सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६४ वा महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव विभागीय पारितोषिक प्रदान समारंभ मंगळवार, ३० जून २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा, प्राथमिक फेरी, २२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा, प्राथमिक फेरी; तसेच प्रथम मराठी एकांकिका स्पर्धा, प्राथमिक फेरीतील पारितोषिक विजेत्या कलाकारांचा गौरव करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव हा राज्याच्या समृद्ध आणि वैभवशाली रंगभूमी परंपरेचा गौरव करणारा महत्त्वपूर्ण सांस्कृतिक उपक्रम आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांतील नाट्य संस्था, कलाकार, दिग्दर्शक, लेखक आणि तंत्रज्ञ यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध होऊन मराठी नाट्य परंपरेच्या जतन व संवर्धनास चालना मिळत आहे.
या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून नाट्यप्रेमी, कलाकार, रंगकर्मी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने या गौरव सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment