Tuesday, 28 August 2018

जिल्ह्यात गोवर रुबेला लसीकरण मोहीम यशस्वी करा - अश्विन मुदगल




नागपूर, दि. 28 : राज्यात गोवर रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील 6 लक्ष 28 हजार लाभार्थ्यांना गोवर रुबेला लस देण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेचे सुक्ष्म नियोजन करुन शहरी व ग्रामीण स्तरावरील अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करीत मोहिमेस यशस्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज गोवर रुबेला लसीकरण मोहिमेच्या नियोजनासंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी आढावा घेताना ते बोलत होते.
बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात आले असून त्याचा आढावा जिल्हाधिकारी मुदगल यांनी घेतला. त्यामध्ये या लसीकरण मोहिमेसाठी 3 हजार 145 चमू तयार करण्यात आल्या असून जिल्हा तसेच तालुकास्तरावर क्षेत्रीय नियोजनाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आल्या असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगितले. ही लसीकरण मोहिम 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी असणार आहे.
राज्यात 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील जवळपास 3 कोटी 7 लक्ष लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
ही मोहीम राज्यातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्र व नियमित लसीकरण केंद्र, उपकेंद्र याठिकाणी राबविण्यात येईल. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास, शिक्षण, महिला बाल कल्याण विभाग यासह विविध विभागांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. नागपूर ग्रामीण मधील एकूण लोकसंख्येच्या एक तृतीअंश लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल. 9 महिने ते 15 वर्ष वयोगटात गोवर रुबेला लस दिली तरी अतिरिक्त डोस द्यावयाचा आहे. या लसीकरण मोहिमेबाबत प्रचार व प्रसारासाठी सोशल मिडियाचा वापर प्रभावीपणे करण्याची सूचनादेखील जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या.
गोवर रुबेला विषाणूजन्य आजार
गोवर हा विषाणू पासून अत्यंत धोकादायक जीवघेणा आजार आहे. या रोगामुळे बालकांना अपंगत्व व अकाली मृत्यु येऊ शकतात. रुबेला हा गोवर सारखी लक्षणे असणारा विषाणूजन्य आजार आहे. गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात हा आजार मातेला झाल्यास होणाऱ्या बालकात विकृती किंवा अपंगत्व येण्याची शक्यता असते. या आजाराचे गांभीर्य लक्षात घेता ही मोहीम शाळा व बाह्यसत्रामध्ये राबविण्यात येणार आहे.         
*****

No comments:

Post a Comment