* कृषी विभागाचा सल्ला
नागपूर, दि.03 : कि टकनाशक फवारणी दरम्यान विषबाधेच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी संरक्षक किट्सचा उपयोग करावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना किटकनाशकांची फवारणी करताना घ्यावयाच्या काळजी संदर्भात जनजागृती अभियान सुरु करण्यात आले आहे. यामध्ये 137 कार्यशाळेच्या माध्यमातून कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी, किटकनाशके उत्पादक, विक्रेते यांच्यासह 17 हजार 618 शेतमजूर व शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय 63 हजार 815 संरक्षक किट्सचे वाटप करण्यात आले आहे. 82 हजार 345 पोस्टर्स, 46 जिंगल्स व 4 लाख 16 हजार 779 माहितीपत्रिकासह अन्य संसाधनाद्वारे शेतकऱ्यांना किटकनाशकांचा वापर याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात फवारणी दरम्यान विषबाधा झाल्याची घटना पाहता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुढील बाबी लक्षात घेऊन फवारणी करावी, असे कृषी विभागाने सुचविले आहे. यामध्ये योग्य प्रमाणात किटकनाशकाचा वापर, दोन किंवा अधिक किटकनाशकांचे मिश्रण फवारु नये, फवारणी करताना हातमोजे, गॉगल, ॲप्रॉन व बुटचा वापर, आजारपण किंवा जखमा असल्यास फवारणी टाळणे तसेच विषबाधा झाल्यास तात्काळ प्राथमिक उपचार घ्यावा. संबंधित घटनेची माहिती ग्रामपंचायत, पोलीस पाटील,ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक व नजीकच्या पोलीस स्टेशनला द्यावी. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार फवारणी केल्यास त्यांना विषबाधेचा धोका उद्भवणार नाही, अशी माहिती कृषी विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
*****
No comments:
Post a Comment