मुंबई, दि. 7 : पूणे येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय
द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ संजय दिनानाथ सावंत यांची दापोली येथील डॉ.
बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी गुरुवारी (दिनांक ०७
मार्च) डॉ सावंत यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. सावंत यांची नियुक्ती पाच
वर्षासाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील, यापैकी जो दिनांक अगोदर असेल, तोपर्यत करण्यात आली आहे.
डॉ. तपस भटटाचार्य यांनी दिनांक 31 ऑगस्ट 2018 रोजी विदयापीठाच्या
कुलुगुरुपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. महात्मा फुले कृषि
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथ यांचे कडे विद्यापीठाच्या कुलगुरु
पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.
डॉ. संजय सावंत यांनी राहूरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातून एम.
एससी (कृषी) ही पदवी प्राप्त केल्यानंतर पंतनगर येथील गोविंद बल्लभ पंत कृषि
विश्वविद्यालयातून पीएच. डी. प्राप्त केली. त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या कलुगुरुंच्या निवडीसाठी
राज्यपालांनी मुंबई उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश न्या. (डॉ.) मंजुला चेल्लूर
यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती.
भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहापात्रा आणि कृषी
विभागाचे सचिव एकनाथ डवले हे समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या
उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानतर राज्यपालांनी डॉ. सावंत यांच्या
नियुक्तीची घोषणा केली.
००००
No comments:
Post a Comment