Friday, 15 November 2019

तिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पंचायत समितीसाठी 8 डिसेंबरला मतदान


मुंबई, दि. 15 (रा.नि.आ.): अमरावती जिल्ह्यातील तिवसा, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या तीन पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 8 डिसेंबर 2019 रोजी मतदान; तर 9 डिसेंबर 2019 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
श्री. मदान यांनी सांगितले की, या पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. त्यांची छाननी 25 नोव्हेंबर 2019 रोजी होईल. छाननीनंतर त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायाधिशांकडे 28 नोव्हेंबर 2019 पर्यंत अपील दाखल करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी 30 नोव्हेंबर 2019 रोजी; तर अपील असलेल्या ठिकाणी 4 डिसेंबर 2019 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 8 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 9 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.
०-०-०

‘आपलं मंत्रालय’चा दिवाळी अंक प्रकाशित


मुंबई, दि. 15 : ‘आपलं मंत्रालय’च्या ‘दीपोत्सव’ या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक (वृत्त/ माहिती) सुरेश वांदिले, उपसंचालक (वृत्त) गोविंद अहंकारी, उपसंचालक अनिरूध्द अष्टपुत्रे, वरिष्ठ सहायक संचालक कीर्ती पांडे आदी उपस्थित होते. श्री. चहांदे हे या अंकाचे अतिथी संपादक आहेत.
या विशेषांकामध्ये मंत्रालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांनी लिहिलेल्या दर्जेदार लेखांची मेजवानी आहे. ‘आपलं मंत्रालय’च्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेच्या विजेत्यांच्या साहित्याचा यात समावेश करण्यात आला आहे. अंकातील कथा, कविता, लेख, अनुभव, छायाचित्र यांची सुरेख गुंफण वाचकांना खिळवून ठेवते. याशिवाय हास्यविनोद, व्यंगचित्रे, पाककृती यामुळे हा अंक अधिक अधिक वाचनीय व संग्राह्य झाला आहे.  
‘आपलं मंत्रालय द्वितीय वर्धापनदिन स्पर्धेचे विजेते
‘आपलं मंत्रालय’च्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या साहित्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविधांगी आणि बहुढंगी विषयांवरील लेख, कथा, अनुभव, कविता या स्पर्धेसाठी प्राप्त झाले. परीक्षणाच्या विविध टप्प्यांवर आणि कसोट्यांवर पडताळणीनंतर प्रथम पाच क्रमांक काढण्यात आले आहेत, तर ‘पर्सन ऑफ द आपलं मंत्रालय’हा पुरस्कार किरण शार्दुल यांना जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
कथा स्पर्धा :1) सलाईन - सुधीर वेदपाठक, कक्ष अधिकारी, जलसंपदा विभाग, 2) टेलर - भरत लब्दे , सहायक कक्ष अधिकारी, विधि व न्याय विभाग, 3) दाटुनी कंठ - मानसिंग उ. पाटील, सहायक कक्ष अधिकारी, कृषी व पदुम विभाग, 4) शकुंतला - सारिका निलेश चौधरी, सहायक कक्ष अधिकारी, विधि व न्याय विभाग 5) भूक एक? (प्रश्‍नचिन्ह) - दिवाकर मोहिते, लिपिक टंकलेखक, शासकीय मुद्रणालय.
लेख स्पर्धा : 1) किरण शार्दूल - कार्यासन अधिकारी, सामान्य प्रशासन.विभाग, 2) सारिका निलेश चौधरी - विधी व न्याय विभाग, 3) अतुल नरहरी कुलकर्णी - कक्ष अधिकारी, वित्त विभाग
छायाचित्र स्पर्धा : 1) फ्लेमिंगो - दुर्गाप्रसाद मैलावरम, अवर सचिव, गृहनिर्माण विभाग
2) काळ्या डोळ्याचा हळद्या - प्रशांत वाघ, कक्ष अधिकारी, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग 3) वरदहस्त - नंदकिशोर नीलम साटम, प्रकल्प अधिकारी, पर्यावरण माहिती प्रणाली केंद्र 4) पक्ष्यांची छायाचित्रे - पंकज कुंभार, वन विभाग 5) कास पठार - महादेव शांताराम मगर, लिपिक टंकलेखक, गृह विभाग
अनुभव स्पर्धा : 1) मेगाब्लॉक - किरण शार्दूल, कार्यासन अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग 2) अविस्मरणीय - पद्मजा श्रीपाद पाठक, प्रधान सचिवांचे स्वीय सहायक, सामान्य प्रशासन विभाग 3) तीन दृश्ये - चित्रा धनंजय चांचड, कक्ष अधिकारी, वित्त विभाग 4) ओली भेळ - महेश पांडुरंग पाटील, लिपिक टंकलेखक, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग 5) धडा - प्रियंका बापर्डेकर, सहायक कक्ष अधिकारी, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग.
कविता स्पर्धा : 1) पूर - सुरेश नाईक, अवर सचिव, मृदा व जलसंधारण विभाग 2) गहिर्‍या रात्री - मानसिंग उ. पाटील, सहायक कक्ष अधिकारी, कृषी व पदुम विभाग 3) पिल्लासाठी - वृषाली सचिन चवाथे, कक्ष अधिकारी, मुख्यमंत्री कार्यालय 4) विनाकारण फसतो मी - संजीव केळुस्कर, उप-सचिव, सामान्य प्रशासन विभाग 5) पाऊस - शैला जंगम, सहायक कक्ष अधिकारी, जलसंपदा विभाग.
0000

लोकनायक बिरसा मुंडा यांना राज्यपालांचे अभिवादन


मुंबई, दि. 15 : क्रांतिकारी स्वातंत्र्यसेनानी लोकनायक बिरसा मुंडा यांच्या १४४ व्या जयंती निमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता तसेच राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार उपस्थित होते.
आदिवासी व ग्राम विकास विभागातर्फे सादरीकरण
आदिवासी विकास विभाग तसेच ग्रामविकास विभागांतर्फे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आज आदिवासी विकास योजनांसंदर्भात विस्तृत माहितीचे सादरीकरण करण्यात आले.
राज्याच्या एकुण लोकसंख्येच्या ९.३५ टक्के अनुसूचित जमातीची लोकसंख्या असून अनुसूचित क्षेत्रात आदिवासी उपयोजना राबविली जाते. आदिवासी विकासासाठी उपलब्ध नियतव्ययापैकी मोठा खर्च आदिवासी शिक्षण व आरोग्य क्षेत्रासाठी केला जात असल्याची माहिती प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी दिली. राज्यपालांच्या सूचनेनुसार राज्याच्या अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना पाच टक्के निधी थेट दिला जातो. गेल्या ४ वर्षांमध्ये राज्यातील पेसा ग्रामपंचायतींना एकूण ८७७.४३ कोटी रु निधी देण्यात आला. या निधीतून ग्रामपंचायती आपल्याला आवश्यक त्या योजना सुरु करू शकतात, अशी माहिती असीम कुमार गुप्ता यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाची राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने प्रशंसा केली असल्याचे मनिषा वर्मा यांनी सांगितले.  
००००

बालकामगार उच्चाटन ही सामूहिक जबाबदारी - अप्पर कामगार आयुक्त विजयकांत पानबुडे


            नागपूर,दि.15: समाजामध्ये बालकामगार असणे हा समाजावरील कलंक असून  देशाच्या अर्थव्यवस्थेतील अडसर आहे. कुटुंबाच्या दारिद्र्याचा भाग मुलांच्या वाट्याला येऊन ते समाजाच्या मुख्य प्रवाहातून दूर होतात. या अनिष्ट प्रथेला समाजातून दूर करण्याची नागरिकांची सामुहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन अप्पर आयुक्त विजयकांत पानबुडे यांनी केले.
            याप्रसंगी सहाय्यक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे हे  प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त मा.पे.मडावी, दिनेश ठाकरे, तुळसानंद बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे महासचिव डी.ए. गोळे व इतर कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
            बालकामगारांच्या अनिष्ट प्रथेमुळे बालकांचा शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक विकास खुंटतो. या अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी कामगार मुंबई यांच्या वतीने दिनांक 7 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या जनजागृती अभियानाची सुरुवात नुकतीच स्वाक्षरी मोहिमेने करण्यात आली. या स्वाक्षरी मोहिमेचे उद्घाटन गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानक येथे अप्पर कामगार आयुक्त विजयकांत पानबुडे यांनी बोर्डवर स्वाक्षरी करुन केले.
*****