Friday, 15 November 2019

आजच्या पिढीसमोर नवी आव्हाने - विभा डांगे

        नागपूर, दि. 15: पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती आपण बालदिन म्हणून साजरी करतो. आजच्या काळातील बालक तसेच पालक यांच्या पुढील आव्हाने आधीच्या पिढीपेक्षा वेगळी आहेत. त्यांचा विचार करून  बालकांचा विकास कसा  होईल, याचा विचार पालकांनी करावा असे विभागीय ग्रंथपाल श्रीमती विभा डांगे यांनी  सांगितले.
            शासकीय विभागीय ग्रंथालय येथे दिवाळी अंकाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती शैलजा वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.
           कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन करुन भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी ग्रंथपाल श्रीमती वि.मु.डांगे, जिल्हा माहिती अधिकारी यांनी श्रीमती शैलजा वाघ यांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले. सहाय्यक ग्रंथपाल संचालक श्रीमती मि.रा. कांबळे यांचे पुस्तक भेट देऊन श्रीमती माधुरी बोकडे यांनी स्वागत केले.
            ग्रंथपाल श्रीमती वि.मु.डांगे यांनी दिवाळी अंकाची परंपरा ही शंभर  वर्षांपेक्षा जास्त असूनही उत्साहाने सुरुच आहे आणि या पुढेही सुरुच राहणार असे सांगितले. दिवाळी अंकात संपूर्ण वर्षभरात घडलेल्या घटनांचे प्रतिबिंब पडलेले असते. वाईट विचार बाजूला करून नवीन चांगले विचार मांडले जातात. या कार्यालयाने सर्व समावेशक असे दिवाळी अंक प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले असून त्याचा सर्व वाचक मंडळींनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
          जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती शैलजा वाघ यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आपण बालक दिन म्हणून साजरी करतो. मराठीतच नव्हे इतर भाषेत सुद्धा बाल साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, कथा, कादंबरी या व्यतिरिक्त निरंजन घाटे, जयंत नारळीकर यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेली पुस्तके मुलांनी जरुर वाचली पाहिजे, असे सांगितले.
दिवाळी अंकाची सन 1909 पासून मनोरंजन मासिकापासून सुरू असलेली परंपरा सुरूच असून दिवाळी अंक वाचनातून ज्ञान, माहिती आणि मनोरंजन होते. आपले मन, मनगट आणि मस्तक जर बळकट असेल तर आपण कोणत्याही प्रसंगाला तोंड देऊ शकतो. वाचनाची आवड ही उपजतच असावी लागते. ज्यांना आवड असते त्यांना वाचन केल्याशिवाय चैन पडत नाही. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून पण वाचनाची आवड जोपासता येते. परंतु खरे समाधान हे पुस्तकातून पूर्ण होते. शासकीय विभागीय ग्रंथालय, कार्यालयाने साहित्य, शिक्षण, ज्ञान,आरोग्य, पाककला,भविष्य, विनोदी,बालसाहित्य अशा विविध प्रकारच्या दिवाळी अंकाच्या प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला हे पाहून समाधान व्यक्त केले. समाजात वाचनाची आवड, वाचन संस्कृती रुजविण्याकरिता व वाढविण्याकरिता अशा माध्यमातून केले जाते आणि ही काळाची गरज आहे. यावर्षी कमीत कमी 20 दिवाळी अंक वाचण्याचा निश्चय केला असल्याचे त्या म्हणाल्या.
            श्रीमती मि.रा. कांबळे, यांनी बालदिनाचे महत्त्व आणि आजच्या काळातील बालक पालक यांच्या पुढील आव्हाने सांगितली. तसेच वाचनसंस्कृती वाढविण्याकरिता दिवाळी अंकाच्या प्रदर्शनासारखे कार्यक्रम आवश्यक असल्याचे सांगितले.
              या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी राहुल मेंढे यांनी तर आभार प्रदर्शन तांत्रिक सहायक र.वा.शेंडे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विध्यार्थी, वाचक आणि कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.


*****

राष्ट्रीय लोक अदालत 14 डिसेंबर रोजी






नागपूर, दि. 15 : राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर यांच्या वतीने दिनांक 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. 
“साधता संवाद, मिटतो वाद” “आपसी समझोत्याने व सामंजस्याने वाद मिटवावे” या विषयावर या अदालतीमध्ये नागरिकांच्या समस्या व वाद मिटवण्यासाठी मार्गदर्शन होणार आहे. नागरिकांनी आपले वाद मिटविण्याकरिता या लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे  सचिव  धनराज काळे यांनी केले आहे.
**** 

लोकनायक बिरसा मुंडा यांना अभिवादन


        नागपूर, दि. 15 : लोकनायक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात महसूल उपायुक्त  सुधाकर तेलंग यांनी त्यांच्या प्रतीमेस माल्यार्पण करुन अभिवादन केले. 
यावेळी तहसीलदार श्रीमती हंसा मोहने यांनी बिरसा मुंडा यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाविषयी माहीती दिली. यावेळी उपायुक्त संजय धिवरे, उपायुक्त अंकुश केदार, सहाय्यक आयुक्त शैलेश मेश्राम, तहसीलदार श्रीमती प्रियदर्शनी बोरकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय
        लोकनायक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी त्यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  

यावेळी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, तहसीलदार श्री. इंगळे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

*****

राष्ट्रीय पत्रकारिता दिनाचे प्रेस क्लब येथे आयोजन


नागपूर‍ दि. 15 :  माहिती व जनसंपर्क कार्यालय, श्रमिक पत्रकार संघ आणि प्रेस क्लब नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवार दि. 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता प्रेस क्लब येथे राष्ट्रीय पत्रकारिता दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय पत्रकारिता दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या हस्ते होणार असून, ज्येष्ठ पत्रकार ल. त्र्यं. जोशी यांचे 'आजची पत्रकारिता व समाजमाध्यमे' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस ब्रह्माशंकर त्रिपाठी, पत्रकार संघ, नागपूरचे अध्यक्ष शिरिष बोरकर आणि जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती शैलजा वाघ-दांदळे उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला सर्व माध्यमकर्मी, पत्रकारितेचे विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती शैलजा वाघ-दांदळे यांनी केले आहे.
*****