Saturday, 2 February 2019

राष्ट्रीयत्वाच्या बीजारोपणासाठी सकारात्मक वातावरणाची निर्मिती होणे गरजेचे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस






नागपूर, दि:  देशामध्ये सध्या पायाभूत सुविधा उभारणीची कामे वेगात व मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. या कामांबरोबरच राष्ट्रीयत्वाचे बीजारोपण होणेही महत्वाचे आहे. समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी सजगतेने आणि जाणीवपूर्वक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

रेशिमबाग येथील सभागृहात ‘Oपॉझिटिव्हफाऊंडेशनतर्फे तू माझा सांगाती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. रामदासजी आंबटकर, प्रा. बाळासाहेब दीक्षित, आशाताई दीक्षित व विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘Oपॉझिटीव्ह हे अतिशय समर्पक नाव व संकल्पना आहे. राष्ट्रीयत्वाच्या भावनेने प्रेरीत होऊन अनेकजण काम करीत आहेत. फाऊंडेशनचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. अनेकजणांनी विविध आंदोलने व चळवळीत झोकून देऊन काम केले आहे. या निमित्ताने स्मृतींना उजाळा मिळत आहे.
भारताच्या प्रगतीपथावरील वाटचालीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात सध्या विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उभारणीची कामे मोठ्या प्रमाणात व वेगात सुरु आहेत. याद्वारे गरीब व सर्वसामान्य जनतेला सुविधा उपलब्ध होणार आहेत. डिमॉनिटायझेशन आणि जीएसटी सारख्या करप्रणालीमुळे अर्थव्यवस्थेत क्रांतीकारक बदल झाले आहेत. करदायित्वाचे प्रमाण आता वाढीस लागले असून कर भरणाऱ्या नागरिकांची संख्या तिपटीने वाढली आहे. जीएसटी करप्रणालीमुळे करकपात झाली असून करचुकवेगिरी तसेच करचोरी कमी झाली आहे. गरीब आणि सर्वसामान्यांसाठी उज्ज्वला, घराघरात वीज पोहचविणे तसेच स्वच्छता गृहांची बांधणी यासारख्या विविध योजना प्रभावीपणे पोहचविल्या जात आहे.
या सर्वांबरोबरच राष्ट्रीय सुरक्षिततेसाठीही जाणीवपूर्वक कठोरतेने प्रयत्न करण्यात येत आहेत. सर्जिकल स्ट्राईकहे त्याचेच एक सर्वोत्तम उदाहरण आहे. भारताला जागतिक पातळीवर प्राप्त झालेला सन्मान आपण सारे भारतीय अनुभवत आहोत. गरीब व सर्वसामान्यांसाठी विविध कल्याणकारी योजना, करदायित्व जपणारे नागरिक आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीतून भारत सर्वात विकसित आणि बलशाली अर्थव्यवस्था बनत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
सूत्रसंचालन सुनील कुहीकर यांनी केले. यावेळी अन्य मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.
                                                            ** * * * ** 

No comments:

Post a Comment