विधान
परिषदेत दिवंगत माजी सदस्यांना आदरांजली
मुंबई, दि. 25 : विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख
जनमानसातील लोकप्रिय नेते होते. राजकारण, शिक्षण, समाजकारण अशा सर्वच क्षेत्रात
त्यांचा वावर असायचा, अशा भावना
विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर
यांनी विधानपरिषदेत व्यक्त केल्या. यावेळी सभापतींनी माजी सदस्य कृष्णराव पांडव
यांच्याही निधनाबद्दल आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.
दिवंगत
माजी विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख
आणि माजी सदस्य कृष्णराव पांडव
यांच्या निधनाबद्दल सभागृह नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शोक
प्रस्ताव सभागृहात मांडला होता. या प्रस्तावावर सभापती आपल्या शोकभावना व्यक्त करीत होते.
सभापती
म्हणाले, दिवंगत देशमुख हे चार वेळा सांगली जिल्ह्यातील शिराळा
मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निर्वाचित झाले होते. तसेच चार वेळा ते विधान
परिषदेवर निर्वाचित झाले. सामान्य प्रशासन, गृह, माहिती व जनसंपर्क, कृषी, उर्जा
व परिवहन खात्याचे राज्यमंत्री तसेच अन्न व नागरी पुरवठा, ग्रामविकास, कृषी व फलोत्पादन, सहकार, संसदीय
कार्य, सार्वजनिक बांधकाम व माजी
सैनिकांचे कल्याण मंत्री म्हणून काम केले.
सन 2004 ते 2015 पर्यंत त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती पदही भूषविले. ते एक
ज्येष्ठ समाजसेवक, उत्कृष्ट संसदपटू, कुशल संघटक, उत्तम प्रशासक असल्याच्या भावना सभापतींनी यावेळी व्यक्त केल्या.
माजी सदस्य कृष्णराव पांडव यांच्याही निधनाबद्दल
विधान परिषदेत सभापतींनी शोकभावना व्यक्त
करीत आदरांजली अर्पण केली. ते म्हणाले, नागपूर येथील मानवता शिक्षण संस्थेचे संस्थापक दिवंगत पांडव हे दोन वेळा
विधान परिषदेवर निर्वाचित झाले होते. नागपूर शहरातील अनेक शैक्षणिक संस्थांशी
त्यांचा निकटचा संबंध होता. नागपूरच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांनी विशेष योगदान
दिले.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सदस्य सर्वश्री अनिल परब, शरद
रणपिसे, जयंत पाटील, भाई जगताप, जोगेंद्र कवाडे, आंनदराव
पाटील, रामहरी रुपनवर, प्रकाश गजभिये यांनीही आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
विधान परिषदेत हा शोकप्रस्ताव एकमताने संमत केल्या नंतर सभागृहात दोन मिनिट मौन
पाळून आदरांजली वाहण्यात आली.
००००
No comments:
Post a Comment