Monday, 27 August 2018

डॉ. आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित


नागपूर, दि. 27 :  सार्वजनिक ग्रंथालयाची गुणवत्ता वाढविणे तसेच अधिक चांगल्या सेवा देण्याकरिता प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने शासनाच्या वतीने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारा’सह ग्रंथालय चळवळीत सेवा देणाऱ्यांना ‘डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येते. सन 2018-19 च्या पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी दिनांक 28 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज सादर करता येईल.
राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील अ, ब, क, ड वर्गातील उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 50 हजार, 30 हजार, 20 हजार व 10 हजाराचे रोख पारितोषिक, शाल, श्रीफळ तसेच प्रमाणपत्र पुरस्कार स्वरुप देण्यात येईल. राज्यस्तरीय उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवकाला प्रत्येकी 25 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, राज्यातील प्रत्येक महसूल विभाग स्तरावर कार्यकर्ता व सेवकाला प्रत्येकी 15 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन निवडण्यात आलेल्या व्यक्तींचा गौरव करण्यात येईल.
सन 2018-19 च्या पुरस्कार योजनेचा लाभ घेण्यास इच्छूकांनी दिनांक 28 सप्टेंबर 2018 पर्यंत तीन प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथपाल ग. मा. कुरवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
*****

No comments:

Post a Comment