Saturday, 2 December 2017

खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या रिचा बागला‘दिलखुलास’मध्ये

मुंबई, दि. २: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासकार्यक्रमात खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रिचा बागला यांची मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून सोमवार, दि. ४ डिसेंबर आणि मंगळवार, दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी ७.२५  ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत संजय जोग यांनी घेतली आहे.
राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ स्थापनेमागचा उद्देश, महिला सक्षमीकरणासाठी समाजातील दुर्बल घटकांसाठी मंडळ राबवित असलेल्या योजना, मधुबन हा ब्रँड नेमका काय आहे, खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या विविध योजना व उपक्रम आदींविषयांची माहिती श्रीमती बागला यांनी दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

0 0 0

मंत्रालय लोकशाही दिन 4 डिसेंबरला

मुंबई, दि. 2 : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 4 डिसेंबर 2017 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.
            राज्यातील शासकीय, निम-शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संदर्भात मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत अशा अर्जदारांनी  दि. 4 रोजी सकाळी 11.45 वाजता संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील  व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कक्षात उपस्थित रहावे.
            मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यातील अर्जदारांना मंत्रालय लोकशाही दिनात मुख्यमंत्री महोदयांसमक्ष निवेदन करण्याकरिता मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार आहे, असेही सामान्य प्रशासन‍ विभागातर्फे एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.


0000

सहा महिन्यात प्लॅस्टिकवर बंदी - मुख्यमंत्री

राष्ट्रीय पर्यावरण परिषद -2017
मुंबई, दि. 2 : येत्या सहा महिन्यात प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी आणून, पर्यायी व्यवस्था करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
            आज राष्ट्रीय हरित लवाद व पर्यावरण विभागातर्फे एनसीपीएमध्ये आयोजित राष्ट्रीय पर्यावरण परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
            मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वातावरणात बदल होत आहे. पर्यावरणाचा प्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी जनतेचा सहभाग फार महत्वाचा आहे. समुद्रातील प्रदुषित पाण्यामुळे अरबी समुद्र किनारा प्रदुषितहोत आहे.यावर उपाय करण्यासाठी पाण्यावर प्रक्रिया करणार असून त्यासाठी पर्यावरण विभागाने काही नियम घालून दिले आहेत. लवकरच पर्यावरण विभागाच्या काही परवानग्या मिळणार आहेत. तीन-चार वर्षात हा प्रकल्प पुर्ण होईल. प्रदुषित पाणी समुद्रात सोडेलेले आढळणार नाही.
            मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी मेट्रोचे काम सुरु आहे. परंतु काही नागरिकांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याने काम रखडत आहे. मेट्रोचे काम दिवसा करावे, रात्री करु नये, धुळीचा त्रास होतो, इमारतींना तडे जातात असे काही मुद्दे आहेत. जनतेने विकासाला साथ दिली पाहिजे. मेट्रोमुळे दळणवळणाला गती येणार आहे. काम रखडत गेले तर कोट्यावधी रुपयांचे नुकसान होते. एकीकडे देशातील अनेक नद्या प्रदुषित आहेत. महाराष्ट्रात मात्र नदी स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे दोन वर्षात 11 हजार गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेली आहेत. दुष्काळावर त्यांनी मात केली आहे. यामध्ये लोकांचा सहभाग महत्वाचा होता.
            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्र अग्रेसर आहे. घराघरात आणि शहरात महत्वाच्या ठिकाणी स्वच्छतागृहे बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. नवीन पीढी पर्यावरण विषयक बाबीमध्ये अत्यंत जागरुक आहे. स्वच्छता अभियानात त्यांचा पुढाकार वाढत आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी समाजात जनजागृती करण्यासाठी सरकार कसोशिने प्रयत्न करीत आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणाले, मुंबईतील हवेत असलेले कार्बनडाय ऑक्साईड कमी करण्यासाठी विविध उपाय केले आहेत. राज्यातील 40 नद्या स्वच्छ केल्या आहेत. कारखान्यातील प्रदुषण कमी करण्यासाठी अनेक उपाय करीत आहोत. पर्यावरणाचे संतुलन कायम रहावे म्हणून लाखो झाडे लावण्याची मोहीम सरकारने पार पाडली आहे. प्लॅस्टिक कॅरिबॅग बंदीसाठी पर्यावरण विभाग वेगाने काम करीत आहे.
मुख्य सचिव सुमित मल्लिक म्हणाले, जगभर पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. भविष्यात ग्लोबल वॉर्मिंगचा धोका आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे. राज्य शासन पर्यावरणाच्या नियमांचे तंतोतंत पालन करीत असून जनतेलाही सहभागी करुन घेत आहे.
 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डॉ.डी.वाय चंद्रचूड म्हणाले, स्वच्छ भारत मिशन हा महत्वाचा कार्यक्रम असून त्यात जनतेचा सहभाग महत्वाचा आहे. प्रदुषण हटाव मोहिमेकडे एक सामाजिक चळवळ म्हणून पाहिले पाहिजे. शहरातील कचरा उचलण्याचे नियोजन हवे. प्लॅस्टिकच्या वस्तू, कॅरिबॅग वापरण्यावर बंदी पाहिजे. जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. ध्वनी प्रदुषण, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, प्रदुषित पाणी याबाबतच्या तक्रारी ऑनलाईन स्विकारल्या पाहिजेत. पर्यावरण बचाव मोहिमेसाठी प्रत्येक सरकारने, खासगी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी निधी राखून ठेवला पाहिजे. प्लॅस्टिकच्या वस्तुंचे रिसायकलिंग केले पाहिजे. सोलर ऊर्जेचा वापर वाढला पाहिजे.
            मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर म्हणाल्या, एकीकडे विकासाच्या मागे लागत असताना पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. सुनामी, ध्वनी प्रदुषण, पाणी प्रदुषण मानवाला घातक आहे.ग्लोबल वॉर्मिंग, प्लॅस्टिक वापराचा धोका आहे. प्रदुषणाच्या बाबतीत प्रचार आणि प्रसार गरजेचे आहे. प्रदुषणाच्या तक्रारी थेट प्रदुषण नियंत्रण बोर्डाकडे केल्या पाहिजेत.
राष्ट्रीय हरित लवादाचे चेअरमन न्या.स्वतंत्रकुमार म्हणाले, स्वच्छ भारत हे आपले व्हिजन आहे. त्यादृष्टिने सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. पर्यावरणाचा मानवी जीवनावर परिणाम होत आहे. त्यामुळे जागृत रहाणे गरजेचे आहे. समुद्र किनारे, रस्ते स्वच्छ करण्याची जबाबदारी एकट्या सरकारची नाही. जनतेने यात सहभाग नोंदवला पाहिजे.
            प्रारंभी राष्ट्रीय हरित लवादाचे चेअरमन न्या.स्वतंत्रकुमार यांनी प्रास्ताविक केले. पर्यावरण राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने तयार केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई उपस्थित होते.
 शेवटी गुजरात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष अरविंद अग्रवाल यांनी आभार मानले.
००००



उमरेड येथे वरिष्ठ स्तर न्यायालय कार्यान्वित

        नागपूर दि. 2 :- उमरेडच्या नागरिकांची अनेक दिवसाची मागणी आज पूर्ण झाली असली तरी पक्षकार, वकिल व न्यायाधीश या तीन घटकांनी सर्व प्रलंबीत प्रकरणे वेळेत निकाली काढण्याचा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर सुरु झाल्याचे सार्थक होईल, असे प्रतिपादन उच्च न्यायालय मुंबई, नागपूर व पालक न्यायमुर्ती आर. बी. देव यांनी आज केले.
            उमरेड येथे दिवाणी व फौजदारी न्यायालय तहसिल परिसरात आज दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर नव्याने निर्माण करण्यात आले असून या न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. बी. देव यांच्या हस्ते  कोनशिला अनावरण व दीप प्रज्वलन करुन उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागपूर व्ही. डी. डोंगरे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. के. फोकमारे , उमरेड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सी. जी. अखंडे उपस्थित होते.
            न्यामूर्ती देव म्हणाले, उमरेड ,भिवापूर व कुही  परिसरातील कास्तकार व गरीब माणसाला वेळेवर न्याय मिळाला पाहिजे. यासाठी पक्षकार व वकील यांनी न्यायालयांना सहकार्य करावे. वकीलांनी पक्षकारांना कमीत कमी वेळात न्याय मिळण्यासाठी आपले म्हणणे  न्यायालयात मांडावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
            अध्यक्षीय भाषणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. डोंगरे म्हणाले, उमरेड, भिवापूर व कुही या तीन तालुक्यातील वकील संघाने सातत्याने प्रयत्न केल्यामुळे आज उमरेड या ठिकाणी वरिष्ठ स्तर न्यायालय नव्याने सुरु होत आहे. ही उमरेड वासियांसाठी आनंदाची बाब आहे. ते पुढे म्हणाले की, उमरेड न्यायालयात साधारण 2100 वेगवेगळया विषयांचे प्रकरणे प्रलंबीत असून यामुळे या न्यायालयावर मोठा भार असून पक्षकारांचे हित बघून लवकरात लवकर प्रकरणांचा निपटारा करावा यासाठी वकील मंडळींनी सहकार्य करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            ते पुढे म्हणाले की, संगणकीकरणामुळे न्यायालयाच्या कामकाजात मोठा बदल झाला असून त्याचा फायदा न्याय प्रक्रिया जलद होण्यासाठी होतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            आपल्या प्रास्ताविकात उमरेड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सी. जी. अखंडे यांनी सांगितले की, सातत्याने पाठपुरावा व नागरिकांच्या सहकार्यामुळे आज नव्याने वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन झाले. ही उमरेडच्या जनतेला एक भेट आहे, असेही त्यांनी सांगितले.
            आभार प्रदर्शन  दिवाणी न्यायालय वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश एस. के. फोकमारे यांनी केले.
            यावेळी उमरेडचे आमदार सुधीर पारवे, नगराध्यक्षा विजयालक्ष्मी भदोरिया, जिल्हा न्यायाधीश व्ही. पी. गायकवाड, ओ. पी. जयस्वाल, एन. एम. जमादार, न्यायाधीश एस. व्ही. देशमुख, न्यायाधीश ए. व्ही. पंडीत, डी. बी. गुठ्ठे, सरकारी वकील नितीन तेलगोटे, परिसरातील नागरिक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                                        *****