Monday, 11 February 2019

पेंच लाभक्षेत्रासह विभागात 13 हजार सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रम राबविणार - चंद्रशेखर बावनकुळे

* नागपूर व भंडारा जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना लाभ
नागपूर, दि. 11 : मध्यप्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सिंचनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रथमच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी 13 हजार सिंचन विहिरीच्या कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केली.
विभागातील पेंच लाभक्षेत्राअंतर्गत येणारे नागपूर व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धडक सिंचन विहिरीचा सर्वाधिक लाभ होणार असून विभागातील गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यासाठी दोन टप्प्यात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सिंचन विहिरींचा धडक कार्यक्रमासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
विभागात घेण्यात आलेल्या 13 हजार सिंचन विहिरींच्या धडक कार्यक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात 10 हजार तर दुसऱ्या टप्प्यात 3 हजार विहिरी पूर्ण करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील पेंच लाभक्षेत्रासाठी 4 हजार 500 तर इतर शेतकऱ्यांसाठी 500 विहिरी बांधण्यात येणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील पेंच लाभक्षेत्रातील 800 व इतर क्षेत्रातील 700 अशा दीड हजार विहिरींचा लक्षांक असून सर्व धडक सिंचन विहिरी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवून मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
धडक सिंचन विहिरी मंजूर करतांना लाभ क्षेत्रातील पाच एकर पर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य असून 5 ते 10 एकर शेती असणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. सिंचन विहिरी मंजूर करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरु करण्यात येणार असून प्रत्येक विहिरीसाठी अडीच लाख रुपये याप्रमाणे निधी देण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या योजनेचा जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहेत. पेंच प्रकल्पात जलसाठ्यात घट झाल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह आरक्षणानुसार प्राधान्य क्रमांक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी उपसा जलसिंचन योजना सुरु करुन तसेच वेस्टर्न कोल्डफिल्डच्या खाणीमधून वाहून जाणारे सर्व पाणी पेंच प्रकल्पामध्ये जमा करण्याच्यादृष्टीने बाराशे कोटी रुपयाचा आराखडा राबविण्यात येत असल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.
धडक सिंचन विहिरींच्या विशेष कार्यक्रमानुसार यापूर्वी अकरा हजार विहिरींचा कार्यक्रम सुरु करण्यात आला होता. त्यानुसार ज्याभागामध्ये भूजलाची पातळी चांगली असून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी वापरता यावे यादृष्टीने अकरा हजार 614 विहिरींचा लक्षांक देण्यात आला होता. आतापर्यंत 8775 विहिरी पूर्ण झाल्या असून दोन हजार 734 विहिरींचे कामे प्रगतीपथावर आहेत. पेंच प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात सिंचनाच्यादृष्टीने मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष नागपूर विभागासाठी धडक सिंचन विहिरीचा कार्यक्रम राबविण्याला मान्यता दिली आहे. धडक सिंचन विहिरीच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी 338 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून यासाठी तरतूदही उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली.
धडक सिंचन विहिरीच्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षस्थानी समिती गठीत करण्यात आली असून ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
धडक सिंचन कार्यक्रमाअंतर्गत 495 विहिरींची कामे पूर्ण
अकरा हजार सिंचन विहिरींच्या कार्यक्रमाअंतर्गत नागपूर जिल्ह्याला यापूर्वी पाचशे विहिरींचे लक्ष देण्यात आले होते. त्यापैकी 495 विहिरींची कामे पूर्ण झाली असून यावर अकरा कोटी 81 लाख रुपये खर्च झाले असून याअंतर्गत लाभ मिळालेल्या धडक सिंचन विहिरी जियोटॅगींग पूर्ण करण्यात आले आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यात पाच हजार 722 सिंचन विहिरींच्या कामाला सुरुवात झाली असून त्यापैकी 4 हजार 876 विहिरी पूर्ण झाल्या. तसेच 846 विहिरींची कामे प्रगतीपथावर आहेत.
धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रमाची अंमलबजावणी कालबद्ध कार्यक्रमानुसार पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात.
यावेळी आमदार डी मलिकाअर्जून रेड्डी, प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी अंकुश केदार, अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे तसेच विविध विभागांचे अंमलबजावणी अधिकारी उपस्थित होते.
*****

No comments:

Post a Comment