Monday, 9 July 2018

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज आमंत्रित


नागपूर दि. 09 : अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षणादरम्यान भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सत्रात अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 10वी, 12वी, पदवी, पदविका अभ्यासक्रमात 50 टक्के पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे. याशिवाय दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 40 टक्के इतकी निश्चित करण्यात आली आहे.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर येथे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व निर्वाह भत्ता एकूण 60 हजार रुपये, इतर महसूल विभागातील शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिकाकरिता 51 हजार रुपये, इतर जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच महानगर पालिका हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये, शैक्षणिक संस्था येथे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 43 हजार रुपये देण्यात येईल.याशिवाय वैद्यकिय व अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 5 हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना 2 हजार रुपये साहित्यासाठी देण्यात येणार आहे.
लाभार्थी विद्यार्थी समाज कल्याण विभागाच्या http://sjsa.maharashtra.gov.in आणि http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळांना भेट देऊन अर्ज प्राप्त करु शकतील. विद्यार्थ्यांना अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर यांचे कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून किंवा टपालाने तसेच ई-मेल द्वारे पाठवता येतील. जिल्हानिहाय निश्चित करण्यात आलेल्या संख्येपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केल्यास गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. निवड यादी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नागपूर यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती विभागाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे. 

No comments:

Post a Comment