Thursday, 7 March 2019

कनिष्ठ अभियंता संघटनेच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक - चंद्रकांत पाटील


मुंबई, दि. 7  : कनिष्ठ अभियंता संघटनेच्या मागण्या सोडविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत पाटील सांगितले.
कनिष्ठ अभियंता संघटनेच्या विविध मागण्यासंदर्भात आज मंत्रालयात श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
            अर्हता, गुणवत्ता व अनुभव प्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांना कनिष्ठ अभियंता पदावर नियुक्ती देणे, उपविभागीय अधिकारी पदावरील पदोन्नतीची प्रक्रिया वेळेवर होणे, शाखा अभियंता व पदोन्नती कनिष्ठ अभियंता यांना आश्वासित प्रगती योजनेचे लाभ कायम ठेवणे, कार्यकारी अभियंता पदासाठी लागणारा अर्हता कालावधी कमी करणे, अभियांत्रिकी सेवा नियमांची पुनर्रचना करणे, लातूर भूकंपावेळी काम केलेल्या कंत्राटी अभियंत्यांची सेवा जोडून मिळणे आदी मागण्यांवर यावेळी चर्चा झाली.
कनिष्ठ अभियंत्यांच्या सर्व मागण्याबाबत राज्य शासन सकारात्मक विचार करेल. योग्य मागण्यांबाबत निर्णय घेऊन त्याची अमंलबजावणी केली जाईल, याकडे लक्ष देऊ, असे श्री. पाटील यांनी सांगितले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, सचिव (रस्ते) सी.पी.जोशी, संघटनेचे अध्यक्ष विनायक लहाडे, सरचिटणीस उन्मेश मुडबिद्रीकर, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.
०००

No comments:

Post a Comment