Sunday, 15 March 2020

कोरोना विषाणूसंदर्भातील तपासणीसाठी सहकार्य करा - डॉ. संजीव कुमार


• तपासणीसाठी संशयितांनी सहकार्य करण्याचे आवाहन

• विमानतळावर 957 प्रवाशांचे स्कॅनिंग
नागपूर, दि. 15: कोरोना विषाणूबाधित संपर्कातील व्यक्तीसोबतच केंद्र शासनाच्या सूचनेनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालेल्या प्रवाशांची स्कॅनिंग करण्यात येत असून, आतापर्यंत 957 प्रवाशांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. कोरोना संशयित 49 व्यक्तींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत भरती करण्यात आले होते, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.
कोरोना विषाणूसंदर्भात जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, महानगरपालिका, पोलिस विभाग तसेच विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभावी व परिणामकारक उपाययोजना राबविण्यात येत आहे. संशयित नागरिकांना या विषाणूसंदर्भात तपासणी करण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जनतेनेही कोरोना विषाणूसंदर्भातील आवश्यक खबरदारी घेण्यासोबतच स्वच्छतेच्या दृष्टीने आरोग्य विभागातर्फे दिलेल्या सूचनांचे पालन करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.
विभागात आतापर्यंत 98 संशयित आढळून आले आहे. यासंदर्भात 11 जणांना भरती केले असून, भरती करण्यात आलेल्यांची संख्या 49 आहे. एकूण तपासणी केलेल्या 57 नमुन्यापैकी 32 नमुने निगेटिव्ह आढळले असून, 4 नमुने पॉझिटिव्ह आहेत. या चारही पॉझिटिव्ह रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची सुद्धा तपासणी करण्यात येत असून 65 नागरिकांचा पाठपुरावा सुरु आहे. तसेच 14 दिवस पाठपुरावा केलेल्या 33 रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी स्कॅनिंगची सुविधा असून, काल 144 विमान प्रवाशांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. या सर्व प्रवाशांशी संपर्क करण्यासाठी विशेष गट तयार करण्यात आले आहेत. या प्रवाशांच्या संपर्कात राहून या संसर्गासंदर्भात काही आढळून आल्यास त्यांची तपासणी करण्याची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत 957 प्रवाशांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे.


वर्क फ्रॉम होमची सुविधा द्या
कोरोना विषाणूसंदर्भात खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर विभागातील माहिती तंत्रज्ञान तसेच इतर उद्योगांनी कामगारांना वर्क फ्रॉम होम (घरुन काम करण्याची सुविधा) उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.
कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजना अंतर्गत शासनाने विविध सूचना लागू केले आहे. त्याअनुषंगाने उत्पादनावर परिणाम होणार नाही. तसेच घरुन काम करण्याची सुविधा सहज उपलब्ध आहे. अशा माहिती तंत्रज्ञान व इतर आस्थापनाने दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत ही सुविधा लागू करावी, असे उद्योग समुहांना विभागीय आयुक्तांनी आवाहन केले आहे.
******

No comments:

Post a Comment