· विमा कंपन्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
· प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा आढावा
नागपूर, दि.6 : प्रधा नमंत्री पीक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग वाढवून त्यांना शेतातील पिकांना पीक विमा योजनेचे संरक्षण देतानाच नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतातील पिकांचे नुकसानी संदर्भात माहिती देण्यासाठी संबंधीत विमा कंपन्यानी शेतकऱ्यांसाठी टोलफ्री क्रमांक सुरु करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज अधिकाऱ्यांना दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा आढावा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
जिल्हयातील जास्तीत जास्त बिगर कर्जदार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी करण्यासाठी कृषी सहाय्यक तसेच कृषी पर्यवेक्षक यांनी ग्रामस्तरावर शेतकऱ्यांच्या सभा घेवून पीक संरक्षणाच्या दृष्टीने विमा योजनेची आवश्यकतेबद्दल माहिती देण्याची सूचना करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, तालुका स्तरावर प्रत्येक शुक्रवारी महसूल विभागामार्फत विशेष बैठक आयोजित करण्यात येते. या बैठकीमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात माहिती देवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे कवच देण्यात संदर्भात माहिती देण्यात यावी.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी दोन टक्के व रब्बी पिकांसाठी पाच टक्के आहे आणि पिकांच्या नुकसानी संदर्भात जोखिमस्तर 70 टक्के निश्चित करण्यात आलेला आहे. पीक कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना बंधनकारक असून पीक कर्ज मंजूर कालावधी 1 एप्रिल ते 31 जुलै असा आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक असून 24 जुलै पूर्वी पीक विमा योजनेत सहभागी होणे आवश्यक आहे. जिल्हयात ही योजना आयसीआयसीआय लोम्बाड या विमा कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या शेतातील वैयक्तिक पीकाचे नुकसान झाले असल्यास त्यांना पीक विमा योजनेचा लाभा मिळण्यासाठी आयसीआयसीआय लोम्बाड विमा कंपनीने सहज व सूलभ पध्दतीने नुकसानी संदर्भात माहिती देण्यासाठी टोलफ्री क्रमांक निर्माण करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी अधिकाऱ्यांना दिली. तसेच विम्याच्या संरक्षणासंदर्भात व प्रत्येक पीक निहाय नुकसान भरपाई संदर्भात ग्रामीण भागात शेतकऱ्यांना माहिती पोहचविण्यासाठी कृषी व महसूल विभागाच्या सर्व कार्यालयात माहिती फलक लावण्यात यावे. तसेच आकाशवाणी, दूरदर्शन, एफएमद्वारे, एसएमएस सेवा आदी माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करावा, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माहितीसाठी शेतकरी बांधवांनी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तसेच महसूल विभागाच्या सर्व कार्यालयात व राष्ट्रीयकृत बँकेसोबत आपले सरकार सेवाकेंद्रात संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. ही योजना खरीप हंगाम 2018 साठी राबविण्यात येत असल्यामुळे नागपूर जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले. यावेळी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील सांख्यिक अधिकारी बी.एल. तफरे, आयसीआयसीआय लोम्बाड विमा कंपनीचे राज पाठक, एस.एम. कुडमुलवार, के. निमेश, माधव चंद्रिकापुरे, अग्रणी बँकेचे जिल्हा समन्वयक अयुब खान आदी उपस्थित होते.
00000000
No comments:
Post a Comment