नागपूर, दि. 26 : आरोग्य विभागाच्या वतीने 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील बालक तसेच मुलांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी गोवर-रुबेला लस देण्यात येणार आहे. गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, मौदा येथे सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम समिती उपाध्यक्ष शरद डोणेकर यांच्या हस्ते करण्यात येईल.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांचे सभापती व सदस्य उपस्थित राहणार आहेत.
गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेंतर्गत ग्रामीण भागातील 4 लख 77 हजार 570 तसेच शहरी भागातील 84 हजार 5 असे एकूण 5 लक्ष 61 हजार 555 बालकांना लस देण्यात येणार आहे. दिनांक 27 नोव्हेंबरपासून राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात शाळा तसेच दुसऱ्या टप्प्यात अंगणवाडीचा समावेश करण्यात आला आहे.
गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेंतर्गत 147 वैद्यकीय अधिकारी, 5 जिल्हास्तरीय अधिकारी, 8 पर्यवेक्षक,8 तालुका अधिकारी, 41 आरोग्य सहाय्यिका, 57 आरोग्य सहाय्यक, 264 आरोग्य सेविका, 170 आरोग्य सेवक, शिक्षक व अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर लसीकरणाच्या कार्यात सहकार्य करतील.
जास्तीत जास्त नागरिकांनी बालकांस गोवर-रुबेला लस देण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment