध, इंजेक्शन उपलब्ध नाही. पडलेली फळे, प्रामुख्याने खजुराचे फळ खाणे टाळा. कारण वटवाघळांनी खाल्लेल्या फळांद्वारे किंवा त्यांच्या संपर्कात आल्यास हा व्हायरस पसरू शकतो. संसर्ग झालेले डुक्कर, वटवाघूळ किंवा माणसांच्या थेट संपर्कात येणे टाळा. वैद्यकीय मदत करणाऱ्या व्यक्तींनीही रुग्णांवर उपचार करताना पुरेशी काळजी (ग्लोव्ह, मास्क) घेणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त लॅबोरेटरीमध्येच चाचणी करा.संसर्गबाधित भागात फिरताना तुम्हाला अस्वस्थ वाटत असल्यास संबंधित चाचण्या करणे आवश्यक आहे.
निदान
निपाह विषाणूच्या निदानासाठी आर.टी.पी.सी.आर. या पध्दतीने घसा, नाक, मूत्र, रक्तस्त्राव होत असल्यास त्याच्या नमुन्याची तपासणी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे येथे करण्यात येते. या विषाणूवर अद्यापतरी कोणतेही विशिष्ट औषध उपलब्ध नाही. रॅबाविरीन हे विषाणू विरोधी औषध वापरले जात असले तरी मुख्यत्वे लक्षणाधारीत उपचार व सहाय्यभूत सुश्रुषा यावर भर दिला जातो, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
*****
No comments:
Post a Comment