Wednesday, 26 August 2026
र्व प्रकल्प निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्वक पूर्ण करा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले
सर्व प्रकल्प निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्वक पूर्ण करा
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले
नागपूर विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचा घेतला आढावा
रस्ते, पूल, वृक्ष लागवड आणि महत्त्वाच्या प्रकल्पांच्या प्रगतीवर असणार विशेष लक्ष
नागपूर,- नागपूर विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या रस्ते, पूल आणि शासकीय इमारतींच्या कामांना गती देऊन ती निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री( सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहेत. नागपूर येथील प्रादेशिक कार्यालयात आयोजित विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहाही जिल्ह्यांतील विकासकामांचा आढावा घेण्यात आला.
बैठकीस मुख्य अभियंता संभाजी माने, अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांच्यासह संबंधित जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते. या बैठकीत रस्ते, पूल, खड्डे दुरुस्ती, इमारती, हायब्रीड ॲन्युईटी, नाबार्ड, केंद्रीय मार्ग निधी, पूरहानी, वृक्ष लागवड आणि विविध महत्त्वाच्या प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.
बैठकीदरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विभागातील सर्व प्रमुख प्रकल्प, राष्ट्रीय व राज्य महामार्ग, ग्रामीण रस्ते, जोडणी आणि प्रशासकीय इमारतींच्या बांधकामाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. ज्या प्रकल्पांचे काम संथ गतीने सुरू आहे, त्या कामांना गती देऊन कंत्राटदारांनी वेळेची मर्यादा पाळावी, असे त्यांनी निर्देश दिले.
नागपूर प्रादेशिक विभागाच्या कार्यक्षेत्रात सहा जिल्ह्यांमध्ये रस्त्यांचे विस्तीर्ण जाळे आहे. विभागाच्या ३१ मार्च २०२६ अखेरच्या आकडेवारीनुसार एकूण रस्त्यांची लांबी ३८,२७९.१७ किलोमीटर नोंदविण्यात आली आहे. या कार्यक्षेत्रात ४४७ मोठे पूल, २,१४४ लहान पूल आणि २,५९१ मोऱ्या आहेत. जिल्हानिहाय पाहता नागपूरमध्ये १३०, भंडाऱ्यात १८, गोंदियात ३४, वर्ध्यात ५४, चंद्रपुरात ९४ आणि गडचिरोलीत ११७ मोठे पूल आहेत.
वृक्षलागवड टप्पा-२ अंतर्गत नागपूर प्रादेशिक विभागाला ४८,६४१ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून ३४,२०५ वृक्षांची लागवड झाली आहे. पावसामुळे वाहतूक खंडित झालेल्या रस्त्यांची माहितीही बैठकीत मांडण्यात आली. बैठकीत १५ कोटींपेक्षा अधिक किमतीच्या इमारतींची कामे, अर्थसंकल्पीय कामे, केंद्रीय मार्ग निधी, अमृतकाल रस्ते विकास योजना, मायनिंग कॉरिडॉर, एआयआयबी प्रकल्प तसेच प्रलंबित देयके आणि अन्य महत्त्वाच्या विषयांचा आढावा घेण्यात आला.
विभागातील रिक्त पदांची सद्यस्थिती, नागपूर शहरातील मानेवाडा चौक व म्हाळगीनगर चौक येथील उड्डाणपूल आणि त्यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाची सद्यस्थितीही बैठकीत मांडण्यात आली. तसेच चंद्रपूर येथील एसएनडीटी महिला विद्यापीठ प्रकल्प, नागपूर येथील महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, वारंगा टप्पा-२ , कल्याणेश्वर मंदिर विकास आणि अन्य महत्त्वाच्या इमारत प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला.
या बैठकीत सहा जिल्ह्यांतील सार्वजनिक बांधकामांच्या प्रगतीचा एकत्रित आढावा घेत रस्ते दुरुस्ती, वृक्ष लागवड, पूल व इमारतींची कामे आणि सुरू असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
नागपुरातील 'सारथी' आणि 'स्पोर्ट्स हब'च्या कामाची पाहणी
नागपुरात प्रस्तावित असलेल्या विभागीय छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या ('सारथी') बांधकामाची तसेच नागपूर स्पोर्टस हबची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. या बहुप्रतीक्षित दोन्ही प्रकल्पाचे बांधकाम दर्जेदार आणि ठरवून दिलेल्या मुदतीत पूर्ण व्हावे, या दृष्टीने त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
पाहणीदरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दोन्ही इमारतीचा आराखडा, उपलब्ध जागा, प्रस्तावित सोयी-सुविधा आणि बांधकामाची सद्यस्थिती याबाबत सविस्तर माहिती घेतली. 'सारथी' संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि संशोधनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व आधुनिक सुविधा या इमारतीमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच नागपूर स्पोर्टस हबच्या माध्यमातून अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या इमारतीचे बांधकाम अत्याधुनिक आणि मजबूत स्वरूपाचे असावे, यावर त्यांनी भर दिला.
Tuesday, 25 August 2026
नेत्रदान सामाजिक चळवळ बनवूया!
नेत्रदान सामाजिक चळवळ बनवूया!
नेत्रदान ही केवळ एक सामान्य वैद्यकीय प्रक्रिया नसून मानवी संवेदनेचे, त्यागाचे आणि सामाजिक जबाबदारीचे एक अत्यंत उदात्त रूप आहे. आपल्या मृत्युनंतरही आपले डोळे या जगात जिवंत राहून कोणाचे तरी आयुष्य उजळवू शकतात, ही भावनाच अत्यंत समाधान देणारी आहे. भारतात दरवर्षी 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत 'राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा' साजरा केला जातो. या पंधरवड्याचा मुख्य उद्देश लोकांमध्ये नेत्रदानाबद्दल असलेली भीती आणि गैरसमजांचे निरसन करणे आणि या चळवळीत अधिकाधिक लोकांना सहभागी करून घेणे हा असतो. या दिनानिमित्त हा लेख…
निसर्गाने दिलेली एक अद्वितीय आणि अमूल्य देणगी म्हणजे मानवी जीवन होय. आपल्या सुंदर आणि संवेदनशील डोळ्यांमुळे या जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घेता येतो. ऋतुचक्राचे बदलणारे विविध रंग, निसर्गाची अद्भूत जादू, सृष्टीचे विलोभनीय सौंदर्य आणि आपल्या प्रियजनांच्या चेहऱ्यावरील हास्य डोळ्यांमुळेच पाहाता येते. डोळे हे केवळ एक अवयव नसून मानवी भावना व्यक्त करण्याचे आणि बाह्य जगाशी नाते जोडणारे मुख्य माध्यम आहेत. परंतु आपण सर्वजण या निसर्गदत्त प्रकाशाचा आनंद घेत असताना नशिबाच्या किंवा वैद्यकीय कारणांमुळे अंधाराच्या सावटाखाली जगत असलेलेही अनेक लोक आहेत. ज्यांच्या आयुष्यात सूर्योदय आणि रात्रीचे चांदणे या दोन्ही गोष्टी केवळ एक न अनुभवलेली संकल्पना आहेत, त्या दृष्टिहीन बांधवांच्या अंधारमय आयुष्यात आशेचा किरण पसरवण्याचा आणि त्यांना पुन्हा हे जग स्वतःच्या डोळ्यानी ‘याची देही, याची डोळा’ पाहण्याची संधी देण्याचा सर्वोत्तम व पवित्र मार्ग म्हणजेच 'नेत्रदान' हा होय.
आपल्या देशात कॉर्नियल अंधत्व म्हणजेच डोळ्यातील पारदर्शक पटलाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या प्रचंड मोठी आहे. डोळ्यातील पारदर्शक पटलाला (कॉर्निया) कोणत्याही प्रकारची इजा झाल्यामुळे, संसर्ग झाल्यामुळे किंवा कुपोषण व जन्मापासूनच्या दोषांमुळे दृष्टी गमावलेल्या लोकांना 'कॉर्निया प्रत्यारोपण' या सोप्या शस्त्रक्रियेद्वारे पुन्हा दृष्टी मिळवता येते. दुर्दैवाने, भारतात नेत्रदानाची गरज आणि प्रत्यक्षात उपलब्ध होणारे कॉर्निया यांमध्ये एक खूप मोठी तफावत आहे. दरवर्षी देशात लाखांहून अधिक कॉर्नियाची गरज भासते, परंतु प्रत्यक्षात केवळ काही हजार नेत्रदानेच पार पडतात. या दरीमुळे हजारो दृष्टिहीन व्यक्तींना, ज्यांमध्ये लहान मुलांचा आणि तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे, आयुष्यभर अंधारात राहावे लागते किंवा वर्षांनुवर्षे दात्याच्या प्रतीक्षेत राहावे लागते. मृत्यू ही निसर्गाची अटळ घटना आहे. परंतु मृत्यूनंतर आपले हे मौल्यवान अवयव मातीत मिसळून जाण्याऐवजी किंवा अग्नीत भस्म होण्याऐवजी जर कोणाचे निरस आयुष्य प्रकाशमान करत असतील, तर त्याहून मोठे पुण्य कार्य किंवा जिवंतपणाचे लक्षण दुसरे कोणतेही असू शकत नाही.
समाजात नेत्रदानाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असण्यामागे वैद्यकीय सुविधांची कमतरता हे कारण नसून, जनजागृतीचा अभाव आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेले गैरसमज हेच मुख्य कारण आहे. अनेक लोकांना अशी भीती वाटते की नेत्रदान केल्यामुळे मृतदेह विद्रुप दिसेल किंवा अंत्यसंस्कारास विलंब होईल. परंतु हे पूर्णपणे वास्तवविरोधी आहे. नेत्रदानाची प्रक्रिया अतिशय वैज्ञानिक, सुटसुटीत आणि सन्मानपूर्वक केली जाते. प्रशिक्षित डॉक्टरांची तज्ज्ञ टीम मृतदेहाच्या ठिकाणी येऊन अवघ्या 15 ते 20 मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण करते. यामध्ये डोळ्यातील केवळ आवश्यक असा कॉर्नियाचा भागच काढला जातो आणि त्या जागी कृत्रिम पटल किंवा कापूस ठेवून पापण्या अत्यंत काळजीपूर्वक बंद केल्या जातात. त्यामुळे चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा डाग किंवा विद्रुपपणा येत नाही. याशिवाय, पुढील जन्मात व्यक्ती अंध जन्माला येईल असा अंधश्रद्धेवर आधारित विचारही समाजातील काही घटकांमध्ये दिसून येतो. वैद्यकीय आणि अध्यात्मिक दोन्ही दृष्टिकोनातून हा विचार पूर्णपणे फोल आहे; उलटपक्षी, मृत्यूनंतर अवयवदान करून दुसऱ्याचे आयुष्य उजळवणे हा सर्वात मोठा धर्म मानला गेला आहे.
नेत्रदान ही अत्यंत संवेदनशील आणि वेळेवर आधारित असलेली प्रक्रिया आहे, म्हणूनच यामध्ये वेळेचे नियोजन सर्वात महत्त्वाचे ठरते. व्यक्तीच्या मृत्युनंतर साधारणपणे चार ते सहा तासांच्या आत नेत्रदान होणे अनिवार्य असते. जितक्या लवकर कॉर्निया काढला जाईल, तितकी त्याची गुणवत्ता उत्तम राहते आणि शस्त्रक्रिया यशस्वी होण्याची शक्यता वाढते. मृत्युनंतर नातेवाईकांनी तत्काळ जवळची नेत्र पेढी किंवा रुग्णालयाशी संपर्क साधणे आवश्यक असते. डॉक्टर येईपर्यंत मृत व्यक्तीचे डोळे उघडे राहू नयेत म्हणून त्यावर ओल्या कापसाच्या पट्ट्या ठेवाव्यात, पंखा बंद ठेवावा आणि डोक्याखाली उशी ठेवून डोके थोडे उंच ठेवावे, जेणेकरून डोळ्यांमधील रक्तप्रवाह नियंत्रित राहतो.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नेत्रदानाचा संकल्प केला असो वा नसो, मृत्युनंतर त्याच्या निकटवर्तीयांची संमती ही कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या अनिवार्य असते. अनेकदा व्यक्ती हयातीत फॉर्म भरते, परंतु मृत्यूच्या वेळी कुटुंबातील सदस्यांना याबद्दल माहिती नसल्यामुळे किंवा ऐनवेळी घेतलेल्या भावनावश निर्णयामुळे नेत्रदान राहून जाते. म्हणूनच, जर आपण नेत्रदानाचा संकल्प करत असू, तर त्याची स्पष्ट कल्पना आपल्या कुटुंबातील सदस्यांना देणे आणि त्यांना या निर्णयामध्ये सहभागी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
शेवटी, नेत्रदान ही केवळ काही डॉक्टरांची किंवा शासकीय यंत्रणेची जबाबदारी नसून ती एक व्यापक सामाजिक चळवळ बनली पाहिजे. आपण आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग, जसे की वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस किंवा प्रियजनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नेत्रदानाचा संकल्प करून समाजापुढे एक नवा आदर्श ठेवू शकतो. रक्तदान हे जसे श्रेष्ठदान मानले जाते, तसेच नेत्रदान हे महादान आहे. आपण या जगात नसतानाही आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून हे जग पाहू शकतो आणि कोणाच्या तरी अंधारमय विश्वात कायमचा प्रकाश पसरवू शकतो. नेत्रदान पंधरवड्याच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येऊ या, अंधश्रद्धा व गैरसमज बाजूला सारूया, नेत्रदानाचा संकल्प करू या आणि इतरांनाही या महान कार्यासाठी प्रेरित करू या.
अतुल पांडे,
सहायक संचालक (माहिती)
Monday, 24 August 2026
मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) सोमवार, दि. २४ ऑगस्ट, २०२६. मंत्रिमंडळ निर्णय (एकूण - ४)
मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)
सोमवार, दि. २४ ऑगस्ट, २०२६.
मंत्रिमंडळ निर्णय (एकूण - ४)
(क्रीडा विभाग)
नॅशनल गेम्स, खेलो इंडिया स्पर्धेसह, दिव्यांगांच्या आणखी सहा स्पर्धांचा रोख पारितोषिक योजनेत समावेश
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिकांच्या रकमेत भरीव वाढ
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडू व त्यांचे मार्गदर्शक यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्याच्या योजनेत नॅशनल गेम्सह, खेलो इंडिया तसेच दिव्यांगाच्या आणखी सहा स्पर्धांचा समावेश करण्यास तसेच रोख पारितोषिक योजनेत सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची कठोर मेहनत, समर्पण आणि त्यांच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांच्या योगदानाचा यथोचित सन्मान करण्याच्या दृष्टीने ही पारितोषिक योजना सुधारीत करण्यात आली आहे. यात आता केंद्र शासन आणि इतर क्रीडा-प्रगत राज्यांच्या धर्तीवर रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठीच्या रोख पारितोषिकात भरीव वाढ करण्यात आली असून सुवर्ण पदकासाठी सात लाख (पूर्वी 5 लाख), रौप्यसाठी पाच लाख (पूर्वी 3 लाख) तर कांस्यसाठी तीन लाख (पूर्वी दीड लाख) अशी वाढ करण्यात आली आहे. वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्ससाठी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकासाठी अनुक्रमे १० लाख, ७ लाख, ५ लाख रुपये तर नॅशनल गेम्ससाठी अनुक्रम ७ लाख,५ लाख, ३ लाख रुपये आणि खेलो इंडियातील पदकासाठी अनुक्रम ३ लाख,२ लाख,१लाख रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे.
युथ ऑलिम्पिक आणि युथ पॅरा ऑलिंपिक स्पर्धेतील विजेत्यांच्या पारितोषिकांच्या रकमेत भरीव वाढ करण्यात आली आहे. सुवर्ण पदासाठी २२.५० वरून ५० लाख, रौप्यसाठी १५ वरून ३० लाख तर कांस्य पदासाठी ७.५ वरून २० अशी वाढ करण्यात आली आहे.
टेनिस, बॅडमिंटन आणि हॉकी संदर्भातील स्पर्धांचाही यात समावेश करण्यात आला. टेनिसच्या चार वेगवेगळ्या ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला तीन कोटी रुपये तर उपविजेत्यास दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
बॅडमिंटन स्पर्धेतील थॉमस कप, उबर कप, सदीरमन कप या स्पर्धांतील विजयी खेळाडूला ४० लाख तर उपविजेत्यास २० लाख अशी तरतूद करण्यात आली आहे. हॉकी स्पर्धांत अझलन शाह कप (वरिष्ठ) आणि चॅम्पीयन ट्रॉफीसाठी विजेत्यास ४० लाख तर उपविजेत्यास २० लाख आणि सुलतान जोहर कप (कनिष्ठ) विजेत्यास २० लाख तर उपविजेत्यास १० लाख रुपये पारितोषिक मिळणार आहे.
खेळाडूंना यशात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांचाही यथोचित सन्मानाची तरतूद यात करण्यात आली. क्रीडा मार्गदर्शकास खेळाडूच्या रोख पारितोषिक रकमेच्या १० टक्के रक्कम बक्षिस म्हणून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. खेळाडूने प्रमाणित केलेल्या मार्गदर्शकांना हे पारितोषिक दिले जाणार आहे. जास्तीत जास्त तीन क्रीडा मार्गदर्शकांना हे पारितोषिक विभागून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक प्रशिक्षण देणाऱ्यास ३० टक्के, कौशल्य विकास करणाऱ्यास ३० टक्के तर अंतिम व प्रगत प्रशिक्षण देणाऱ्यास ४० टक्के असे पारितोषिक सूत्र ठरवण्यात आले आहे.
बदलत्या काळानुसार आणि क्रीडा क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेनुसार, या योजनेचा पुनर्विचार करून ती अधिक सर्वसमावेशक, तर्कसंगत आणि खेळाडू-केंद्रित बनवता त्यात अनेक क्रीडा स्पर्धांचाही समावेश करण्यात आला आहे. वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स, नॅशनल गेम्स आणि खेलो इंडिया (सर्व प्रकार) स्पर्धेचा यात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर कर्णबधीर (डेफ), अंध आणि विशेष ऑलिम्पिकसाठी नव्याने स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये कर्णबधीर (डेफ) ऑलिम्पिक, आयबीएसए वडर्ल् चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप,वर्ल्ड गेम्स, अंध क्रिकेट वर्ल्ड कप, विशेष ऑलिंम्पिक, वर्ल्ड गेम्स फॉर मेंटली चॅलेन्जड, डेफ वर्ल्ड चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप (वरिष्ठ गट) या स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर सध्याच्या आठ देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धांची अट शिथिल करून देशांच्या सहभागानुसार पारितोषिकाची रक्कम ठरवली जाणार आहे. सांघिक प्रकारात १२ देशांचा तर वैयक्तिक प्रकारात १६ देशांचा समावेश असणाऱ्या स्पर्धेतील विजयासाठी १०० टक्के पूर्ण रक्कम, सांघिक ६ ते १२ देशांचा आणि वैयक्तीक ८ ते १२ देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धांसाठी ५० टक्के रक्कम तर सांघिक ४ ते ५ देशांचा समावेश आणि वैयक्तिकमध्ये ४ ते ७ देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धांसाठी २५ टक्के रक्कम पारितोषिक म्हणून दिली जाणार आहे. यामुळे जास्तीत जास्त खेळाडूंना याचा लाभ होणार आहे. याबाबतचा शासन निर्णयही लवकरच काढण्यात येणार आहे.
--००—
(उच्च व तंत्रशिक्षण विभाग)
नागपूर येथे लता मंगशेकर विद्यापीठ, अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ
दोन खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठांना मंजूरी
नागपूर येथे लता मंगेशकर विद्यापीठ तर अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ अशी दोन खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
नागपूर येथे व्ही.एस.पी.एम अँकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन या संस्थेने खासगी आरोग्य विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव दिला होता. या विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंग विद्याशाखांमधील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशॅलिटी अभ्यासक्रम सुरु होणार. संस्थेकडे १ हजार १३८ खाटांचे सूसज्ज रुग्णालय आहे.
तर अहिल्यानगर येथे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन या संस्थेने असे विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव दिला होता. या विद्यापीठाकडे वैद्यक विद्याशाखेतील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम शिकवण्याची व्यवस्था आहे. तसेच सर्व सुविधांनी युक्त असे ८३० खाटांचे रुग्णालय देखील आहे.
या दोन्ही संस्थाच्या विद्यापीठ स्थापनेच्या प्रस्तावांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (एनएमसी) च्या मार्गदर्शक तत्वांनुसार निरीक्षण समितीने पडताळणी करण्यात आली. समितीच्या शिफारसीवर आज मंत्रिमंडळ बैठकीत या दोन्ही खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठांच्या स्थापनेस मान्यता देण्यात आली.
--००—
(महसूल व वन विभाग)
जत नगरपरिषदेस प्रशासकीय इमारतीसाठी जमीन
सांगली जिल्ह्यातील जत नगरपरिषदेस प्रशासकीय इमारतीच्या उभारणीसाठी जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
मौजे जत येथील सर्व्हे क्रमांक ५१०/२३/१ मधील एकूण ६६०० चौ.मी. क्षेत्रापैकी २५८५ चौ.मी. शासकीय जमीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी जत नगरपरिषदेस देण्यात येणार आहे. ही जमीन नगर विकास विभागामार्फत कब्जेहक्काने, भोगाधिकार मूल्यरहित व महसूलमुक्त किंमतीने, भोगवटादार वर्ग-२ या धारणाधिकाराने प्रदान करण्यास देण्यात आली आहे.
या जमिनीचा वापर केवळ मंजूर प्रयोजनासाठी करणे बंधनकारक राहणार असून, शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय जमीन हस्तांतरित, गहाण अथवा तारण ठेवता येणार नाही. तसेच जमिनीवर अन्य व्यक्ती, संस्था किंवा कंपनीचे हक्क निर्माण होतील अशा प्रकारचे आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत आणि पूर्वमान्यतेशिवाय जमिनीचे पोटविभाजन करता येणार नाही.
जमीन प्रदानाच्या अनुषंगाने महसूल व वन विभागाच्या संबंधित शासन निर्णयातील तरतुदींनुसार जिल्हाधिकाऱ्यांसोबत करारनामा करणे बंधनकारक राहणार आहे. तसेच आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक असेल. मंजूर प्रयोजनासाठी जमिनीचा वापर बंद झाल्यास ती जमीन महाराष्ट्र शासनास विनामोबदला परत करावी लागेल.
जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याची किंवा त्यांची अन्यत्र व्यवस्था करण्याची तसेच मंजूर जमिनीचे संरक्षण करण्याची जबाबदारी जत नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची राहणार आहे. या जमिनीच्या संदर्भात कोणताही न्यायालयीन अथवा अन्य प्रकारचा वाद निर्माण झाल्यास त्याची जबाबदारीही जत नगरपरिषदेची राहील.
--००—
(विधि व न्याय विभाग)
पिंपळगाव बसवंत येथे होणार वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे पिंपळगाव बसवंत व परिसरातील नागरिकांना न्यायालयीन सेवा अधिक सुलभ आणि जलद उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
या न्यायालयासाठी मंजूर न्यायिक अधिकाऱ्यांच्या नियमित पदांमधून तसेच सहाय्यभूत कर्मचाऱ्यांच्या नियमित पदांमधून आवश्यक पदे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तरासाठी एक दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, एक अधीक्षक, दोन सहाय्यक अधीक्षक, एक लघुलेखक ग्रेड-२, दोन वरिष्ठ लिपिक आणि आठ कनिष्ठ लिपिक, अशी एकूण १५ नियमित पदे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
याशिवाय न्यायालयाच्या कामकाजासाठी बाह्ययंत्रणेद्वारे चार मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये दोन शिपाई, एक पहारेकरी आणि एक सफाईगार यांचा समावेश आहे.
या निर्णयामुळे पिंपळगाव बसवंत आणि परिसरातील नागरिकांना न्यायालयीन कामकाजासाठी दूरच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता कमी होऊन स्थानिक पातळीवर न्याय मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
००००
Friday, 21 August 2026
विश्व छायाचित्रण दिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन रामन विज्ञान केंद्रात २२ व २३ ऑगस्ट रोजी दोन दिवसीय प्रदर्शन
विश्व छायाचित्रण दिनानिमित्त छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन
रामन विज्ञान केंद्रात २२ व २३ ऑगस्ट रोजी दोन दिवसीय प्रदर्शन
नागपूर, दि. २१ : विश्व छायाचित्रण दिन २०२६ निमित्त रामन विज्ञान केंद्र व तारांगण, नागपूर यांच्या वतीने पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया (PRSI), नागपूर चॅप्टर आणि हिंदी पत्रकार संघ, नागपूर यांच्या सहकार्याने ‘Science through Lens’ या विषयावर विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे दोन दिवसीय प्रदर्शन २२ व २३ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
प्रेस छायाचित्रकारांनी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून विज्ञान, जिज्ञासा, संशोधन, शोध आणि वैज्ञानिक उपक्रमांशी संबंधित विविध विषयांना सर्जनशील स्वरूपात मांडले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवार, २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता करण्यात येणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता पारितोषिक वितरण व समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे नागपूर अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. रामन विज्ञान केंद्र व तारांगणाचे संचालक अमित मंडल, हिंदी पत्रकार संघाचे प्रमुख आनंद निर्बाण, नंदकिशोर पुरोहित, पीआरएसआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष (पश्चिम) एस. पी. सिंह, नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष यशवंत मोहिते, सचिव मनीष सोनी आणि कोषाध्यक्ष शरद मराठे यांच्यासह तिन्ही संस्थांचे अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
२२ ऑगस्ट रोजी उद्घाटन झाल्यानंतर हे प्रदर्शन २३ ऑगस्ट रोजीही नागरिकांसाठी खुले राहणार आहे. विज्ञान आणि छायाचित्रणाची आवड असलेले विद्यार्थी, युवक, छायाचित्रप्रेमी तसेच सर्वसामान्य नागरिकांना या प्रदर्शनाला भेट देऊन विविध छायाचित्रांचा आस्वाद घेता येणार आहे.
००००
एसआयआर प्रक्रियेतील कामे कालमर्यादेत पूर्ण करा -मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम-पूर्व विदर्भातील एसआयआर तयारीचा घेतला आढावा
एसआयआर प्रक्रियेतील कामे कालमर्यादेत पूर्ण करा
-मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम
पूर्व विदर्भातील एसआयआर तयारीचा घेतला आढावा
नागपूर, दि. 21 : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)-2026 प्रक्रियेतील टप्प्यातील सर्व कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी निवडणूक यंत्रणेला दिले.
सदर येथील नियोजन भवनात आज पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागपूरसह पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या SIR प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. जिल्हानिहाय कामाची प्रगती, मतदारांशी संपर्क, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी भेटी, मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी, सुधारित कालावधी, दावे व हरकती दाखल करणे, नोटीस टप्पा/ दावे व हरकती निकालात काढणे, अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली तसेच माहिती जाणून घेण्यात आली.
SIR प्रक्रियेतील सर्वच टप्पे अत्यंत महत्वाचे असून या टप्प्यातील कामकाजात कोणतीही दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोकलिंगम यांनी दिल्या. बैठकीला विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी सावन कुमार, चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त अकुनुरी नरेश, नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकित, नागपूर विभागाचे अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तसेच मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते. यावेळी संबंधित जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कामांचे सादरीकरण करण्यात आले.
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातील प्रत्येक टप्पा पारदर्शक, अचूक आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी आणि बूथस्तरीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश श्री. चोकलिंगम यांनी दिले.
पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील SIR प्रक्रियेच्या प्रगतीचा आढावा घेत, या प्रक्रियेतील सर्व टप्प्यातील कामाला आवश्यक ती गती देऊन निर्धारित कालमर्यादा पाळण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.
0000
Thursday, 20 August 2026
महा वॉकेथॉनमधून एक पाऊल जलसंपन्न महाराष्ट्रासाठी -मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
महा वॉकेथॉनमधून एक पाऊल जलसंपन्न महाराष्ट्रासाठी
-मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
मुंबई, दि. २१: माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारणातील उल्लेखनीय कामाचा आदर्श घेत त्यांची जयंती २१ ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. त्यानुसार राज्यात सर्व जिल्ह्यात महा वॉकेथॉन आयोजित करण्यात आली. या 'महा वॉकेथॉन'च्या माध्यमातून माती व पाण्याचे महत्त्व सांगत एक पाऊल जलसंपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी पडले आहे, अशी भावना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज व्यक्त केली.
वरळी येथील सागर पॉईंट जवळ आयोजित राज्यस्तरीय महा वॉकेथॉन उपक्रमाच्या कार्यक्रम प्रसंगी मंत्री राठोड बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानपरिषद उप सभापती सचिन अहिर, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, गायक संजू राठोड आदी उपस्थित आहेत.
मंत्री संजय राठोड म्हणाले, माती जपा, पाणी वाचवा आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवा, या संदेशातून राज्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. राज्यात सर्व जिल्ह्यात आयोजित या वॉकेथॉनमध्ये तीन लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला आहे. माती आणि पाणी संवर्धनासाठी लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने मृद व जलसंधारण विभागाने हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.
जलसंधारणासारख्या महत्त्वाच्या विषयावर मंत्रालयात केवळ बैठक किंवा सभागृहातील कार्यक्रम घेण्याऐवजी लोकांमध्ये जाऊन जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. माती आणि पाणी हे राज्याच्या भवितव्याशी निगडित विषय असून, त्यांच्या संवर्धनासाठी शासनाच्या प्रयत्नांना जनतेची साथ मिळणे आवश्यक आहे. विशेषतः युवकांनी या विषयाशी जोडले जाऊन जलसंधारणाच्या चळवळीला बळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारणाच्या कामांना संस्थात्मक स्वरूप देत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या विचाराला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप दिले. भविष्यातील महाराष्ट्रासाठी माती आणि पाण्याचे महत्त्व मंत्री राठोड यांनी यावेळी अधोरेखित केले.
‘महा वॉकेथॉन’ हा अभिनव उपक्रम
- उपसभापती सचिन अहिर
माती वाचवा, पाणी जिरवा आणि पाणी वाचवण्याची संकल्पना तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित ‘महा वॉकेथॉन’ हा अभिनव उपक्रम कौतुकास्पद आहे. पाणी ही प्रत्येकाची गरज असून जात-धर्माच्या पलीकडे जाऊन जलसंधारणाचा विचार जनमानसात रुजविणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद ही भविष्यातील पिढ्यांसाठी जलसंधारणाची लोकचळवळ उभी राहण्याची आशादायी सुरुवात आहे, असे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सांगितले.
जल व मृदसंधारणासाठी लोकसहभाग वाढविणे
- मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक
जलसंधारण दिनानिमित्त आयोजित महा वॉकेथॉनसारख्या उपक्रम कौतुकास्पद आहे. पावसाचे पाणी वाहून जाताना सुपीक मातीही वाहून जाते आणि पाणी जमिनीत मुरत नाही. त्यामुळे जल व मृदसंधारणासाठी लोकसहभाग वाढविणे गरजेचे आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी सुपीक जमीन आणि पाण्याची शाश्वत व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने जलसंधारणाच्या कामात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केले. स्व. सुधाकरराव नाईक यांनी दूरदृष्टीने मृद व जलसंधारण विभागाची निर्मिती केली असून, त्यांनी दिलेला ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश प्रत्यक्षात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यस्तरीय महा वॉकेथॉनचा शुभारंभ आरे दुग्ध वसाहत जवळ सागरी किनारा रस्त्यालगत प्रोमोनेट येथून करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर तुळशी रोपाला जल अर्पित करुन जलपूजन करण्यात आले. यावेळी माती व जलसंधारणाच्या संवर्धनासाठी उपस्थितांना शपथ देण्यात आली. यानंतर महा वॉकेथॉनची झेंडी दाखवून मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. अभिनेते पुष्कर श्रोत्री, क्रिकेटर इरफान पठाण, जॅकी भगनानी, रजनीश दुग्गल, संजीव-श्रवण, अनिल सिंग, झहीर शेख जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ग्रामविकास विभागाचे सचिव श्रीकांत पुलकुंडवार, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थींनी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक, सांस्कतिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्याने यावेळी उपस्थित होते.
तीन किलोमीटर महा वॉकेथॉनमध्ये मान्यवरांचा सहभाग
जलसंधारणाचे महत्व सांगणारी आणि महाराष्ट्राला जल सुरक्षेचा संदेश देणाऱ्या महा वॉकेथॉनमध्ये मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी संपूर्ण अंतर सहभागींसमवेत पायी चालून पूर्ण केले. त्यांच्यासोबत विधान परिषद उप सभापती सचिन अहिर, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, तसेच इतर विभागांचे सचिव सहभागी झाले होते. सर्वांनी सहभागीदारांसमवेत पायी चालत त्यांचा उत्साह वाढविला.
क्षणचित्रे
· आरे दुग्ध वसाहतीपासून ते मद्रासवाडी पर्यंत ३ किलोमीटरची महा वॉकेथॉन.
· अभिनेते पुष्कर श्रोत्री, माजी क्रिकेटर इरफान पठाण, गायक संजू राठोड यांच्यासह विविध मान्यवरांचा सहभाग.
· जल सुरक्षेचे महत्व पटवून देणारे माती वाचवा, पाणी जपा संबोधन गीत.
· तीन किलोमीटर महा वॉकेथॉनमध्ये अरबी समुद्राच्या साथीने विद्यार्थी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
· ईश्वरी चिठ्ठीच्या माध्यमातून सहभागीदारांना बक्षीस वितरण
जलसंधारण दिन विशेष जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया - संजय राठोड मंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र शासन
जलसंधारण दिन विशेष
जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया
- संजय राठोड
मंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र शासन
पाणी म्हणजे शेतीचा श्वास आणि विकासाचा आधार आहे. बदलते हवामान आणि घटती भूजल पातळी यामुळे जलसंधारणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जतन करून तो जमिनीत मुरवणे, ही काळाची गरज आहे. जलसंधारणातून मातीला नवजीवन, शेतीला आधार आणि भावी पिढ्यांना सुरक्षित भविष्य देण्याची ताकद आहे.
महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३०७.५८ लाख हेक्टर असून, त्यापैकी १७४.७३ लाख हेक्टर क्षेत्र शेतीखाली आहे. राज्यातील सुमारे ८२ टक्के शेती पावसावर अवलंबून असल्याने पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. राज्यातील २४१ लाख हेक्टर क्षेत्र पाणलोट विकासासाठी पात्र असून, त्यापैकी १८२.४७ लाख हेक्टर क्षेत्रावर मृद व जलसंधारणाची विविध कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित क्षेत्रावरही नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू आहेत.
महाराष्ट्र शासनाने जलसंधारणाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून विविध प्रभावी योजना राबविल्या आहेत आणि राबवत आहे. राज्याला जलसुरक्षिततेच्या दिशेने सक्षमपणे पुढे नेण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सातत्याने कार्यरत असून जलस्रोतांचे संवर्धन, भूजल पुनर्भरण, विकेंद्रित जलसाठ्यांची निर्मिती आणि शाश्वत जलव्यवस्थापनाला प्राधान्य दिले जात आहे.
जलयुक्त शिवारातून गावांच्या जलसमृद्धीकडे
जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील अनेक गावांमध्ये जलसाठे वाढले, विहिरींच्या पाणीपातळीत सुधारणा झाली आणि संरक्षित सिंचनाला चालना मिळाली. ज्या शेतकऱ्यांना पूर्वी वर्षातून एकच पीक घेता येत होते, अशा अनेक भागांत दुबार पिकांच्या संधी निर्माण झाल्या आहेत. जलसंधारणामुळे निर्माण होणारे संरक्षित सिंचन केवळ शेतीपुरते मर्यादित राहत नाही, तर ग्रामीण बाजारपेठ, रोजगार, दुग्धव्यवसाय आणि लघुउद्योगांनाही चालना देते.
जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यशानंतर जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत राज्यातील ५,८५८ गावांमध्ये सुमारे १.४३ लाखांहून अधिक कामे प्रस्तावित झाली आहेत. त्यापैकी १.२४ लाखांपेक्षा अधिक कामे पूर्ण झाली आहेत. जुलै २०२६ अखेर या अभियानावर २,३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात आला आहे.
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार-पाण्यासोबत मातीलाही नवजीवन
‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही योजना पर्यावरण आणि शेती यांचा सुंदर समन्वय साधणारी आहे. धरणातील गाळ काढल्यामुळे पाणीसाठवण क्षमता वाढते, तर तोच सुपीक गाळ शेतात टाकल्यामुळे जमिनीची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता सुधारण्यास मदत होते.
२०२३-२४ ते २०२५-२६ या कालावधीत राज्यातील ३,३०५ जलाशयांमधून ९८०.५० लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला असून, तो सुमारे १ लाख ९३ हजार एकर क्षेत्रावर पसरविण्यात आला आहे. यासाठी सुमारे ३४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, ८१,११४ स.घ.मी. पाणीसाठा पुनर्स्थापित झाला आहे. म्हणजेच जलसंधारण हे शेतीला केवळ पाणी देत नाही, तर जमिनीलाही नवजीवन देते.
भूजल पुनर्भरण-भविष्याच्या जलसुरक्षेची गुरुकिल्ली
भूजल पुनर्भरण हा जलसंधारणाचा अत्यंत महत्वाचा नैसर्गिक फायदा आहे. गेल्या काही दशकांत भूजलाचा मोठ्या प्रमाणावर उपसा झाल्यामुळे अनेक भागांत विहिरी कोरड्या पडणे, बोअरवेलची खोली वाढणे आणि उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कमी होणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. याचा शेतीसोबतच संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतो.
पावसाचे पाणी योग्य पद्धतीने अडवून जमिनीत मुरविले, तर भूजल पातळी सुधारण्यास मदत होते. ही प्रक्रिया केवळ शेतीसाठी नव्हे, तर पिण्याच्या पाण्याच्या दीर्घकालीन उपलब्धतेसाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. भविष्यातील गंभीर पाणीटंचाईचे संकट टाळायचे असेल, तर भूजल संवर्धन आणि पुनर्भरणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल.
जलसंधारण म्हणजे पर्यावरणाचेही संवर्धन
जलसंधारणाचा पर्यावरणावरही अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. एखाद्या भागात पाणी टिकून राहिले, तर तेथील जैवविविधतेला आधार मिळतो. वृक्षसंवर्धनाला चालना मिळते, जमिनीतील ओलावा टिकतो आणि नैसर्गिक परिसंस्था मजबूत होण्यास मदत होते. अनेक ठिकाणी जलसंधारणाच्या कामांनंतर स्थानिक जैवविविधता आणि जलचरांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याची उदाहरणे दिसून येतात. त्यामुळे जलसंधारण ही केवळ विकासाची योजना नसून निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याची प्रक्रिया आहे.
हवामान बदलाच्या आव्हानाला जलसंधारणाचे उत्तर
आज हवामान बदल हे जगासमोरील सर्वात गंभीर आव्हानांपैकी एक आहे. पावसाचे स्वरूप बदलत आहे. काही दिवसांत अतिवृष्टी आणि त्यानंतर दीर्घ काळ पावसाचा खंड असे चित्र अनेक भागांत दिसून येते. अशा परिस्थितीत केवळ मोठी धरणे किंवा पारंपरिक सिंचन व्यवस्था पुरेशी ठरणार नाही.
गाव पातळीवर पाणी अडवणे, पाणलोट विकास करणे, नैसर्गिक जलमार्ग जिवंत ठेवणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे आणि स्थानिक जलस्रोत मजबूत करणे हा शाश्वत मार्ग आहे. हवामान बदल आणि पर्जन्यमानातील अनिश्चिततेचा विचार करून मृद व जलसंधारण विभागाने जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि लघु सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती दिली आहे. आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यावरही भर दिला जात आहे.
गुणवत्तापूर्ण कामे आणि कालबद्ध अंमलबजावणी
या सर्व उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाची महत्वपूर्ण भूमिका आहे. विभागाच्या नव्या प्रशासकीय आकृतिबंधाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पांच्या अंमलबजावणीला अधिक गती मिळाली आहे. मंजूर कामे मूळ आराखड्यानुसार आणि निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. गुणवत्तापूर्ण कामांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या असून, मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासारख्या महत्त्वाच्या उपक्रमांनाही प्राधान्य दिले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करून जलसंधारण अधिक परिणामकारक करण्यासाठी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून ५.२५ लाख हेक्टर क्षेत्रावर कामे
केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये १४० प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून सुमारे ५.२५ लाख हेक्टर क्षेत्रावर जलसंधारण, भूजल पुनर्भरण, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या उपजीविकेला चालना देणारी विविध कामे सुरू आहेत. या योजनेचे एकूण प्रकल्पमूल्य १,२५१.११ कोटी रुपये असून, जुलै २०२६ अखेर सुमारे १,००३ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.
मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन, सिमेंट बंधारे, पाणलोट विकास, नाला खोलीकरण, भूजल पुनर्भरण आणि लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या जलसंवर्धन उपक्रमांची प्रभावी सांगड घालत महाराष्ट्र जलसुरक्षिततेच्या दिशेने भक्कम वाटचाल करत आहे. नाला खोलीकरणाबरोबरच बांबू लागवडीसारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांवरही भर देण्यात आला आहे. विदर्भातील मालगुजारी तलावांची कामे वेळेत पूर्ण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हा दृष्टिकोन केवळ पाणी साठविण्यापुरता मर्यादित नसून जलस्रोतांचे दीर्घकालीन संवर्धन सुनिश्चित करणारा आहे.
जलसंधारण दिनातून राज्यव्यापी लोकचळवळ
महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्राला दूरदृष्टी आणि व्यापक दिशा देणारे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यात १५ ते २१ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे.
या अभियानाचा महत्वाचा भाग म्हणून आज २१ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन २०२६ — वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात आली आहे. “माती वाचवा , पाणी जपा , सुरक्षित भविष्य घडवा” हा या अभियानाचा मुख्य संदेश आहे. सर्व जिल्ह्यांत ३ कि.मी. ‘वॉक फॉर वॉटर’ आणि सामूहिक मृद व जलसंधारण शपथ आयोजित करण्यात आली आहे. नागरिक, युवक, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांना या उपक्रमातून जलसंधारणाच्या लोकचळवळीशी जोडण्याचा प्रयत्न आहे.
युवकांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देत त्यांना या लोकचळवळीशी डिजिटल माध्यमातून जोडण्यासाठी ‘रील चॅलेंज’ स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. माती संवर्धन, पाणी बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, पाणलोट विकास आणि जलसंधारणाच्या नाविन्यपूर्ण कल्पना समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी युवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
प्रत्येक थेंब जपूया, महाराष्ट्र जलसमृद्ध करूया
जलसंधारण ही केवळ शासनाची योजना नाही, तर शासन आणि समाजाच्या सामूहिक सहभागातून यशस्वी होणारी लोकचळवळ आहे. शासन योजना आखू शकते, निधी उपलब्ध करून देऊ शकते, जलसंधारणाची कामे उभी करू शकते; पण त्या जलस्रोतांचे संवर्धन आणि पाण्याचा जबाबदारीने वापर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे.
शासनाचे दूरदृष्टीचे धोरण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रभावी नेतृत्व, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे सहकार्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर जलसमृद्ध, दुष्काळमुक्त आणि शाश्वत महाराष्ट्र घडविण्याचा आपला संकल्प अधिक दृढ होत आहे.
जलसंधारण दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव ठरू नये. तो प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनातील संकल्प बनला पाहिजे. घरातील पाणी असो, शेतातील पाणी असो किंवा गावातील जलस्रोत-प्रत्येक थेंब जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
चला, जलसंधारण दिनानिमित्त आपण सर्वजण संकल्प करूया—
पाणी अडवूया… पाणी जिरवूया…
माती वाचवूया… पाणी जपूया…
आणि जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवूया!
0000
मिहान इंडियाकडून विविध उपक्रमांसाठी १ कोटी ३५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेशांचे वितरण
मिहान इंडियाकडून विविध उपक्रमांसाठी १ कोटी ३५ लाख रुपयांची मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धनादेशांचे वितरण
नागपूर, दि. २० : मिहान इंडिया लिमिटेडतर्फे सामाजिक बांधीलकी जपत विविध लोकहिताच्या उपक्रमांसाठी सीएसआर निधीचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध संस्था आणि नागपूर महानगरपालिकेला एकूण १ कोटी ३५ लाख रुपयांचे धनादेश आज रामगिरी या मुख्यमंत्री निवासस्थानी प्रदान करण्यात आले.
यामध्ये जीविका फाऊंडेशनला सर्व्हायकल कॅन्सर लसीकरण अभियानासाठी २५ लाख रुपये देण्यात आले. नागपूर महानगरपालिकेला सांडपाणी व्यवस्थापनासाठी ३५ लाख रुपये, तर महिला सक्षमीकरण प्रकल्पासाठी ३५ लाख रुपये देण्यात आले आहेत. तसेच शहरातील हरित क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने वृक्षारोपणासाठी १० लाख रुपयांचा निधी महापालिकेला देण्यात आला.
याशिवाय वूमन्स एज्युकेशन सोसायटी, नागपूर येथील महाविद्यालयीन इमारत आणि सभागृहाच्या नूतनीकरणासाठी ३० लाख रुपयांचा सीएसआर निधी देण्यात आला. या निधीमुळे आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि नागरी सुविधांच्या विकासाला हातभार लागणार आहे.
या वेळी नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी-वखरे, गटनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्यासह मिहान इंडिया लिमिटेडचे अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
मेडिकल- मेयोमधील कामांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी सर्पदंश पीडित बालिकेच्या प्रकृतीची चौकशी
मेडिकल- मेयोमधील कामांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
सर्पदंश पीडित बालिकेच्या प्रकृतीची चौकशी
नागपूर, दि. 20 - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांची तसेच वैद्यकीय सुविधांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पाहणी करून समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई येथील सर्पदंश पीडित बालिकेच्या प्रकृतीचीही मुख्यमंत्र्यांनी चौकशी केली.
नागपुरातील मेडिकल आणि मेयो या दोन मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना विविध विकास कामांसाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामांची प्रगती पाहण्यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी येथे भेट दिली. रुग्ण तसेच रुग्णांचे नातेवाईक यांच्याही दृष्टीने या दोन्ही रुग्णालयांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत तसेच अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांची निर्मिती या ठिकाणी केली जात आहे. मेडिकलमध्ये एनआयसी, पीआयसीयू येथे भेट देऊन पीआयसीयूमधील व्हेंटिलेटर युनिटचे लोकार्पण यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे शस्त्रक्रियागृह, सर्जिकल आयसीयु येथेही मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना केल्या.
अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी सुरू असलेल्या कामांची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आदिवासी आश्रम शाळेतील सर्पदंश घटनेतील एक होण्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेतील एक विद्यार्थिनी नागपूरला मेडिकलमध्ये दाखल आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज या विद्यार्थिनीची भेट घेऊन तिच्या आईशी संवाद साधला. त्याचप्रमाणे या बालिकेच्या प्रकृतीची योग्य काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी डॉक्टरांना दिल्या.उपअधिष्ठाता डॉ. देवेंद्र माहोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, आ. मोहन मते, नगरसेवक रितेश गावंडे यावेळी उपस्थित होते.
मेयो येथे पाहणी
मेडिकलनंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेले. येथेही सध्या मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. या रुग्णालयात मेडिकल ब्लॉक, सर्जिकल ब्लॉक, शस्त्रक्रियागृह यांची पाहणी करून त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. झालेल्या कामांविषयी समाधान व्यक्त करतानाच कामाचा वेग वाढवा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यावेळी उपस्थित होते.
…आणि ‘सोबत पालकत्व प्रकल्पा’च्या साथीने सुरु झाले प्रीतीच्या आयुष्याचे नवे पर्व! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीने विवाह सोहळ्याला लाभली भावस्पर्शी किनार
…आणि ‘सोबत पालकत्व प्रकल्पा’च्या साथीने
सुरु झाले प्रीतीच्या आयुष्याचे नवे पर्व!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीने विवाह सोहळ्याला लाभली भावस्पर्शी किनार
नागपूर, दि. 20 : सहा वर्षांपूर्वीच्या कोव्हिड महामारीने अनेकांच्या आयुष्याला कधीही न भरून निघणाऱ्या जखमा दिल्या. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. कुणी आयुष्याचा सच्चा साथीदार गमावला, तर कुणाच्या आयुष्याची सुंदर स्वप्नच धुळीस मिळाली. अनेक भगिनींच्या आयुष्यावर अंधाराची छाया पसरली. अशाच संकटातून मोठ्या हिमतीने उभ्या राहिलेल्या प्रीतीच्या आयुष्यात गुरुवारी नव्या पर्वाची सुरुवात झाली. संकटाच्या काळात तिचे पालकत्व स्वीकारणाऱ्या ‘सोबत पालकत्व फाऊंडेशन’ च्या पुढाकाराने प्रीतीने शिवमसिंग ठाकूर यांच्याशी लग्नगाठ बांधली आणि आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. माजी आमदार संदीप जोशी आणि देवयानी जोशी यांनी तिचे कन्यादान केले. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ह्रद्य विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्याला भावी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.
लक्ष्मीनगर येथील राणी लक्ष्मी सभागृह येथे या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आमदार संजय भेंडे, महापौर नीता ठाकरे, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी- वखरे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह ‘सोबत पालकत्व फाऊंडेशन’चे अध्यक्ष व माजी आमदार संदीप जोशी आणि देवयानी जोशी आदी उपस्थित होते.
कोव्हिडच्या काळातील त्या भयाण दिवसांमध्ये आपल्या पतीचा जीव वाचविण्यासाठी प्रीती ही रेमडेसिव्हिर औषधाच्या शोधात होती. पण, सारे प्रयत्न अपयशी ठरले आणि तिने आयुष्याचा साथीदार गमावला. आपल्या दोन चिमुकल्यांसह नव्याने आयुष्य उभे करण्याचे मोठेच आव्हान तिच्यापुढे उभे ठाकले होते. पण, कदाचित नियतीने तिच्या आयुष्याची कहाणी तिथेच संपविलेली नव्हती. माजी आमदार संदीप जोशी व देवयानी जोशी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘सोबत पालकत्व प्रकल्पा’ने तिला मदतीचा हात दिला.
या प्रकल्पाच्या माध्यमातून केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर पालकत्वाचा आधार तिला मिळाला. रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन उभे राहिलेले हे पालकत्व काळाच्या प्रवाहासह अधिक घट्ट होत गेले. प्रीतीच्या आयुष्याला या नव्या आई-बाबांनी केवळ आधारच दिला नाही, तर तिच्या आयुष्यातील पुढचा महत्त्वाचा टप्पाही आपल्या मुलीप्रमाणे साजरा केला. ज्या व्यक्तीने त्या कठीण काळात तिच्या पतीसाठी रेमडेसिव्हिर मिळवून देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला, त्याच व्यक्तीने नंतर तिच्या आयुष्याला साथ देण्यासाठीही आपला हात पुढे केला. प्रितीसह तिच्या दोन मुलांचाही स्वीकार करण्याचे वचन त्याने दिले. प्रीतीच्या आयुष्याला स्थैर्य मिळावे आणि तिला नव्याने संसार थाटता यावा, यासाठी तिच्या विवाहाची जबाबदारी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आली. त्यामुळे हा विवाह केवळ दोन व्यक्तींना वैवाहिक बंधनात जोडणारा सोहळा न राहता, संकटाच्या काळात माणुसकीने दिलेल्या आधारातून एका नव्या आयुष्याला मिळालेली सुरुवात ठरला. कोव्हिड काळातील दु:खातून सुरू झालेल्या या प्रवासात संदीप आणि देवयानी जोशी यांनी स्वीकारलेले पालकत्व, प्रीतीचा विवाह आणि नवदाम्पत्याला मिळालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आशीर्वाद, या साऱ्यांनी त्या प्रवासाला एक भावस्पर्शी किनार लाभली होती.
या सोहळ्याचे आत्मिक समाधान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कोव्हिडच्या काळात घरातील कर्ता पुरूष गमावल्याने अनेक महिलांचे भवितव्य अंधःकारमय झाले. त्यावेळी सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून संदीप जोशी पुढे आले. जवळपास २९३ परिवारांची नोंदणी झाली. यापैकी शंभर परिवारांचे पालकत्व मी स्वीकारले. कोव्हिडपासून आजपर्यंत त्यांनी शिक्षण तसेच इतर गोष्टींकडे लक्ष दिले. आज त्यापैकी एका एकल मातेचा विवाह झाला आहे. पुढील काळात जवळपास ३०० मुलींचा विवाह होईपर्यंत ही जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. आज प्रीतीच्या विवाहामुळे तिच्या जीवनात एक प्रकारचे स्थैर्य येत असल्याचे आत्मिक समाधान आहे. याचा एक वेगळाच आनंद असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विवाह सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
कोव्हिडच्या संकटानंतरही आयुष्य थांबत नाही, तर योग्य वेळी मिळालेला आधार एखाद्याला पुन्हा उभे राहण्याचे बळ देऊ शकतो, याची जाणीव या विवाह सोहळ्याने करून दिली.
0000
अंबाझरी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन मनपाला सहकार्य करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अंबाझरी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन मनपाला सहकार्य करणार
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अंबाझरी तलावाची केली पाहणी
जलपर्णी निर्मूलन मोहिमेचे केले कौतुक
नागपूर, दि. 20 : नागपूरचे वैभव म्हणून अंबाझरी तलावाकडे पाहिले जाते. पाण्याची व्यवस्था नव्हती तेव्हा नागनदीवरील धरण किंवा साठवण तलाव म्हणून याकडे पाहिले जायचे. अनेक वर्ष या तलावाने पिण्याचे पाणी नागपूर शहराला दिले. मध्यंतरी जलपर्णीने हा तलाव व्यापला होता. मात्र, महानगरपालिकेने जलपर्णी नामशेष करण्यासाठी प्रयत्न केले व ते अत्यंत यशस्वी झाले आहेत. एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून हा तलाव विकसित करण्यासाठी राज्य शासन महानगरपालिकेला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नागपूरची ओळख असलेल्या ऐतिहासिक अंबाझरी तलावाचे सौंदर्य आणि पर्यावरणीय महत्त्व जपण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने राबविलेल्या जलपर्णी निर्मूलन मोहिमेची मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज पाहणी केली. तलाव जलपर्णीमुक्त करण्यासाठी मनपाने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत मुख्यमंत्र्यांनी स्वतः नौकेतूनही अंबाझरी तलावाची पाहणी केली.
यावेळी महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक नगरसेविका यांच्यासह मनपाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मनपातर्फे विशेष मोहीम
गेल्या काही महिन्यांपासून अंबाझरी तलावात मोठ्या प्रमाणात पसरलेल्या जलपर्णीच्या निर्मूलनासाठी मनपातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जलपर्णीमुळे तलावाचा मोठा परिसर व्यापला गेला होता. त्यामुळे तलावाचे नैसर्गिक सौंदर्य बाधित होण्यासोबतच जलतरणपटू आणि नौकायनाचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत होता.अंबाझरी तलावाला जलपर्णीच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली. सर्वांच्या प्रयत्नातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.
जलपर्णी काढण्यासाठी जेसीबी आणि वीड हार्वेस्टरचा वापर करण्यात आला. या मोहिमेमुळे तलावातील जलपर्णी मोठ्या प्रमाणात हटविण्यात आली असून अंबाझरी तलावाचा परिसर अधिक स्वच्छ आणि खुला झाला आहे. तलावाच्या संवर्धनासाठी मनपाने केलेल्या या प्रयत्नांची माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जाणून घेतली आणि उपक्रमाचे कौतुक केले.
Wednesday, 19 August 2026
वैनगंगा- नळगंगामुळे साकारणार हिरवे स्वप्न विदर्भाला नवसंजीवनीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प
वैनगंगा- नळगंगामुळे साकारणार हिरवे स्वप्न
विदर्भाला नवसंजीवनीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प
विदर्भ म्हणजे दुष्काळी प्रदेश, विदर्भ म्हणजे सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होणारा प्रदेश असे सारे नकारात्मक बोलले जात असताना आता हाच विदर्भ येत्या काळात सुजलाम- सुफलाम असा संपन्न प्रदेश होणार आहे. या प्रदेशावरील नकारात्मकतेचा हा डाग पुसून काढण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि जिद्दीने वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाच्या पूर्णत्वाच्या दिशेने त्यांनी पावले उचलली. प्रामुख्याने कोरडवाहू शेती असलेल्या विदर्भात पावसाच्या अनियमिततेमुळे निसर्गावर अवलंबून असलेली शेती तोट्यात येते आणि बळीराजा संकटात सापडतो. गेले कित्येक वर्षे हे असेच सुरू आहे. त्यासाठी काही ठोस उपाययोजना करणे आवश्यक होते. दोन टोकांवरील दोन नद्या जोडणे हा त्यावर उपाय होता मात्र हे आव्हान सोपे नव्हते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शिवधनुष्य उचलले. त्यामुळेच एक आधुनिक जलक्रांती या प्रकल्पामुळे होणार आहे. ९४ हजार ९६७.६६ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी ३१ हजार ४९४ हेक्टर जमीन आवश्यक आहे. गोसीखुर्द प्रकल्पात पावासाळ्यात उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी नळगंगा नदीकडे वळविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पावसाळ्यात फक्त सत्तर दिवस गोसीखुर्द धरणामधून पावसाचे वाहून जाणारे पाणी साठवून त्याद्वारे विदर्भाचे दुसरे टोक सुजलाम सुफलाम करण्याचा हा भगिरथ प्रयत्न आहे. यात गोसीखुर्दमधून ६३.७३ टीएमसी पाण्याची उचल करण्यात येईल व ते पाणी शेती, उद्योग तसेच पिण्यासाठी वापरता यावे म्हणून अंदाजे शंभर मीटर रुंद व ३८८ कि.मी. लांब मुख्य कालवा तयार करण्यात येईल. मुख्य कालव्याला जोडून ५० धरणांमध्ये साठवण, ३२ उपसा योजना आणि आठ जिल्ह्यांतील ३८ तालुक्यांमध्ये उपकालवे असतील. मुख्य कालव्यात १३ बोगदे असतील व त्यांची एकूण लांबी २० कि.मी.पेक्षा अधिक असेल.
गोसीखुर्द व नळगंगा यांच्यासह सैकी, मकरधोकडा, पांढराबोडी, जावली, लोअर वणा, बोर, धाम महाकाली, सुकळी, लोअर वर्धा, अपर वर्धा, बेंबळा, घोटा, हातोला, काटेपूर्णा, मन अशा सध्या अस्तित्वात असलेल्या अठरा धरणांचा वापर साठवणीसाठी होणार आहे. यापैकी दहा धरणांची उंची वाढवून त्यांची साठवण क्षमता वाढविण्याची योजना आहे. याशिवाय ३२ नवीन धरणे बांधली जाणार आहेत. विदर्भाचे चित्र बदलण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पामुळे ४ लक्ष ०४ हजार २८१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. परिणामी या भागातील शेतकरी दुबार वा तिबार पिके घेऊ शकतील. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेलच शिवाय या प्रकल्पात १५१.२० दशलक्ष घ.मी. पाणी उद्योगांसाठी राखीव असल्याने उद्योग विकासालाही चालना मिळेल. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल. या प्रकल्पात निम्न वर्धा, काटेपूर्णा, नळगंगा हे तीन प्रकल्प बॅलन्सिंग रिझरवायर म्हणून वापरण्यात येतील. त्यामुळे पाण्याचे वर्षभराचे नियोजन करता येईल.
या प्रकल्पामुळे ४ लक्ष ०४ हजार २८१ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येईल. त्यात गोसीखुर्द ते धारगाव ११८९० हे., गोसीखुर्द ते निम्न वर्धा १,६६,०४१ हे., निम्न वर्धा ते काटेपूर्णा १,४५,०३९ हे. व काटेपूर्णा ते नळगंगा ८१३११ हेक्टर असे क्षेत्र असेल. भंडारा, नागपूर, यवतमाळ, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यांना या प्रकल्पाचा प्रामुख्याने लाभ होणार आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील घरगुती व औद्योगिक पाणी वापराचा मोठा प्रश्न सुटणार आहे.
हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊन विदर्भ एक संपन्न प्रदेश अशी ओळख निर्माण करण्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे स्वप्न आहे. फक्त दोन नद्या जोडणे आणि इकडले पाणी तिकडे नेणे एव्हढ्यापुरताच हा प्रकल्प मर्यादित नाही, तर सिंचन क्षेत्रात मैलाचा दगड ठरणारा हा प्रकल्प साऱ्या देशासाठीच आदर्श वाटावा असा आहे.
अविनाश महालक्ष्मे
नागपूर
जलसंधारणाचा नागपूर पॅटर्न ठरतो प्रभावी विदर्भात ५४ हजार ४१३ कामे पूर्ण गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अंतर्गत १३८.९३ लक्ष घन मीटर गाळ काढला
जलसंधारणाचा नागपूर पॅटर्न ठरतो प्रभावी
विदर्भात ५४ हजार ४१३ कामे पूर्ण
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अंतर्गत
१३८.९३ लक्ष घन मीटर गाळ काढला
नागपूर, दि. १९ : शेतीला शाश्वत सिंचनासोबत कृषी उत्पादन वाढविण्यासाठी मृद व जलसंधारणांतर्गत जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत विविध विभागाच्या अभिसरणासोबत पाणलोट विकासांतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन तसेच माजी मालगुजारी तलावांच्या बळकटीकरणाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. नागपूर व अमरावती विभागात जलसंधारणांतर्गत ६५ हजार १७३ कामे मंजूर करण्यात आली असून, त्यापैकी ५४ हजार ४१३ कामे पूर्ण झाली आहेत. तसेच १० हजार ७६० कामे प्रगतीपथावर आहेत.
शेतामध्ये पडणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या संवर्धानासोबतच जलसंधारणाच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून पाणी अडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष अभियानाची अंमलबजावणी सुरू केली आहे. जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत प्रत्येक गावात वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्याच्या विशेष कार्यक्रमांतर्गत अमरावती विभागातील ७६९ गावांमध्ये २५ हजार १५९ उपाययोजना तर नागपूर विभागातील ७४२ गावांमध्ये १५ हजार १०२ कामांचे नियोजन करण्यात आले. या संपूर्ण प्रकल्पासाठी ९५३ कोटी ६७ लक्ष रूपये किमतीच्या कामाचे आराखडे तयार करण्यात आले आहे. त्यापैकी जुलै अखेर पर्यंत ३४ हजार १८४ कामे पूर्ण झाली असून, या कामांवर ६७२ कोटी १९ लक्ष रूपयांचा निधी खर्च झाला आहे.
जलयुक्त शिवार अभियान २.० विशेष निधीअंतर्गत नागपूर-अमरावती विभागातील २०७० गावांची निवड करण्यात आली असून, या गावांमध्ये १६ हजार २७८ कामांचे नियोजन करण्यात आले आहे. या कामांवर ७९६ कोटी ९८ लक्ष रूपये खर्च अपेक्षित आहे. विशेष निधीअंतर्गत जुलै अखेर १३ हजार ६९२ कामे पूर्ण झाली असून या कामांद्वारे ५५५१ कोटी २० लक्ष रूपयांचा निधी खर्च झाला आहे. विशेष निधीअंतर्गत अमरावती विभागातील ९६९ गावांत ९ हजार ८९ कामांची निवड करण्यात आली असून, या कामांवर ४९९ कोटी ८१ लक्ष रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी ६ हजार ८३४ कामे पूर्ण झाली आहेत.
नागपूर विभागातील १ हजार १०१ गावांची जलसंधारणाच्या विशेष निधीअंतर्गत निवड करण्यात आली आहे. यातंर्गत ७ हजार १८९ कामे मंजूर करण्यात आली असून यावर २९७ कोटी १७ लक्ष रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ६ हजार ८५८ कामे पूर्ण झाली आहेत.
मामा तलावांचे बळकटीकरण
विभागातील नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या बळकटीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. विभागातील १ हजार ४९ मामा तलावांच्या बळकटीकरणासाठी २३१ लक्ष रूपये खर्च करण्यात येत असून ३९५ तलावांचे बळकटीकरण पूर्ण झाले आहे.
नागपूर जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या बळकटीकरणांतर्गत २७ कामांना मंजुरी देण्यात आली असून १२ कामे पूर्ण झाली आहेत, तर उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ३६० कामांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी, १७२ कामे पूर्ण झाली, १८६ कामे प्रगतीपथावर आहेत. भंडारा जिल्ह्यातील ९५ कामांपैकी ४८ कामे पूर्ण झाली आहेत. तर ४७ कामे प्रगतीपथावर आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ४६० कामांपैकी १०३ कामे पूर्ण झाली आहेत, तर १६७ कामे प्रगतीपथावर आहेत. ४१ कामांना कार्यरंभ आदेश देण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील १०७ कामांपैकी ६० कामे पूर्ण झाली आहेत.
अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यातील २८ कामांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी १९ कामे पूर्ण झाली आहे.
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या अभियांतर्गत विभागातील जलसाठ्यातील १३५.७४ ल.घ.मी गाळ काढण्यात येणार आहे. त्यापैकी ८५.७९ लक्ष घ.मी गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. नाला खोलीकरण व रूंदीकरण यातंर्गत १२९.८७ लक्ष घ.मी गाळ काढून खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाला सुरूवात झाली असून त्यापैकी ५३.१४ ल.घ.मी नाला खोलीकरण व रुंदीकरणांतर्गत गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे.
पाणलोट विकास घटक प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना २.० अंतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन या योजनेंतर्गत अमरावती विभागातील २४ प्रकल्पांतर्गत ३ हजार ४२१ कामे सुरू आहेत. त्यापैकी २ हजार ७८१ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर ७५ कोटी ७९ लक्ष रूपये खर्च झाला आहे.
नागपूर विभागातील या योजनेंतर्गत २३ प्रकल्प मंजूर करण्यात आले असून, ४ हजार १३६ कामे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी आतापर्यंत ३ हजार ३४२ कामे पूर्ण झाली आहे. या कामांवर ७८ कोटी ७६ लक्ष रूपये खर्च झाला आहे. पाणलोट विकास घटक प्रधानमंत्री कृषी सिंचन २.० अंतर्गत नागपूर व अमरावती विभागात ४७ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये ७ हजार ५५७ कामांपैकी ६ हजार १२३ कामे पूर्ण झाली आहेत. पूर्ण झालेल्या कामांवर १५४ कोटी १५ लक्ष रुपये खर्च झाले आहेत.
नागपूर व अमरावती विभागात मृद व जलसंधारण प्रादेशिक क्षेत्रामध्ये जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात येत असून, अपूर्ण कामे नियोजित वेळात पूर्ण करण्यात येणार असून शेतीला सिंचनासोबतच भूर्गभातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. या उपक्रमामुळे कृषी उत्पादनामध्ये निश्चितच वाढ होणार आहे.
अनिल गडेकर
नागपूर
Tuesday, 18 August 2026
महा वॉकेथॉन २०२६’ मध्ये अभिनेते संजय दत्त यांचा सहभाग
महा वॉकेथॉन २०२६’ मध्ये अभिनेते संजय दत्त यांचा सहभाग
मुंबई, दि. १८ : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये
‘महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या राज्यव्यापी उपक्रमात सहभागी होण्यासाठी अभिनेते संजय दत्त यांना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी निमंत्रित केले असून, त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे.
जलसंधारणाचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचावा आणि हा उपक्रम लोकचळवळीचे स्वरूप धारण करावा, या उद्देशाने लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी, कलाकार, खेळाडू, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांना ‘महा वॉकेथॉन’मध्ये सहभागी करून घेण्यात येत आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कमाल ३ किलोमीटर अंतराची महा वॉकेथॉन आयोजित केली आहे. या वॉकेथॉननंतर सहभागींकडून मृद व जलसंधारणाची शपथ घेतली जाणार आहे. सहभागी नागरिकांना
ई-प्रमाणपत्र देण्यात येणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींचा जिल्हास्तरावर गौरव करण्यात येणार आहे.
या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरावर प्रथम १० विजेत्यांचा गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात येणार आहे. याशिवाय प्रायोजकांच्या माध्यमातून एकूण ७१ हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामध्ये प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच सोडतीद्वारे सात सहभागींची निवड करून प्रत्येकी ३ हजार रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.
‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ तसेच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश घेऊन होणाऱ्या या उपक्रमातून जलसंधारणाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह, तसेच १५ ऑगस्ट २०२६ ते
२६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून २१ ऑगस्ट रोजी होणारा ‘महा वॉकेथॉन’ जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पेंच प्रकल्पामुळे १ लक्ष हेक्टरवर कृषी क्रांती
पेंच प्रकल्पामुळे १ लक्ष हेक्टरवर कृषी क्रांती
ग्रामीण भागातील जनतेच्या उपजीविकेचा मुख्य स्रोत शेती आहे. शेतीला सिंचनाची जोड मिळाली तरच शेती किफायतशीर होऊ शकते. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याची उपलब्धता निर्माण करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढविली तर प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त उत्पादन मिळवता येऊ शकते. शाश्वत सिंचनामुळे शेतकरी पारंपरिक पिकांव्यतिरिक्त नगदी आणि फळ पिके घेऊ लागले आहेत. ही किमया पेंच सिंचन प्रकल्पाच्या निर्मितीमुळे सहज शक्य झाली आहे. नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील सुमारे १ लक्ष ४ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रावर पेंच सिंचन प्रकल्पामुळे कृषी क्रांती शक्य झाली आहे.
गोदावरी खोऱ्याच्या वैनगंगा उपखोऱ्यातील पेंच नदीवर तोतलाडोह व पेंच पाटबंधारे प्रकल्प नवेगाव खैरी पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाची साठवणूक क्षमता 230 दक्षलक्ष घनमिटर असून संकल्पीय उपयुक्त साठा 141.74 द.ल.घ.मी आहे. राज्यातील पूर्ण निर्मित सिंचन क्षमता करणारा हा पहिलाच प्रकल्प असून, उजव्या व डाव्या कालव्याद्वारे नागपूर व भंडारा जिल्ह्यातील १ लक्ष ४ हजार ४७६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे.
रामटेक, पारशिवनी, मौदा, कामठी व सावनेर या तालुक्यासह भंडारा जिल्ह्यातील भंडारा व मोहाडी तालुक्यात धान हे प्रमुख पीक आहे. धानासाठी आवश्यक असलेले मुबलक पाणी उपलब्ध नसल्यामुळे तसेच अनश्चित व अपुऱ्या पावसामुळे तसेच दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन शेतीवर त्याचा प्रतिकुल परिणाम होत होता. पेंच सिंचन प्रकल्पामुळे रब्बी व खरीप हंगामातील सर्वच पिकांना या सिंचनाचा लाभ झाला आहे. सिंचनामुळे शेतीची उत्पादकता वाढत असून आर्थिक स्वंयपूर्णता निर्माण झाली आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या राहणीमानात अमूलाग्र बदल झाला असून शेती ही जीवनदायनी ठरत आहे.
पेंच सिंचन प्रकल्पामुळे नागपूर व भंडारा जिल्ह्यातील पारंपरिक पिकांसोबतच ऊस, धान, लांब धाग्याचा कापूस, रब्बी पिके, उन्हाळी पि तसेच फळबागासह रोख नगदी पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या प्रकल्पाच्या उजव्या कालव्याद्वारे २७ हजार ३०० हेक्टर क्षेत्र, तर डाव्या कालव्याद्वारे ७३ हजार ९००० हेक्टर क्षेत्र तसेच दुबार पिकांतर्गत ३ हजार २७६ हेक्टर अशा १ लक्ष ४ हजार ४७६ हेक्टर क्षेत्रावर सिंचनाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. सिंचन प्रकल्पाची निर्मिती करतांना प्रस्तावित केलेल्या प्रकल्पीय सिंचन क्षमता पूर्ण करणारा हा प्रकल्प ठरला आहे. या प्रकल्पाची अद्यायवत किंमत १ हजार ६८५ कोटी ८८ लक्ष रू. असली तरी या प्रकल्पामुळे निर्माण झालेली सिंचन क्षमता ही प्रकल्पाच्या किमतीपेक्षा जास्तच आहे. मागील तीन दशकांपासून शेतकऱ्यांना या सिंचन प्रकल्पाचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे.
2/-
.2.
सिंचनासोबतच जलविद्युत निर्मिती
पेंच नदीवर तोतलाडोह येथे मुख्य धरण असून या प्रकल्पाचे बांधकाम १९८९ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. तोतलाडोह येथे पेंच जलविद्युत मुख्य धरण असून या प्रकल्पात १ हजार २४१ द.ल.घ.मी. एवढी साठण क्षमता असून उपयुक्त १ हजार १६ द.ल.घ.मी जलसाठा आहे. या प्रकल्पातून विद्युत निर्मिती झाल्यानंतर ३३ कि.मी अंतरावर नवेगाव खैरी येथे दुसऱ्या प्रकल्पाची निर्मिती केली आहे. या प्रकल्पाची साठवण क्षमता २३० द.ल.घ.मी असून संकल्पीय उपयुक्त साठा १४१.७४ द.ल.घ.मी आहे. या व्यतिरिक्त रामटेक जवळील खिंडसी जलाशयाचा पेंच प्रकल्पांतर्गत समावेश करण्यात आला असून येथे १०३ द.ल.घ.मी उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे.
पेंच प्रकल्पाचा उजव्या मुख्य कालव्याची लांबी ४८.५० कि.मी. असून या कालव्यातून प्रती सेकंद २८.४० घ.मी. पाण्याची वहन क्षमता आहे. या कालव्यामुळे नागपूर जिल्ह्यातील ३० हजार ५०० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ झाला आहे. याव्यतिरिक्त नागपूर शहरास पिण्यासाठी पाणी, कोराडी औष्णिक विद्युत केंद्रास वीज निर्मितीसाठी पाणीपुरवठा होत आहे. पेंच डाव्या मुख्य कालव्याची लांबी ३२.८५ कि.मी असून वहन क्षमता ९० घ.मी आहे. या कालव्याद्वारे नागपूर जिल्ह्यातील ५२ हजार ५०० हेक्टर व भंडारा जिल्ह्यातील २१ हजार ४०० हेक्टर अशा ७३ हजार ९००० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होत आहे.
शेतीला सिंचनाची जोड मिळाल्यामुळे परिवर्तनाची सुरवात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतीला शाश्वत सिंचनासाठी जलयुक्त शिवारसह विविध उपक्रम राबविले असून राज्यातील सिंचन प्रकल्पामुळे उपलब्ध असलेला जलसाठा सिंचनासाठी जास्तीत जास्त कसा वापरता येईल यासाठी विशेष योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. पेंच नदीवर बांधण्यात आलेल्या सिंचन प्रकल्पाच्या प्रकल्पीय सिंचन क्षमता व प्रत्यक्ष निर्मित सिंचन क्षमता पूर्ण करणारा हा प्रकल्प ठरला आहे. नागपूर व भंडारा जिल्ह्यातील कृषी क्रांतीला चालना देणारा या प्रकल्पामुळे आर्थिक विकासाला सुद्धा चालना मिळून सर्वसामान्य जनेतत आमूलाग्र बदल घडत आहे.
अनिल गडेकर
नागपूर
००००
मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)
मंगळवार, दि. १८ ऑगस्ट, २०२६.
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)
श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी. श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर व वाणिज्य संकुल आराखड्यातील ३ हजार ९९३ कोटी ९० लाख रुपयांच्या विकास कामांना गती लाभणार. पंढरपुरचे धार्मिक, पारंपरिक महत्व, वारकरी भाविकांची संख्या, स्थानिक परिस्थिती व प्रकल्पाची तातडीची गरज विचारात घेऊन विशेष पुनर्वसन धोरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार प्रकल्प बांधितासाठी विशेष पॅकेज देण्याच्या सुचनेला अनुसरून, जिल्हा प्रशासनाकडून धोरण सादर. (नगर विकास विभाग)
सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ट्रेडस प्लॅटफॉर्म प्रणालीचा वापर होणार. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक, कंत्राटदारांची प्रलंबित देयके वेळेत दिली जाण्यासाठी सुलभता येणार. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलातील टप्पा – २ मधील विविध क्रीडा सुविधांच्या कामांना मंजुरी. क्रीडा संकुलाच्या सुमारे ८० कोटी १२ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकातील कामांसाठी अनुदान मिळण्याचा मार्ग सुलभ. (क्रीडा विभाग)
सोलापूर शहरातील श्री. जांबुमनी मोची समाज सेवा मंडळास जागा देण्यास मंजुरी. शहर सोलापूर उत्तर सदर बझार येथील शैक्षणिक कारणासाठी आरक्षित असलेली ३ हजार ९१० चौ.मी. जागा सेवा मंडळाच्या शैक्षणिक उपक्रमाला देण्यात येणार. (महसूल विभाग)
पुणे जिल्ह्यातील मौजे मोशी ( ता. हवेली) येथील १५ हे. ०० आर. शासकीय जमीन क्रांतीवीर चापेकर समिती, क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय चिंचवड गाव, पुनरुत्थान समरसता गुरकुलम अनुदानित आदिवासी आश्रम शाळा (चिंचवड) यांना देण्यात येणार. या याठिकाणी मागास वंचित आदिवासी समाजासाठी सर्वांगीण विकासाचे केंद्र स्थापन करण्यात येणार. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)
पुण्यातील युसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप – २०३२ च्या आयोजनाला पाठबळ. पुणे ग्रँड टूर – २००६ स्पर्धेनंतर आता युसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप – २०३२ चे यजमानपद पुण्याकडे येणार. पुणे जिल्हा प्रशासन, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे ग्रँड टूर – २०२६ च्या यशस्वी आयोजनामुळे मिळणार संधी. युसीआय वर्ल्ड चॅम्पिनयशिप, २०३२ च्या निमित्ताने आशियातील पहिले यजमान पद भारताकडे. स्पर्धेच्या माध्यमातून सुमारे ३३० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल अपेक्षित. याकरिता स्पर्धा संयोजनासाठी शासनाकडून समर्थनपत्र, आर्थिक हमी, पायाभूत सुविधा व कार्यान्वयन विषयक विविध बाबींना धोरणात्मक मान्यता. (क्रीडा विभाग)
जायकवाडी प्रकल्प टप्पा – २ च्या ६ हजार ४७७ कोटी ८८ लाख रुपयांच्या आर्थिक तरतुदीस मंजुरी. टप्पा दोन मुळे गोदावरी खोऱ्यातील सिंदफणा नदीवरील माजलगाव धरणाच्या कामास गती मिळणार. यातून छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी व नांदेड या पाच जिल्ह्यातील सुमारे १ लाख ३१ हजार ६५२ हेक्टरला सिंचनाचा लाभ मिळणार. तसेच औद्योगिक पाणी पुरवठा, मत्स्य व्यवसाय, व विद्युत निर्मितीस चालना मिळणार. (जलसंपदा विभाग)
महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम २०१३ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. महाखनिज २.० या पोर्टलवर गौण खनिजाचे खाणक्षेत्रे, साठवणूक क्षेत्रे, वाहतूकीची अद्ययावत माहिती पारदर्शकपणे उपलब्ध होणार. गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखणे प्रभावी होणार. परराज्यातून येणाऱ्या गौण खनिजाचे वाहतूकीचे नियमन होणार, वाहतूक पास घेणे बंधनकारक. (महसूल व वन विभाग)
वित्त व नियोजन विभागांची पूनर्रचना. दोन्ही विभागांची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन विभागाकडील अर्थसंकल्पीय विषय व पदे वित्त विभागाकडे हस्तांतरित होणार. (नियोजन विभाग)
किमान आधारभूत किंमत योजनेत २०२४-२५ हंगामातील खरेदी करण्यात आलेल्या धान व भरडधान्य वाहतूक खर्चाकरिता ३२८ कोटी ४७ लाख रुपयांच्या तरतूदीस मंजुरी ( अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग)
००००
Monday, 17 August 2026
विशेष लेख मृद व जलसंधारण धोरणात तरुणाईचा डिजिटल पुढाकार!
विशेष लेख
मृद व जलसंधारण धोरणात तरुणाईचा डिजिटल पुढाकार!
महाराष्ट्राच्या कृषी, पर्यावरण आणि आर्थिक स्थिरतेचा मुख्य आधार म्हणजे माती आणि पाणी. राज्यातील खालावलेली भूजल पातळी, वाढती पाणीटंचाई आणि हवामान बदलामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राज्य शासनाने मृद व जलसंधारणाचे धोरण अधिक व्यापक पद्धतीने राबवण्याचा संकल्प केला आहे. जलसंधारणाच्या चळवळीला लोकसहभागाची जोड देणारे हे शासन धोरण राज्याच्या शाश्वत विकासाचा आणि भविष्यातील पाणी सुरक्षेचा भक्कम पाया ठरत आहे.
या धोरणांतर्गत माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकररावजी नाईक यांच्या जलसंधारण क्षेत्रातील ऐतिहासिक योगदानाचा गौरव करत त्यांचा जन्मदिवस, २१ ऑगस्ट, हा 'जलसंधारण दिन' म्हणून घोषित करण्यात आला आहे. हे धोरण एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता १५ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट दरम्यान 'जलसंधारण सप्ताह' आणि १५ ऑगस्ट ते २६ जानेवारी दरम्यान व्यापक 'जलसंधारण अभियान' राबविण्यात येणार आहे.
कोणत्याही योजनेची यशस्विता ही लोकसहभागावर अवलंबून असते. जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी न राहता ती प्रत्येक नागरिकाची चळवळ व्हावी, यासाठी विशेष धोरण राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर २१ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 'Maha Walkathon-Walk for Water ' चे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय आधुनिक काळात तरुणाईला या अभियानात सक्रिय करण्यासाठी इंस्टाग्रामवर 'रील फॉर सॉईल ॲन्ड वॉटर कंजर्वेशन' ही राज्यव्यापी स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. स्पर्धेच्या माध्यमातून १ लाख युवक आणि १ लाख रील्सच्या माध्यमातून डिजिटल लोकचळवळ उभारून जलसंधारणाचा संदेश घरोघरी पोहोचवणे, हे या धोरणाचे वैशिष्ट्य आहे.
त्याचप्रमाणे शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला स्पर्धा, 'जलदूत' घोषणा आणि 'एक शाळा - एक शोषखड्डा' यांसारख्या धोरणात्मक उपक्रमांद्वारे बालवयातच जलसाक्षरता निर्माण केली जात आहे. ग्रामीण व शहरी भागांत 'एक पेड माँ के नाम', अमृत सरोवर स्वच्छता आणि शोषखड्ड्यांची निर्मिती यासारखी प्रत्यक्ष कामे केली जात आहेत. या अभियानाची अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विविध शासकीय विभागांचा समन्वय साधण्यात येत आहे.शासकीय धोरणांची यशस्वी अंमलबजावणी आणि त्याला मिळणारा जनसमुदायाचा प्रतिसाद यातूनच दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार होऊ शकते.
'पाणी अडवा, पाणी जिरवा ' हा केवळ नारा न राहता प्रत्येक नागरिकाची जीवनशैली बनविणे, हेच या शासन धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. चला, शासनाच्या या महत्त्वपूर्ण अभियानात सक्रिय सहभागी होऊया आणि जलसमृद्ध व समृद्ध महाराष्ट्राच्या निर्मितीत आपले योगदान देऊया!
अपर्णा यावलकर
सहायक संचालक (माहिती )
नागपूर
माती वाचवा, पाणी जपा आणि सुरक्षित भविष्य घडवा 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा करणार विभागात जलसंधारण सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
माती वाचवा, पाणी जपा आणि सुरक्षित भविष्य घडवा
21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन साजरा करणार
विभागात जलसंधारण सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
नागपूर दि. 17 : पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्यासाठी तसेच पावसाच्या पाण्याचे संकलन व भूजल पुनर्भरणाला प्रोत्साहन देण्यासाठी 21 ऑगस्ट हा दिवस जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
जलसंधारण अभियान ही लोक चळवळ व्हावी व प्रत्येक नागरिकाने आपला सक्रिय सहभाग नोंदवावा तसेच यासाठी संकल्प करावा या उद्देशाने नागपूर विभागात 15 ते 21 ऑगस्टपर्यंत जलसंधारण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मृद व जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता अनंत जगताप यांनी आज दिली.
महा वॉकेथान फॉर वॉटर
या उपक्रमाचे 21 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा जलयुक्त महाराष्ट्र घडवा हे वॉकेथॉनचे घोषवाक्य आहे. या उपक्रमामध्ये स्वयंसेवी संस्था, उद्योजक, व्यापारी संघटना विद्यार्थी तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य अभियंता अनंत जगताप यांनी केले आहे.
रिल्स फॉर सॉईल अँड वॉटर कंझर्वेशन
जलसंधारणामध्ये युवकांचा सहभाग वाढावा यासाठी इंस्टाग्राम रील्स स्पर्धा आयोजित करण्यात आली. आहे. स्पर्धेमध्ये 15 ते 30 वयोगटातील युवक व युवती सहभागी होऊ शकतील. स्पर्धेसाठी 30 ते 60 सेकंदाच्या रील तयार करावयाच्या आहेत. यामध्ये माती संवर्धन, पाणीबचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, पाणलोट विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण आदी विषयावर या रील्स तयार करावयाच्या आहेत.
या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या युवकांना जिल्हा स्तरावर महाराष्ट्र युवा जलदूत म्हणून गौरविण्यात येणार असून स्पर्धेतील प्रथम आलेल्या युवकाला 25 हजार रुपये,द्वितीय क्रमांकासाठी पंधरा हजार तर तृतीय क्रमांकासाठी दहा हजार रुपयांचे रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
जलसंधारण अभियानाच्या कालावधीत शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला व पोस्टर्स स्पर्धा तसेच वादविवाद स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. एक शाळा एक शोषखड्डा पाणी बचतीबाबत जन जागृती, जलमित्र व जलदूत घोषित करणे, जलसंधारणाची शपथ तसेच जलसंधारण विषयक विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण विभागाचे प्रादेशिक क्षेत्र मुख्य अभियंता अनंत जगताप यांनी दिली आहे.
Sunday, 16 August 2026
माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती १५ ते १९ ऑगस्टदरम्यान ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ स्पर्धा - स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होणाचे आवाहन
माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी ‘रील’मधून जनजागृती
१५ ते १९ ऑगस्टदरम्यान ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ स्पर्धा
- स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होणाचे आवाहन
मुंबई, दि. १६ : माती आणि जलसंधारणाचा संदेश युवकांपर्यंत तसेच समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत ‘रील फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ ही राज्यस्तरीय रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १५ ते ३० वर्षे वयोगटातील युवक-युवतींना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून १५ ते १९ ऑगस्टदरम्यान रील अपलोड करता येणार आहे
मृद व जलसंधारण विभागाचे https://www.instagram.com/mahawalkathon2026/?hl=en , Facebook- https://www.facebook.com/mahawalkathon2026/,Twitter https://x.com/MahaWalkathon26 हे सोशल मीडिया अकाऊंट आहेत.
स्पर्धकांनी ३० ते ६० सेकंदांची इन्स्टाग्राम रील तयार करून आपल्या पब्लिक इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करायची आहे. रीलच्या सुरुवातीला रीलचा उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत https://www.instagram.com/mahawalkathon2026/?hl=en या इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग करणे तसेच ‘#SaveSoilSaveWater’ हा हॅशटॅग वापरणे बंधनकारक आहे.
स्पर्धेसाठी अधिकृत क्यूआर तयार करण्यात आला आहे. क्यूआर स्कॅन केल्यानंतर नोंदणी रील लिंक सबमिट - जिल्हा निवड→व्हेरिफिकेशन→ सहभाग प्रमाणपत्र अशी सोपी प्रक्रिया आहे. माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन तसेच गावातील यशस्वी मृद व जलसंधारणाची कामे या विषयांवर रील तयार करता येणार आहे.
स्टोरीटेलिंग, ॲक्टिंग, म्युझिक, डान्स, ॲनिमेशन, शॉर्ट फिल्म, बिफोर-आफ्टर आणि ड्रोन व्हिज्युअल्स यांसारख्या सर्जनशील पद्धतींचाही वापर करता येणार आहे. मात्र रीलचा मुख्य संदेश माती आणि पाणी संवर्धनाशी संबंधित असणे आवश्यक आहे.
स्पर्धेचे परीक्षण विषय व संदेश, कल्पकता, प्रभावी सामाजिक संदेश, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता तसेच इन्स्टाग्राम एंगेजमेंट या निकषांवर करण्यात येणार आहे. केवळ लाईक्स किंवा फॉलोअर्सच्या आधारे विजेत्यांची निवड केली जाणार नाही. तर संदेश महत्वाचा असणार आहे.
जिल्हास्तरावर प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. याशिवाय विजेत्यांना ‘युवा मृद- जलदूत’ म्हणून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार असून उत्कृष्ट सहभागींना ई-सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.
युवक, विद्यार्थी, इन्स्टाग्राम क्रिएटर्स, यूट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन माती आणि पाणी संवर्धनाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.
००००
मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर साईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत युवकांनी सहभाग घ्यावा १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताह रील्स स्पर्धेचे आयोजन
मृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर साईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत युवकांनी सहभाग घ्यावा
१५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताह रील्स स्पर्धेचे आयोजन
नागपूर, दि. १५ - मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या जलसंधारण सप्ताह दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यात मृद व जलसंवर्धन ‘रील्स स्पर्धेचे ‘आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींच्या कल्पकतेचा उपयोग करुन इनस्टाग्राम (Instagram) च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी रील फॉर साईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या रील स्पर्धेत राज्यातील युवक - युवतींनी उत्सफूर्त सहभागी घ्यावा, असे आवाहन करण्यात येतआहे.
माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर, जलसंधारणाची शपथ असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. जलसंधारण सप्ताह दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यात मृद व जलसंवर्धन रील्स स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
रील स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावर आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचा पात्र वयोगट १५ ते ३० वर्षे असा ठेवण्यात आला आहे. प्रत्येक स्पर्धकाने ३० ते ६० सेकंदांची Instagram Reel तयार करावी. व्हिडीओ/ रिलच्या सुरुवातीला व्हिडीओ / रिलचा उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव, जिल्ह्याचे नाव नमूद सहभागी स्पर्धकांनी करणे आवश्यक आहे. स्पर्धाकांने Reel स्वतःच्या Public Instagram Account वर पोस्ट करावी. स्पर्धकांनी मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत Instagram Account ला Tag करणे बंधनकारक राहील. यासाठी अधिकृत हॅशटॅग #Save Soil Save Water वापरणे अनिवार्य राहणार आहे.
रिल्स बनवण्यासाठी विषय
माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे, पारंपरिक मृद व जलसंधारण पद्धती, माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना, आजचे संवर्धन उद्याचे सुरक्षित भविष्य असे रील्स बनवण्यासाठी विषय देण्यात आले आहेत.
रील्स करीता गुणांकन पद्धती पुढील प्रमाणे असणार आहे. विषय व संदेश - ३० गुण, कल्पकता -२५ गुण, प्रभावी सामाजिक संदेश - २० गुण, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्ता - १५ गुण, Instagram Engagement - १० गुण असे एकूण - १०० गुण असणार आहेत. केवळ Likes किंवा Followers वर विजेता निश्चित न करता तज्ज्ञ परीक्षण आणि Social Media Engagement या दोन्हींचा समतोल ठेवण्यात येणार आहे. गुणांकानुसार विजेत्याची निवड करण्यात येईल.
विजेत्यांना बक्षीस
राज्यासाठी एकच अधिकृत हॅशटॅग #SaveSoilSaveWater वापरण्यात येणार असून, प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५० रिल्स आणि राज्यभरातून १० हजार रिल्सचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या माध्यमातून लाखो नागरिकांपर्यंत डिजिटल स्वरूपात मृद व जलसंधारणाचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. रिल स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यात प्रथम पुरस्कार ₹२५ हजार व गौरवचिन्ह, द्वितीय पुरस्कार ₹१५ हजार व गौरवचिन्ह आणि तृतीय पुरस्कार ₹१० हजार व गौरवचिन्ह प्रस्तावित आहे. पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र तसेच विजेत्यांना विशेष “युवा मृद-जलदूत” म्हणून गौरविण्यात येणार आहे. "एक Reel... मातीसाठी !, एक Reel... पाण्यासाठी !, एक Reel... सुरक्षित भविष्यासाठी !" हा रिल्स प्रचारासाठी मुख्य संदेश आहे.
0000
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर २१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर
२१ ऑगस्ट जलसंधारण दिनी राज्यभर आयोजन
नागपूर, दि. १५ - शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" (Maha Walkathon-Walk for Water) या उपक्रमाचे असून मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची थीम सेव सॉईल, सेव वॉटर, सीक्यूर टूमारो ( Save Soil, Save Water, Secure Tomorrow) अशी असून पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा हे घोषवाक्य आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात २१ ऑगस्ट रोजी कमाल ३ किलोमीटर (महा वॉकेथॉन) चालणे आणि मृद व जलसंधारणाची शपथ घेणे असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे.
माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंती निमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारण हे आवश्यक असून त्याचे महत्त्व पटवून देण्याकरिता राज्यात १५ ते २१ ऑगस्ट, २०२६ दरम्यान "जलसंधारण सप्ताह" आणि १५ ऑगस्ट, २०२६ ते २६ जानेवारी, २०२७ दरम्यान "जलसंधारण अभियान" आयोजित करण्यात येत आहे. तर २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत "महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर" (Maha Walkathon-Walk for Water) या उपक्रमाचे आयोजन करुन जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरुप देण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले असून मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या लोकचळवळीत राज्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी
राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथे होणार असून प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमाच्या आयोजनाचे प्रमुख जिल्हास्तरीय मृद व जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी हे असणार आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सर्व मंत्री, सर्व राज्यमंत्री, राज्यसभा/ लोकसभा/ विधानपरिषद/ विधानसभा सदस्य, सर्व जिल्हापरिषद अध्यक्ष/उपाध्यक्ष, सर्व मा. महापौर / उपमहापौर, सर्व नगराध्यक्ष/उपनगराध्यक्ष, सर्व जिल्हापरिषद / पंचायत समिती / ग्रामपंचायत सदस्य, सर्व महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत सदस्य आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.
सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, सर्व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्यातील नामांकित व प्रतिष्ठीत व्यक्ती / डॉक्टर / कलाकार/ उद्योजक, जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, माय भारत, नेहरु युवा केंद्र, भारत स्काऊट्स अँड गाईड्स, रेड क्रॉस, होमगार्ड, स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब सदस्य, लायन्स क्लब सदस्य, रनिंग क्लब सदस्य, सायकलिंग क्लब सदस्य, उद्योग व व्यापारी संघटना, सीएसआर भागीदार कंपन्या, विविध क्रीडा संघटना, गुड मॉर्निंग ग्रुप्स, विविध व्यायाम शाळा, स्वयंसेवी संस्था, महिला, राज्याचे नागरिक यांना सहभागी करण्यात येणार आहे.
महा वॉकेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर आधारित ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन मध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. तर प्रथम दहा विजेत्यास जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सोशल मीडियासाठी #MahaWalkathon, #WalkForWater, #SaveSoilSave Water हे हॅशटॅग वापरण्यात याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
Subscribe to:
Posts (Atom)

























