Friday, 23 January 2026

विशेष वृत्त बेवारस रुग्णांना मिळाले आप्त मेडिकलच्या सामाजिक सेवा विभागाचा पुढाकार




 बेवारस म्हणून दाखल झालेल्यांपैकी अनेकांना गेल्या वर्षभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेड़िकल) समाज सेवा विभागाने त्यांचे आप्त मिळवून दिले आहेत.


           मध्य भारतातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असलेल्या मेडिकलमध्ये विदर्भच नव्हे, तर शेजारील मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेंलगणा या राज्यांतूनही मोठ्या संख्येने रुग्ण येत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेडिकलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून परिसर सौंदर्यीकरणासहच रोबोटिक सजर्रीसारख्या  अत्याधुनिक आरोग्य सुविधा येथे उपलब्ध आहेत. कोणीही व्यक्ती पैसे नाही म्हणून उपचाराशिवाय राहू नये, हा मुख्यमंत्र्यांचा या मागील उद्देश आहे. त्यामुळे गरीब रुग्णांचा मोठा फायदा होत आहे.


      रस्त्यावर बेवारस स्थितीत आढळलेल्या रुग्णांचे मेडिकल तर हक्काचे स्थान आहे. पोलिस किंवा  सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते अशा रुग्णांना येथे दाखल करीत असतात. आयुष्मान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजना यासारख्या योजनांच्या माध्यमातून अशा रुग्णांवर उपचार केले जातात. या  रुग्णांवर उपचार झाले की त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी येथील सामाजिक सेवा विभागाची असते. यातील अनेक रुग्ण आरोग्य योजनांच्या निकषात बसत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावरील उपचरांसाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद हा सामाजिक सेवा विभाग करीत असतो. त्यासाठी विविध सामाजिक संघटना, दानशूर व्यक्ती यांना या विभागातर्फे आर्थिक मदतीचे आवाहन केले जाते. 

        

        उपचार सुरू असतानाच या रुग्णांच्या नातेवाईकांचा शोध सुरू होतो. त्यांना शोधणे अतिशय जिकिरीचे असते. कारण अनेकदा  रुग्ण बोलण्याच्या स्थितीत नसतात, काही रुग्ण बाहेरील राज्यांतील असले, तर वेगळ्या भाषेमुळे त्यांच्याशी संवाद साधता येत नाही. मात्र या अडथळ्यांवर मात करीत या रुग्णांना त्यांच्या कुटुंबीयांकडे पोहचविण्याचे काम सामाजिक सेवा विभाग करीत असतो. २०२५ या वषर्भरात अशा जवळपास चाळीस रुग्णांना त्यांच्या कुटुंबात पोहचविण्यात आले. मात्र शोध घेऊनही ज्यांचे नातेवाईक सापडत नाही, अशांचे पुनर्वसन सामाजिक संघटनांच्या मदतीने करण्यात येते. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारीही अशाच संघटनांच्या माध्यमातून पार पाडली जाते.


ही आमची जबाबदारी- डॉ अविनाश गावंडे


      कोणीही वाली नसलेले असे ८ ते १० रुग्ण दर महिन्यात मेडिकलमध्ये दाखल होत असतात. त्यांच्यासोबत कोणी घरचे नसल्याने त्यांना भावनिक आधार द्यावा लागतो. बेवारस रुग्णांवर उपचार करून त्यांचे पुनवर्सन करणे ही आमची जबाबदारी आहे. राज्य शासनातर्फे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. बरे होऊन हे रुग्ण जेंव्हा आपल्या घरी जातात, तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण असतो ,असे

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूरचे वैद्यकीय अधीक्षक,  डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले आहे.

                                                                            ००००००

No comments:

Post a Comment