नागपूर, दि. 03 : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट जनजागृती करणाऱ्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून जनजागृती मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी हिरवी झेंडी दाखविल्यावर सहाही विधानसभा मतदार क्षेत्रासाठी 12 गाड्या 41 दिवस चालणाऱ्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिमेसाठी आपआपल्या क्षेत्रात रवाना झाल्यात. या बाराही गाड्यावरती मतदानानंतर होणाऱ्या व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी माहिती फलके लावण्यात आली आहे. निवडणूकांमध्ये वापरण्यात येणारे ईव्हीएम मशीन व त्यावर केलेले मतदान अधिक विश्वासार्ह होण्यासाठी या मशीनसोबतच व्हीव्हीपॅट मशीन प्रत्यक्षात कसे काम करते, याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती राजलक्ष्मी शहा, उप जिल्हाधिकारी व्ही.बी. जोशी, ज्ञानेश भट, जगदीश कातकर, नायब तहसीलदार प्रभाकर कुबडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिमेसाठी 52- नागपूर दक्षिण-पश्चिम, 53 नागपूर दक्षिण, 54 नागपूर पूर्व, 55 नागपूर मध्य, 56 नागपूर- पश्चिम तसेच 57 नागपूर उत्तर या विधानसभा मतदार क्षेत्रात जनजागृती करणाऱ्या गाड्या आजपासून फिरत आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी अश्विन कुमार यांच्या आदेशानुसार राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदार संघात आजपासून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिमेला प्रारंभ झाला. ही जनजागृती मोहिम विधानसभा मतदार संघातील प्रत्येक मतदार केंद्रनिहाय राबविण्यात येत असून या बाबत नागरिकांना व्हीव्हीपॅट बाबतचे प्रात्यक्षित दाखविले जात आहे. या कामी नागपूर जिल्ह्यात एकूण 25 पथके रवाना झाली असून प्रत्येक विधानसभा संघनिहाय पथके जनजागृती मोहिम राबवित आहे.
****
No comments:
Post a Comment