नागपूर, दि. 02 : नागपूरला भेट देणाऱ्या अति महत्वाच्या व्यक्तींच्या स्वागतापासून तर संपूर्ण व्यवस्थेसंदर्भात अत्यंत जागृतपणे कार्य करुन संपूर्ण राज्यात ओळख निर्माण करणाऱ्या ‘विजय घरडे’ या कर्मचाऱ्याला त्याच्या निवृत्ती निमित्त निरोप देण्यात आला. त्याच्या कार्यशैलीने संपूर्ण राज्यात राजशिष्टाचाराला नावलौकीक मिळवून दिले असून त्यांनी केलेल्या कामामुळे नवीन आदर्श निर्माण झाला आहे. याच कारणाने राजशिष्टाचार आणि विजय घरडे यांचे अतुट नाते निर्माण झाले आहे.
उपराजधानीचे शहर असल्याने मुख्यमंत्र्यांपासून तर मुख्य सचिवांपर्यत अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची शहरात कायमच ये-जा असते. अशावेळी त्यांच्या स्वागतासह संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी ही राजशिष्टाचारानुसार पार पाडणे गरजेचे असते. नागपूर विभागाच्या राजशिष्टाचार विभागात कार्यरत राहिलेले विजय घरडे यांनी 32 वर्षे ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांपासून तर मुख्य सचिवांपर्यत विजय घरडे यांनी स्वत:ची आणि विभागाची संपूर्ण राज्यात ओळख निर्माण केली. राजशिष्टाचार सांभाळताना प्रत्येकाचा विश्वास संपादन केला आहे. सर्वांना निरपेक्षपणे मदत करणे तसेच कुठलेही आव्हान स्विकारण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. त्याने केलेल्या आपल्या अविरत सेवेचा सन्मान महसूल दिनी करण्यात आला.
कार्यक्षम आणि सकारात्मक दृष्टीकोन बाळगून विजय घरडे यांनी आपले कर्तव्य पार पाडताना समाधान ही भावना उराशी बाळगली. त्यामुळे वरिष्ठ कुठलाही असो, राजशिष्टाचार विभागाच्या विजय घरडेचे नाव ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावर निश्चिंतीची भावना हा नेहमीच पाहायला मिळाला. राजशिष्टाचाराचे विजय घरडे जणू कणाच बनले होते. विजय घरडे यांच्या कार्यापासून सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे उदगार देखील विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्यासह जिल्हाधिकारी अश्विन मुदगल तसेच विभागीय अतिरिक्त आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी काढले. महसूल दिनी सेवानिवृत्त होताना विभागीय आयुक्त अनूप कुमार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
*****

No comments:
Post a Comment