मुंबई, दि. ७ : वन विभागामार्फत जलयुक्त शिवार अभियानामध्ये मागील तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आल्याने वनातील जलव्याप्त क्षेत्रात ४३२ चौ.कि.मी.ची भरीव वाढ झाली आहे तसेच याची नोंद भारतीय वन सर्व्हेक्षण अहवाल २०१७ मध्ये देखील घेण्यात आली आहे.
२०१५ च्या भारतीय वन स्थिती अहवालात एकूण जलव्याप्त क्षेत्र १११६ चौ. कि.मी. होते ते २०१७ मध्ये वाढून १५४८ चौ.कि.मी. इतके झाले आहे. जल व्याप्त क्षेत्रातील ही वाढ ४३२ चौ कि.मी. इतकी आहे. जलयुक्त शिवार, जलसंधारणाच्या हाती घेतलेल्या कामांमुळे ही वाढ शक्य झाली आहे. वनयुक्त शिवार करताना जलयुक्त वन कार्यक्रमास वन विभागाने गती दिली आहे त्याचे हे फलित असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले. २०१४-१५ ते २०१६-१७ या मागील तीन वर्षात विभागाने ३३ हजार ७४७ कामे मंजूर केल्याचे व त्यापैकी २८ हजार ७४१ कामे पूर्ण झाल्याची माहिती ही त्यांनी दिली.
पावसाचे पाणी जास्तीत जास्त अडवून ते जमिनीत मुरवणे, भूजल पातळीत वाढ करणे, लोकसहभागातून जलस्त्रोताचा पाणीसाठा वाढविणे, लोकांमध्ये पाणी वापराबद्दलची जनजागृती करणे असे अनेक आयाम नजरेसमोर ठेऊन राज्यात जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यात येत आहेत. वन विभाग ही यात मागे नाही. वन विभागाने आतापर्यंत नालाबांध, वन तलाव, सीसीटी बांध, गॅबियन बंधारे, खोदतळे, सिमेंट बंधारे, ल्युज बोल्डर स्ट्रक्चर, जल शोषक खड्डे यासारखी कामे जलयुक्त शिवार कार्यक्रमातून घेतली आहेत. वन विभागाने २०१४-१५ मध्ये ५ हजार २०१ कामे मंजूर केली होती त्यापैकी ४ हजार ३७६ कामे पूर्ण झाली आहेत. यावर साधारणत: ७५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. २०१५-१६ मध्ये विभागाने १४ हजार ६३५ कामे मंजूर केली आहेत. त्यापैकी १२ हजार ७६५ कामे पूर्ण झाली आहेत. यासाठी साधारणत: २०२ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. २०१६-१७ साली विभागाने १३ हजार ९११ कामे मंजूर केली होती त्यापैकी ११ हजार ६०० कामे पूर्ण झाली आहेत. यावर अंदाजे १९२ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. वन विभागाने जलयुक्त शिवार कार्यक्रमात पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात कामे केल्याबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत सलग दोनदा विभागाच्या अभिनंदनाचा ठराव पारित झाला आहे, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.
००००
No comments:
Post a Comment