वृ.वि. 85 दि. 8 जानेवारी, 2019
मुंबई, दि. 8 : यवतमाळ शहराला पाणी पुरवठा प्रकल्पासाठी अमृत योजनेतून करण्यात येत असलेल्या पाईप लाईनचे काम येत्या मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी कामांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
यवतमाळ शहराला पाणी पुरवठा योजनेला अमृत योजनेतून मान्यता देण्यात आली आहे. या योजनेची आढावा बैठक आज मंत्रालयात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी यवतमाळचे पालकमंत्री तथा सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव पी. वेलरासू आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, यवतमाळ शहराला व समाविष्ट आठ गावांना बेंबळा धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी अमृत योजनेतून मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेतून आतापर्यंत 52 टक्के काम पूर्ण झाले आहे. यवतमाळमधील टंचाई परिस्थिती पाहता शहराला पाणी पुरवठा होण्यासाठी पाईपलाईनची कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी नियोजन करण्यात यावे.
श्री. येरावार म्हणाले, पाणी पुरवठा योजनेचे काम पाईपलाईन अभावी रखडले आहे. त्यामुळे पाईप पुरवठा करणाऱ्या संबंधित कंपनीने तातडीने पाईप पुरवठा करावे, जेणेकरून काम लवकर पूर्ण करता येईल.
००००

No comments:
Post a Comment