Saturday, 7 July 2018

तुडतुड्याच्या व्यवस्थापनासाठी पट्टा पद्धतीने भात रोवणी करा



          नागपूर दि.07 : मान्सूनची सुरुवात झाल्याने खरीप हंगामात भात रोपे रोवणीस सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी तुडतुड्याच्या व्यवस्थापनासाठी भात पेरणीच्या पट्टा पद्धतीचा अवलंब करावा. पिकाच्या तांत्रीक पद्धतीचा वापर केल्यास उत्पादन वाढ होईल, असा विश्वास वरिष्ठ भात पैदासकार डॉ. जी. आर. शामकुवर यांनी वर्तविला आहे.
विभागीय कृषि सहसंचालक कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना विविध पिकांच्या पेरणी ते कापणी संदर्भातील नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात येते. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी भाताची शेती करतात. भात शेतीच्या रोपट्यावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात रोपे रोवणीमध्ये सुधार केल्यास उत्पादनात वाढ होऊ शकते, असे मत विषय तज्ज्ञाकडून व्यक्त केले जात आहे.
भात रोपे रोपणी करतांना शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांचा वापर करावा. यामध्ये शेणखत, कंपोस्टखत, गांडूळखताचा समावेश असावा. धानाची तणीस न जाळता त्यास जमीनीत हेक्टरी 2 टन याप्रमाणे गाडावे. याद्वारे प्रति हेक्टरी 30 ते 40 किलो पालाश व 120 ते 140 किलो सिलीकॉन मिळेल. याशिवाय हिरवळीच्या खताचा वापर, गराडीच्या पानांचा तसेच जैविक खताचा वापर केल्यास भात रोपे रोवणीचा सहाय्यक ठरेल, असे मत वरिष्ठ भात पैदासकार डॉ. जी. आर. शामकुवर यांनी व्यक्त केले आहे.
*****

No comments:

Post a Comment