Thursday, 7 March 2019

मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र संविधानाची प्रास्ताविका लावण्यात येणार



राज्यमंत्री मदन येरावार यांनी केली जागेची पाहणी
मुंबई, दि. 7 :  मंत्रालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र तसेच संविधानाची प्रास्ताविका लावण्यासंदर्भात आज सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. राज्यमंत्री मदन येरावार, आमदार प्रकाश गजभिये, आमदार विजय (भाई) गिरकर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांकडून मंत्रालयात जागेची पाहणी करण्यात आली. पाहणी केलेली जागा तैलचित्र आणि प्रास्ताविका लावण्यासाठी निश्चित करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करण्यात येईल, असे यावेळी राज्यमंत्री श्री. येरावार यांनी सांगितले.
            विधिमंडळाच्या गतीवर्षी झालेल्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात आमदार प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी मंत्रालयात बाबासाहेबांचे तैलचित्र आणि संविधानाची प्रास्ताविका लावण्यासासाठी लवकरात लवकर जागा निश्चित केली जाईल, असे विधानपरिषदेत सांगितले होते. त्यानुसार आज मंत्रालयात बैठक घेऊन आणि त्यानंतर जागेची पाहणी करण्यात आली. तसेच यासाठी त्वरित प्रस्ताव मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्याचे निर्देश राज्यमंत्री श्री. येरावार यांनी दिले.
            यावेळी गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव श्रीमती भोसले, सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव सं. गी. पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सु. अ. वांदेकर, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव महेश वाव्हळ, सार्वजनिक अवर सचिव विजय अमोलकर, आंतरजातीय विवाह स्वतंत्र कायदा समितीचे सदस्य प्रविण भोटकर, सामाजिक कार्यकर्ते ॲङ राहूल मस्के आदी उपस्थित होते.
००००

No comments:

Post a Comment