* वृक्षलागवड मोहिमेचा आढावा
* 42 लक्ष 90 हजार वृक्ष लावून मोहिमेचा शुभारंभ
* यंत्रणांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश
नागपूर दि.26 : वृक्षारोपण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात तसेच शहरातही एक घर दोन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून 42 लक्ष 90 हजार वृक्ष लागवड पूर्ण करून वृक्ष लागवड मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज आवाहन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष देशमुख, डॉ. मिलींद माने, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, मुख्य वन संरक्षक मल्लिकार्जून, शिक्षण समिती सभापती उकेश चव्हाण आदी उपस्थित होते.
वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत 1 जुलै रोजी गोरेवाडा येथून 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ होत असून जिल्ह्यातील प्रत्येक गावात तसेच नगर पालिका, नगर पंचायत व महानगर पालिके अंतर्गत ही मोहिम राबवितांना सर्व नागरिकांचा सहभाग असावा. यासाठी एक घर दोन झाडे लावण्याला प्राधान्य देण्यात यावे. वृक्षारोपण मोहिमेसाठी जिल्ह्याला 42 लक्ष 90 कोटी519 उद्दीष्ट दिले होते, परंतु 43 लक्ष 50 हजार 575 वृक्ष लावण्याचे निरोजन पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली.
याकरिता आतापर्यत 48 विभागाच्या माध्यमातून 7 हजार 578 स्थळांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने 40 लक्ष 66 हजार 703 खड्यांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात आले आहे. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून 60 हजार वृक्ष तसेच वन विभागातर्फे 13 लाख 25 हजार, सामाजिक वनीकरण 2 लाख 88 हजार, वन विकास महामंडळ 5लाख 24 हजार, शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून 39 हजार, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्याच्या दोन्ही बाजूला 1 लाख 27 हजार 221, कृषी विभागातर्फे 1 लाख 87 हजार 905, ग्राम पंचायततर्फे 6 लाख 60 हजार 883 तर रेशीम विभागातर्फे 8 लाख 58 हजार वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.
रस्ते बांधणीसोबत वृक्षारोपणाचा डिपीआरमध्ये समावेश करा
शासनाच्या विविध प्रकल्पाचे नियोजन करतांना बांधकामासोबत वृक्षलागवडीचाही समावेश करावा व लावण्यात आलेली वृक्ष संवर्धनासाठी कालावधी निश्चित करावा, अशी सूचना करतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच इतर विभागातर्फे नियोजन करतांना वृक्षारोपणाचा यामध्ये समावेश असावा. यादृष्टीने राज्यस्तरावरून आवश्यक निर्देश सर्व विभागांना देण्यासंदर्भातही कार्यवाही करण्यात येईल, असेही यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
दिनांक 1 जुलै ते 31 जुलै या कालखंडात राबविण्यात येणाऱ्या वृक्षलागवड अभियानाकरिता जिल्ह्यातील रोपवाटिकांमध्ये 48 लक्ष रोपटे उपलब्ध आहेत. जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या उद्दिष्टानुसार किमान 5 लक्ष रोपटी शिल्लक राहणार आहेत. ही रोपटी वैयक्तीक रित्या नागरिकांना उपलब्ध करता येऊ शकतात. त्यामुळे जिल्ह्यात शहरी भागात तसेच ग्रामीण भागात एक घर दोन रोपटे हा उपक्रम राबविण्यात यावा. यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका तसेच महानगरपालिका स्तरावर केंद्रांची स्थापना करावी. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यात सार्वजनिक तसेच वैयक्तिक स्तरावर जास्तीत जास्त वृक्षारोपण होऊन त्यांचे संगोपन करण्यास मदत मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी व्यक्त केला.
विविध विभागांमार्फत लावण्यात येणाऱ्या रोपट्यांच्या संगोपनासाठी नियुक्त ठेकेदारांना किमान तीन वर्षे व्यवस्थापनेची जबाबदारी संबंधित विभागाने द्यावी, तसेच विभागनिहाय दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे वृक्षारोपण पूर्ण करावे, असेही यावेळी सर्व विभाग प्रमुखांना सूचित करण्यात आले. विभागीय वन अधिकारी मल्लिकार्जून यांनी नागपूर जिल्ह्यात 13 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमासंदर्भात केलेल्या नियोजनाची माहिती दिली. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागाने सहकार्य करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
*****
No comments:
Post a Comment