कांदा उत्पादक
शेतकऱ्यांना मोठा दिलासा
मुंबई, दि. 4 : राज्यातील दुष्काळी
परिस्थिती आणि कांद्यांच्या दरात झालेली घसरण यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत
आला आहे. यासाठी राज्य शासनाने 200 रुपये प्रती क्विंटल आणि जास्तीत 200 क्विंटल
प्रती शेतकरी याप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते. या
अनुदानासाठी 31 डिसेंबर 2018 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतरही कांद्याला
मिळणारा बाजारभाव कमी असल्याने कांदा अनुदानासाठी 31 जानेवारी 2019 पर्यंत मुदतवाढ
ग्राह्य धरण्याबाबत मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली असून याबाबत निर्णय
घेण्यात आला आहे, असे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी
सांगितले.
शासनाने यापूर्वी कांदा अनुदानासाठी
1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2018 पर्यंतचा कालावधी निश्चित केला होता. दि. 15
डिसेंबर नंतरही कांद्याला मिळणारा बाजारभाव कमी असल्याने कांदा अनुदानासाठी 31 डिसेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात
आली होती. त्यानंतरही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन तसेच
राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाने पुन्हा
एक महिन्याची म्हणजे 31 जानेवारी 2019 पर्यंत मुतदवाढ दिली होती. या निर्णयामुळे
राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असेही श्री.
देशमुख यांनी सांगितले.
श्री. देशमुख म्हणाले, राज्यातील
कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समित्या,
खासगी बाजार समित्यांमध्ये दि. 1 नोव्हेंबर 2018 ते 31 डिसेंबर 2018
या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना रु. 200 प्रती क्विंटल आणि जास्तीत
जास्त 200 क्विंटल प्रती शेतकरी या प्रमाणात अनुदान मंजूर करण्यात आले होते. 30
डिसेंबर 2018 नंतरही कांद्यांच्या दराची घसरण कायम राहिल्याने अनेक शेतकऱ्यांचे
नुकसान झाले. या योजनेपासून कांदा उत्पादक शेतकरी वंचित राहू नये, सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा व्हावा यासाठी पुन्हा एक
महिन्याची मुदतवाढ देऊन ती ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत लवकरच
शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
या योजनेचा कालावधी वाढविला असला तरी
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अटी व शर्थी या पूर्वीच्या निर्णयाप्रमाणे कायम
ठेवण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल
असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment