Friday, 6 December 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली त्रिसूत्री अंगी बाळगा - डॉ. संजीव कुमार


·        शांतीवन, चिचोली येथे विभागीय आयुक्तांची सपत्नीक उपस्थिती
            नागपूर,दि.6: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा ही समाजाला दिलेली त्रिसुत्री आजही समाजाने अंगी बाळगावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले.
            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चिचोली येथील शांतीवनात भारतीय बौद्ध परिषदेच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
             शांतीवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या विविध 400 वर वस्तु संग्रहालयात अनुयायांसाठी प्रदर्शनार्थ ठेवण्यात आल्या आहेत. सपत्नीक त्या वस्तुंचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी, दर्शन घेतले. त्यानंतर भारतीय बौद्ध परिषदेच्या बौद्ध विहारात जावून भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.

            यावेळी व्यासपीठावर सरपंच श्रीमती मीना कोडापे, श्रीमती ज्योत्स्ना नितनवरे, श्रीमती रेखा मून, नागपूर ग्रामीणच्या उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी- पाखले, नायब तहसीलदार संदीप पुंडेकर आणि प्रल्हाद खोब्रागडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला, न्याय, समता आणि बंधुतेची शिकवण दिली आहे. समाजाचा उत्कर्ष साधण्यासाठी त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाने शिक, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, असे सांगितले. त्यांच्या या शिकवणीचा आजही सर्वांनी अंगिकार करण्याची आवश्यकता आहे. तसेच स्वातंत्र्य समता आणि बंधुतेची शिकवणही महत्वपूर्ण आहे. यातूनच समाजाचा उत्कर्ष साधण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.
            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली समाजातील प्रत्येक घटकामधील समानता ही आर्थिक, राजकीय, सामाजिक अशी सर्व प्रकारची आहे. त्यांना अपेक्षित असलेली ही सर्व पातळींवरील समानता आजही समाजाला पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय बौद्ध परिषदेचे कोषाध्यक्ष संजय पाटील, शेखर गोडबोले, प्रदिप लामसुंगे यांनी विभागीय आयुक्तांना शांतीवन आणि परिसराची माहिती दिली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंचक्रोशीतून बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनिल भगत यांच्या स्वर्णगाण समुहाद्वारा अभिवादन सुगम संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
*****

No comments:

Post a Comment