* गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी सतर्कता बाळगा
नागपूर, दि. 03: शे तातील पिकांना किटकनाशकाच्या फवारणीमुळे मागील वर्षी झालेल्या घटनेचे पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रत्येक तालुक्यात सात दिवस विशेष जनजागृती मोहिम राबविण्यात येत असून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून फवारणीबाबत मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज दिली.
किटकनाशकांच्या फवारणीबाबतची विशेष मोहिम संपूर्ण जिल्ह्यात 12 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार असून ग्रामस्तरावर प्रत्येक फवारणी करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांना फवारणीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, आरोग्य अधिकारी आदींनी सहभागी होऊन प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत जागृती निर्माण करण्यात येणार आहे.
विशेष मोहिमेकरिता विविध विभागांना दावे नेमून देण्यात आली आहे. या मोहिमेचे तालुकास्तर वेळापत्रक तयार करण्यात आले असून फवारणी करणाऱ्या मजूरासोबतच शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कृषी विभागातर्फे प्रत्येक गावनिहाय फवारणी करणाऱ्या व्यक्तीची यादी तयार झाली असून त्यांची वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी गावनिहाय समन्वय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गावामध्ये किटकनाशकांच्या फवारणीमुळे एखादी व्यक्ती बाधित झाल्यास त्याची माहिती महसूल,कृषी व पोलीस विभागास देण्याची जबाबदारी पोलीस पाटलांची राहणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्पष्ट केले आहे.
किटकनाशक विकत घेण्याकरिता आलेल्या शेतकऱ्यांना फवारणी दरम्यान घ्यावयाच्या दक्षता बाबत कृषी केंद्र चालकांनी संपूर्ण माहिती देणे बंधनकारक असून कृषी केंद्रांमध्ये घ्यावयाच्या काळजी बाबत प्रथम दर्शनी भागात सूचना लावण्यात येणार आहेत. कृषी विकास अधिकारी यांनी किटकनाशके कायदा 1968 मध्ये नेमून दिलेल्या मानका प्रमाणे कृषी केंद्राची नियमित तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले आहे.
बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी
कापसावर मागील वर्षापासून बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला होता तो अनुभव पाहता शेतकऱ्यांनी कृषी विभागाने शिफारस केल्यानुसार रासायतील किटकनाशकांची फवारणी करावी व बोंडअळीचे नियंत्रण तात्काळ करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
गुलाबी बोंडअळीच्या निवडक क्षेत्रावर 50 टक्के अनुदानावर किटकनाशके उपलब्ध करून देण्यात येत आहेत तसेच जे शेतकरी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी शेतात किडनाशकाची फवारणी करीत आहेत. त्यांना पूर्व मान्यतेने प्रति हेक्टरी 750 रुपये या मर्यादेत जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे.
रासायनिक किटकनाशकांची फवारणी करताना त्याच-त्याच किटकनाशकांचा पून्हा-पून्हा वापर करू नये. त्याऐवजी शिफारस केलेली किटकनाशके आलटून-पालटून वापर केल्यास गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण चांगल्या प्रकारे करणे शक्य होईल,असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
*****
No comments:
Post a Comment