Saturday, 2 February 2019

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा चार हजार रुग्णांना लाभ - डॉ. रणजित पाटील



                             वैद्यकीय सहायता निधी कक्षास भेट

नागपूर, दि. 2 :  समाजातील गरजू रुग्णांना तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी सहाय्य करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून चार हजार रुग्णांना सुमारे 40 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. हैद्राबाद हाऊस येथील सहायता कक्षाचे काम अत्यंत पारदर्शक पद्धतीने सुरु असल्याची माहिती नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली.
हैद्राबाद हाऊस येथील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षात  राज्यमंत्री श्री. पाटील यांनी भेट दिली. तसेच येथील कामांची पाहणी केली. यावेळी वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख तथा विशेष कार्य अधिकारी डॉ. के. आर.  सोनपुरे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाद्वारे तातडीच्या शस्त्रक्रिया व आजारासाठी नागपूर व मुंबई येथे विशेष कक्ष सुरु करण्यात आला आहे. या दोन्ही कक्षाद्वारे सुमारे 500 कोटी रुपयांची मदत समाजातील गरीब व गरजू रुग्णांना आतापर्यंत देण्यात आली आहे. वैद्यकीय सहायता कक्षाद्वारे हृदय शस्त्रक्रिया, बायपास, सर्व प्रकारचा कर्करोग, ट्रामा, हेअर इन्ज्युरी, ब्रेन हॅमरेज तसेच सीव्हीई आदी  आजाराच्या रुगणांसाठी मदत देण्यात येते. ही मदत संबंधित रुग्णालयाच्या नावाने जमा होत असल्यामुळे रुग्णांना उपचारासाठी सुविधा उपलब्ध झाली आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून मदत मिळण्यासाठी करावयाच्या अर्जापासून तर थेट निधी  उपलब्ध करुन देण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी यावेळी घेतली. वैद्यकीय सहायता निधी मिळण्यासाठी कक्षाद्वारे नियमानुसार व पात्र गरजवंतांनाच निधी मिळत असल्याबद्दल राज्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. प्रारंभी वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख डॉ. के. आर. सोनपुरे यांनी  स्वागत करुन मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या कार्याची माहिती दिली.
यावेळी वैद्यकीय सहायता कक्षाचे  जॉन अनभोरे, अभिषेक अग्ने, कुलदीप चौरसिया आदी उपस्थित होते.

***

No comments:

Post a Comment