माहिती व जनसंपर्क विभागातर्फे व्याख्यान
नागपूर,दि. ७ : मुक्या प्राण्यांनाही माणसांप्रमाणे भावना, संवेदना असतात. त्यामुळे आपण माणसांवर जसे प्रेम करतो, तसेच प्रेम प्राण्यांवरही केले पाहिजे, असे प्रतिपादन टेलिपथीद्वारे प्राण्यांशी संवाद साधणाऱ्या ॲड वैदेही पेंडसे यांनी आज येथे केले.
माहिती व जनसंपर्क विभागातर्फे मासिक उपक्रमांतर्गत आज श्रीमती पेंडसे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. 'टेलपथीद्वारे प्राण्यांशी संवाद' या विषयावरचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम केलेल्या ॲड. पेंडसे म्हणाल्या की, प्राण्यांशी कसा काय संवाद साधता येतो किंवा त्यांच्याशी कसे बोलता येते असे प्रश्न अनेकांना पडतात. सुरुवातीला मलाही ते पडायचे. मात्र हा अभ्यासक्रम केल्यानंतर मला त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या भावना कळू लागल्या आहेत. ही एक शास्त्रीय पद्धत आहे. प्रत्येक प्राण्याकडे एक सुपर नचरल पॉवर असते. त्यामुळे त्यांना सभोवतालच्या बऱ्याच गोष्टी आधीच कळू शकतात.
आपल्याला घरून बाहेर निघायचे असेल त्यावेळी घरातील कुत्रा पायाशी येऊन घुटमळायला लागतो. त्याला आपल्याल काय सांगायचे, हे मला या अभ्यासक्रमातून शिकता आले.प्राण्यांनाही त्यांचे दुःख मोकळे करायचे असते. आपल्या घरी येणारा नकारात्मक वृत्तीचा व्यक्ती किंवा भविष्यातील संकटाचे संकेतही कुत्रा किंवा मांजरीसारखे प्राणी त्यांच्या कृतीतून देत असतात. मांसाहारासाठी एखाद्या प्राण्याला कापले जाते त्यावेळी त्यांच्या मनातील भावना, त्यांच्या डोळ्यातील भीती आपल्याला कळू शकते. त्यामुळे प्राण्यांकडेही माणुसकीच्या नजरेने पाहण्याचा सल्ला पेंडसे यांनी दिला.
दिवाळीत कुत्र्यांच्या शेपटीला फटाके बांधणे, होळीला त्यांच्यावर रंग टाकणे हे क्रौर्य थांबविण्याचे आवाहन करून त्या म्हणाल्या की, टेलिपथी कम्युनिकेशनच्या माध्यमातून त्यांची व्यथा समजून घेता येते. प्राणी माणसांना नेहमी क्षमा करतात, प्रेम करतात. त्यामुळे एखाद्या कुत्र्याला कितीही मारले तरी तो पुन्हा आपल्याजवळ येतो. घरात नेहमी वाद होत असतील तर त्यावरील उपाय किंवा करिअर निवडीबाबातही प्राणी संकेत देऊ शकतात, असा दावा पेंडसे यांनी केला. या पद्धतीने जगातील कुठल्याही प्राण्याशी कोणत्याही वेळी संवाद साधता येऊ शकतो आणि त्यांना समजून घेता येऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
मुक्या प्राण्यांवर प्रेम करा, असा संदेश आपल्या संतांनीही दिला असल्याचे समारोपात विभागीय संचालक डॉ. गणेश मुळे म्हणाले. भाषेशिवाय देखील संवाद होऊ शकतो. भाषेचा उगम झाला नव्हता त्याहीवेळी संवाद होतच होता. आपण जर प्राण्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला तर ते बोलतात, उत्तम प्रतिसाद देतात, असा आपला अनुभव असल्याचे डॉ. मुळे यांनी सांगितले. संचालन मुख्यमंत्री कार्यालयाचे माध्यम समन्वयक अविनाश महालक्ष्मे यांनी केले.
000000

No comments:
Post a Comment