Monday, 27 August 2018

स्क्रब टायफसचा संसर्ग टाळण्यासाठी वेळीच काळजी घ्या - डॉ. संजय जायस्वाल



नागपूर, दि. 27 : स्क्रब टायफस हा एक जंतू संसर्ग आजार आहे. हा संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागातर्फे तातडीने  उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हास्तरावर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी आदी अधिकाऱ्यांचा समावेश असलेले शिघ्र प्रतिसाद पथक गठित करण्यात आली असल्याची माहिती  आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांनी  दिली.
स्क्रब टायफसच्या आजाराबाबत आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे  यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा घेण्यात आला.
स्क्रब टायफस निदानासाठी व तात्काळ उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या उपाययोजनामध्ये शिघ्र ताप सर्वेक्षण, कीटक शास्त्रीय सर्वेक्षण,तणनाशक फवारणी व मॅलेथिऑन पावडरची धुरळणी, ग्रामपंचायतमार्फत स्वच्छता, सर्वेक्षणात आढळून आलेल्या संशयित रुग्णांचा डॉक्सीक्लाईन, ॲझिथ्रोमायसीननी उपचार करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच संपूर्ण विभागात  आरोग्य शिक्षण स्क्रब टायफसबाबत जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती डॉ. संजय जायस्वाल यांनी दिली.
स्क्रब टायफसचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डिईओ (आयडीएसपी) यांच्यामार्फत 18 रुग्णांची यादी प्राप्त झाली आहे.  त्यापैकी  पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. उर्वरित 13 रुग्णांपैकी पाच रुग्ण भरती असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यामध्ये दोन रुग्ण नागपूर  ग्रामीण व दोन रुग्ण अकोला व अमरावती येथील आहेत. तर एक रुग्ण गडचिरोली येथील असून प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेले आहे. सर्व भरती असलेल्या स्क्रब टायफसचे लक्षणे जसे ताप, डोकेदुखी, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास, खोकला आदी आढळून आले. चार रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉ. संजय जायस्वाल यांनी दिली.
स्क्रब टायफसचे चार रुग्ण खाजगी रुग्णालयात भरती असल्याचे आढळले असून यापैकी दोन रुग्ण विभागातील तर तीन रुग्ण मध्यप्रदेशातील आहेत. सर्व रुग्णांवर उपचार सुरु असून सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना स्क्रब टायफस नियंत्रणाच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
स्क्रब टायफस हा आजार बारिक कीटक चावल्याने होतो. चावलेल्या ठिकाणी खाज, पुरळ व अंगावर चट्टे देखील येतात. दंश केलेल्या ठिकाणी जखम होवून खपली येते. या आजाराच्या सुरुवातीला डोकेदुखी व अतिशय थंडी वाजून ताप येते. सांधेदुखी, शरीराला कंप सुटणे या प्रकारचे लक्षणे याआजाराच्या सुरुवातीला येतात.
यावर उपाय- पूर्ण शरीर झाकल्या जाईल असे कपडे घालावे, साफ-सफाईंची दक्षता घ्यावी, घराच्या आजू-बाजूला वाढलेले गवत, अतिरिक्त वाढलेले झाडे कापून टाकावीत. घरात पाळलेल्या पाळीव प्राण्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी. फुलांच्या सजावटीवर स्प्रे करुन घ्यावा. स्क्रब टायफसची लक्षणे आढळल्यास किंवा ताप आल्यास लवकरच डॉक्टरकडे जावे. आजाराच्या सुरुवातीला योग्य निदान झाल्यास स्क्रब टायफस पूर्णपणे बरा होवू शकतो.
या साथरोगाच्या शास्त्रीय बाबी लक्षात घेता माईटस् (कीटक) चा प्रादुर्भाव असणाऱ्या झाडाझुडपात जाणे टाळावे, खुल्या जागी शौचालयाला जाऊ नका, चारा, गवत गोळा करताना पूर्ण कपडे घाला तसेच झाडाझुडपात काम करुन आल्यावर आपले कपडे गरम पाण्यात धुवा, असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यांनी केले.
*****

No comments:

Post a Comment