· सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनाचा शुभारंभ
· श्रीमती वसुधा सहस्त्रभोजनी यांनी दिले एक लाख रुपये
नागपूर, दि.07 : प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशा कर्तृत्ववान सशस्त्र सेनेमुळे भारतीय सुरक्षित आहेत. ते सीमेवर अहोरात्र देशाच्या सीमा सांभाळत असून, आज त्यांच्यासाठी सढळ हस्ते सशस्त्र ध्वजदिन निधी संकलीत करत संपूर्ण देश खंबीरपणे पाठीशी उभा असल्याचा संदेश पोहचणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट नितीन पांडे, जिल्हा माहिती अधिकारी (विशेष कार्य) अनिल गडेकर, कल्याण संघटक नरेंद्र देव, सत्येंद्रकुमार चौरे, राम कोरके आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाला सुरुवात करुन म्हणाले की, सशस्त्र सेनेमुळे आपण सर्वजण सुरक्षित आहोत. देशाची सशस्त्र सेना सीमेवर शत्रूराष्ट्रासह, दहशतवादी, मानवी आणि नैसर्गिक आपत्ती यांच्यासह स्वकियांसोबतही लढत असतात. प्रसंगी त्यांना वीरगतीही प्राप्त होत असते. त्यांच्यानंतर त्यांचे कुटुंब, पाल्यांप्रती आपली सर्वांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सर्वांनी मदत केली पाहिजे. वीर जवानांच्या कुटुंबाच्या अडीअडचणी सोडविणे तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे पुनर्वसन करण्यासाठी दरवर्षी ७ डिसेंबरपासून ध्वजदिन निधी संकलनाला सुरुवात होते. तो पुढील वर्षीच्या नोव्हेंबर अखेरपर्यंत संकलन केले जाते, असे श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
ध्वजदिन निधी संकलनाला आजपासून सुरुवात झाली. श्रीमती वसुधा श्री. सहस्त्रभोजनी यांनी 1 लाख रुपयांचा धनादेश देत संकलनाला सुरुवात केली. गतवर्षी नागपूर जिल्ह्यातून जवळजवळ 1 कोटी 11 लाख 29 हजार रुपयांचा निधी संकलित करण्यात आला होता, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.
देशाच्या सीमा आणि स्वातंत्र्याचे रक्षण करताना उदभवणारी संकटे, अतिवृष्टी, वादळे वा भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीवर मात करत सैनिक देशवासीयांच्या मदतीला धावून येतात. हे आपण वेळोवेळी पाहिले आहे. गेल्यावर्षी श्री. ग. सहस्त्रभोजनी यांनी 75 हजार रुपयांचा ध्वजनिधी दिला होता, असे सांगत जिल्ह्यातील नागरिकांनी सढळहस्ते निधी संकलनाला हातभार लावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.
यावेळी माजी सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट नितीन पांडे यांनी सांगितले की, युद्धजन्य परिस्थितीत धारातीर्थी पडणाऱ्या कुटुंबीयांना व अपंगत्व आलेल्या जवानांना आर्थिक मदत दिली जाते. ध्वजदिन निधीतून ग्रामीण भागातील माजी सैनिकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी शहरामध्ये जावे लागते. अशा पाल्यांसाठी वसतिगृहे बांधून सोय करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी लेफ्टनंट नितीन पांडे यांनी गतवर्षीच्या संकलीत ध्वजदिन निधीतून विविध कल्याणकारी योजनेतंर्गत माजी सैनिक, सैनिक विधवा, वीरपत्नी यांना आर्थिक मदत वाटप करण्यात आली असल्याचे सांगितले. त्यामध्ये औषधोपचार 1 लाख 96 हजार, शालेय-महाविद्यालयीन शिक्षण 71 हजार, व्यावसायिक शिक्षण 26 लाख 11 हजार, शिष्यवृत्ती 11 हजार 500, चरितार्थ चालवण्यासाठी 1 लाख 89 हजार, अंत्यविधी करण्यासाठी 5 लाख 10 हजार आणि पाल्यांचे लग्न, वीरपत्नी व शौर्यपदक धारकांना एसटी प्रवास सवलतीसाठी 7 लाख 65 हजार अशा विविध योजनांच्या माध्यमातून 714 जणांना 42 लाख 56 हजार 185 रुपयांची आर्थिक मदत केल्याचे श्री. पांडे यांनी सांगितले.
माजी सैनिक व पाल्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विशेष गौरव
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याहस्ते माजी सैनिक व पाल्यांचा विशेष गौरव करुन सत्कार करण्यात आला. त्यामध्ये इयत्ता दहावीमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल हर्षिता कोरे तर बारावीमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल अमन सोनसरे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते धनादेश तसेच प्रशस्तीपत्रक देवून सन्मानित करण्यात आले. माजी सैनिक पत्नी सुवर्णा केवटे या कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्व विद्यापीठ, रामटेक येथे बॅचरल ऑफ एज्युकेशन (बी.एड .) अभ्यासक्रमात प्रथम आल्याबद्दल तसेच शालेय रोलर स्केटींग व रोलर हॉकी स्पर्धेतील यशाबद्दल साक्षी लोडे हिला सन्मानित करण्यात आले.
क्रीडा प्रकारात ऑल इंडिया फॉरेस्ट मीटमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केल्याबद्दल माजी सैनिक अकरम खान यांना शाल, श्रीफळ व धनादेश देऊन जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी गौरविले. तसेच माजी शिपाई रामचंद्र सायरे यांना ज्युनिअर महाराष्ट्र स्टेट पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशीपमध्ये यश मिळाल्याबद्दल गौरविण्यात आले. नशा मुक्ती अभियानासाठी रितेश भोयर तर माजी सैनिक पत्नींसाठी महिला बचतगट चालविणाऱ्या श्रीमती सविता बर्वे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
तसेच माजी सैनिक पाल्य आकांक्षा बाळापुरे, कुमार बेलसरे तसेच अदिती उरकुडे यांना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सुभेदार मेजर ऑनररी लेफ्टनंट वीरसेन तांबे, न्यू सेन्स बिडेक्सन स्कॉट, कमांडर महानगर पालिका नागपूर, स्कॉटमध्ये उत्तम कामगिरी करीत असल्याबद्दल त्यांना सुद्धा शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार कल्याण संघटक नरेंद्र देव यांनी मानले. यावेळी माजी सैनिक कुटुंबासह मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
श्रीमती वसुधा सहस्त्रभोजनी यांच्याकडून
ध्वजदिन निधी संकलनाला 1 लाखांचा धनादेश
श्रीमती वसुधा श्री. सहस्त्रभोजनी यांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे 1 लाख रुपयांचा धनादेश दिला. माजी माहिती संचालक श्री. ग. सहस्त्रभोजनी व सौ. वसुधा सहस्त्रभोजनी यांनी मागील वर्षी 75 हजार रुपयांचा धनादेश सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमध्ये दिला होता. श्रीमती वसुधा सहस्त्रभोजनी यांनी माजी सैनिकांच्या कल्याणासाठी दरवर्षी एक लाख रुपयाचा धनादेश देण्याचा संकल्प असल्याचे सांगितले. सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतांना दिवाळीमध्ये एक दिवा भारतीय सैनिकांच्या नावे लावून त्यांच्याबद्दल असलेला आदरभाव व्यक्त करावा. देशाच्या सीमेचे प्रतिकुल परिस्थितीत रक्षण करतांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आम्ही सर्व सोबत आहोत ही भावना व्यक्त व्हावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हातठेल्यावर पुष्प विकणारे मनीष गडीकर हे शहीद होणाऱ्या जवानांच्या परिवाराला आर्थिक मदत म्हणून दर महिन्याला ध्वजनिधीमध्ये 500 रुपयांचे योगदान देतात, हे विशेष.
विशेष गौरव पुरस्काराकरिता श्रीमती प्रतिभा पेंढारकर तसेच श्रीमती डॉ.मृदुल चांदे यांनी दिलेल्या निधीतून माजी सैनिकांच्या पाल्यांना रोख स्वरुपात पुरस्कार देण्यात येतो. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सर्वांचे विशेष अभिनंदन केले.
|
No comments:
Post a Comment