Wednesday, 22 January 2020

स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान यशस्वी करा -रविंद्र ठाकरे



नागपूरदि. 22 :  कुष्ठरोग  जनजागृती  अंतर्गत ‘स्पर्श’ हे अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यासाठी  26 जानेवारी रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत कुष्ठरोग निवारण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहामध्ये कुष्ठरोग जनजागृती अभियान- 2020 बाबत जिल्हा समन्वय समितीची सभा जिल्हाधिकरी रविंद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
समन्वय समितीच्या सभेकरिता सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. भोजराज मडके, जिल्हा शल्य चिकित्सालयाचे  डॉ. दीपक थेटे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, जिल्हा क्षयरोग  अधिकारी डॉ. ममता सोनसरे, वैद्यकीय अधिकारी संजय मानेकर, डॉ. स्नेहल मानेकर, डॉ. संजय पुल्लकवार, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार आदी उपस्थित होते.
 कुष्ठरोग  निवारण दिन व पंधरवडा या निमित्ताने दिनांक 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2020 या कालावधीत जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी कुष्ठरोग अभियानांतर्गत विविध प्रकारचे आरोग्य शिक्षण उपक्रम प्रभावीपणे राबवावे. या अभियानाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आरोग्य कर्मचारी आशा स्वयंसेविका यांची मदत घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
‘स्पर्श’ जनजागृती अभियान 2020 चे घोषवाक्य ‘कुष्ठरोगाविरुद्ध अखेरचे  युद्ध’ असे आहे. कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रमांतर्गत नुक्कड-नाटक, निबंध स्पर्धा, कुष्ठरोगावरील गाणी, कविता वाचन, कठपुतली त्याचप्रमाणे काल्पनिक सपना या मुलीच्या वतीने तसेच महात्मा गांधीजींच्या वेशभूषेतील मुलाद्वारे कुष्ठरोगाच्या जनजागृतीचा संदेश देण्यात येणार आहे.  यावेळी कुष्ठरोग, क्षयरोगाविषयी प्रश्न- मंजुषा कार्यक्रम तसेच प्रतिज्ञा वाचन करण्यात येणार आहे.
***

No comments:

Post a Comment