· मेयो व मेडिकलमध्ये तपासणीसाठी वेळ निश्चित
· नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या
· कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना तपासणी बंधनकारक
नागपूर, दि. 14: कोरोना विषाणूबाधित संशयितांपैकी आज आणखी एका रुग्णाची तपासणी पॉझिटिव्ह आल्यामुळे विषाणूबाधितांची संख्या चार झाली आहे. या चारही रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच मेयो (इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात) उपचार सुरु असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.
कोरोना विषाणूसंदर्भात विभागात सुरु असलेल्या उपाययोजनांच्या आढावा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. संशयित नागरिकांना या विषाणूच्या संदर्भातील तपासणी करतांना वैद्यकीय महाविद्यालयात गैरसोय होणार नाही. तसेच तपासणीच्या वेळा निश्चित करुन त्यानुसार संशयितांची तपासणी करावी. अशा सूचनाही विभागीय आयुक्तांनी यावेळी दिल्यात.
महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकूर, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव, आरोग्य उपसंचालक डॉ.संजय जयस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, पोलिस उपायुक्त श्रीमती श्वेता खेडकर, महानगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ.भावना सोनकुसरे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोरोना विषाणूसंदर्भात आतापर्यंत 80 पेक्षा जास्त संशयितांची नोंद करण्यात आली आहे. संशयित तसेच विषाणूबाधितांच्या संपर्कात आलेल्या 56 रुग्णांचा पाठपुरावा करण्यात येत असून त्यापैकी दोन्ही शासकीय महाविद्यालयात 38 रुग्ण भरती आहेत. भरती असलेल्या रुग्णांची तपासणी सुरु असून त्यापैकी आतापर्यंत चार रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे सिद्ध झाले आहे. 14 दिवसाची तपासणी पूर्ण झालेल्या 31 रुग्णांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत असून, आजपर्यंत 813 प्रवाशांची तपासणी करण्यात आली असता कुणालाही लक्षणे आढळून आलेली नाहीत. विमानतळावर येणाऱ्या देशाबाहेरील येणाऱ्या नागरिकांची दररोज तपासणी कण्यात येत आहे. तपासणीनंतर आलेल्या सर्व नागरिकांची नोंद घेण्यात येत असून त्यानुसार त्यांच्यावर 14 दिवस पाठपुरावा करण्यासाठी महानगरपालिका व आरोग्य विभागातर्फे विशेष पथके तैनात करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूसंदर्भात संशयित रुग्ण तसेच संशयित आहेत तसेच ज्यांना ताप, खोकला आदी लक्षणे आढळून आली आहेत. विषाणूबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करणे बंधनकारक आहे. नागरिकांनी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सात देशातून आलेल्या तसेच बाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना विषाणूसंदर्भात असलेल्या तपासण्या करणे आवश्यक तसेच बंधनकारक आहे. तपासणी करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच मेयो येथे सकाळी 8 ते 11 व दुपारी 2 ते 5 या वेळात सॅम्पल घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सॅम्पल घेतल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक सूचना देण्याची सुविधासुद्धा करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
विभागात प्रतिबंधक उपायांची विविध माध्यमाद्वारे नागरिकांना माहिती देण्यासाठी विशेष अभियान सुरु असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासन, महानगरपालिका तसेच आरोग्य विभागातर्फे केंद्र व राज्य शासनाच्या कोरोना विषाणूसंदर्भात राबवायच्या उपाययोजनाबाबत दिलेल्या निर्देशानुसार संयुक्तपणे प्रभावी व परिणामकारक कार्यवाही सुरु असल्याचे डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.
नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत
कोरोना विषाणूसंदर्भात प्रशासनातर्फे नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 2562668 तर महानगरपालिका कार्यालयातील नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक 2567021 हा असून नागरिकांना 24 तास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येईल.
No comments:
Post a Comment