नागपूर, दि.21 : समाजात घडत असलेल्या वाईट प्रथांना आळा घालण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याप्रती संवेदनशील राहून पीडितांना मदत करण्याची भूमिका स्वीकारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने 'राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, मानवी तस्करी आणि व्यापारी लैंगिक शोषणाचे बळी योजना 2015' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष व्ही.बी. कुलकर्णी, सचिव अभिजीत देशमुख, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती अपर्णा कोल्हे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष व्ही.बी. कुलकर्णी यांनी समाजातील प्रत्येक घटकाने जागृत होवून अशा अपराधांच्या घटनांचा एकजुटीने निषेध करावा, जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल. या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही ,यासाठी प्रत्येकाने सजग राहणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगिले.
सचिव अभिजीत देशमुख म्हणाले, मानवी तस्करी व लैंगिक व्यापार थांबविण्यासाठी पोक्सो कायदा, बाल कामगार कायदा, मानवी तस्करी प्रतिबंधक सारखे अन्य कायदे अस्तित्त्वात आहेत. बरेचदा पीडितांना याबाबत माहिती नसते. यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने वर्षभर विविध कायदयांची माहिती देणारे जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत असून या कार्यक्रमांमुळे समाजात सकारात्मकता वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती अपर्णा कोल्हे यांनी महिलांवर होणारे अन्याय व अत्याचार व त्यांच्यावर होणाऱ्या शोषणाबद्दल माहिती दिली. या योजनेतंर्गत बळी पडलेल्या पीडितांना सोयी'-सुविधा मिळविण्याकरिता तयार करण्यात आलेल्य कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य ॲड. राजेंद्र राठी म्हणाले, हा विषय खूप गंभीर असून याबाबत राष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. मानवी तस्करी आणि व्यापारी लैंगिक शोषणाचे बळी योजना 2015 या योजनेतील तरतुदी सांगून त्याचा पीडितांना कशा प्रकारे लाभ मिळू शकतो, याबाबत माहिती दिली.
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण मार्गदर्शन करतांना म्हणाले, प्रत्येक ग्राम स्तरावर बाल रक्षक शिक्षक समितीमध्ये शिक्षक हे सदस्य असतात. यासाठी शिक्षकांनी शाळाबाहय विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. तसेच लैंगिक शोषणाच्या पीडित बालकांना मदत करून त्यांच्यामध्ये सकारात्मकता वाढवावी, असेही ते म्हणाले.
सेव्ह द चिल्ड्रेन ऑफ इंडियाचे अनिरुद्ध पाटील म्हणाले, बळी पडलेल्या पीडितांना सोयी-सुविधा मिळविण्याकरिता कायदे तयार केले आहेत. महिला व बाल विकास, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पोलिस विभाग यांनी संयुक्तरित्या कार्य केल्यास आरोपीला कठोर शिक्षा होवू शकते. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असते कारण पिडीतांचा सर्वात आधी संबंध पोलिसांशी येतो. यामुळे पोलिस विभागाचे कार्य हे समाज सेवेचे कार्य असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेला पोलिस अधिकारी, शिक्षक, समाजसेवक, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या श्रीमती ॲड. सुरेखा बोरकुटे यांनी केले.
*******
No comments:
Post a Comment