Wednesday, 13 May 2020

औद्योगिक वसाहतीतील सर्व उद्योग सुरु करावे - डॉ. नितीन राऊत




औद्योगिक वसाहतीतील सर्व उद्योग सुरु करावे
                                                       - डॉ. नितीन राऊत

       नागपूर, दि.13 : कोरोना विषाणूच्या संकटामुळे काही कालावधीसाठी थांबविण्यात आलेले उद्योग सुरु करण्यात यावे. नागपूर परिक्षेत्रातील बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर या औद्योगिक वसाहतीतील उद्योग पुन्हा सुरु करुन उत्पादन निर्मिती करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिले.
            लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उद्योग क्षेत्र, आरोग्य विभाग तसेच तत्सम संबधित विभागांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी डॉ. राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.  विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, ग्रामीण पोलिस अधीक्षक राकेश ओला, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डी.एम. पंचभाई आदी यावेळी उपस्थित होते.
            आगामी पावसाळयाचे दिवस लक्षात घेता शहरातील नाग नदीसह सर्व सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाले तुंबणार नाहीत, यासाठी साफसफाईची कामे सुरु करण्यात यावी. आरोग्य विभागाने स्वच्छता व र्निजंतुकीकरण करावे व साथीचे आजार उदभवणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश यावेळी दिले. कोराना विषाणूच्या प्रसाराबाबत सर्तकता बाळगतांना जनतेमध्ये जागृती करण्यासाठी विशेष मोहिम राबवावी. अलगीकरण करुन वाढत असलेल्या कोरोना संशयित रुग्णांसाठी पर्यायी व्यवस्था करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिलेत.
            लॉकडाऊनमुळे महाराजबाग प्राणी संग्रहालय बंद आहे. येथील प्राण्यांच्या सुरक्षा व आरोग्यासाठी तसेच त्यांची सुव्यवस्था ठेवण्यासाठी अनुदानाची निकड आहे. याबाबतचा प्रस्ताव पंजाबराव कृषी विद्यापीठामार्फत सादर करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. येथील प्राण्यांसाठी दत्तक योजना’ राबविण्यात येत असून यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद मिळत असल्याचे श्री.पंचभाई यांनी सांगितले.   
            जीवनावश्यक वस्तुंची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही व किंमतीवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले. शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी योग्य उपचार मिळत आहे. यासाठी आरोग्य व पोलिस विभाग अहोरात्र परिश्रम घेत आहेत. जनतेनेही सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
                                                                  ******

Tuesday, 5 May 2020

बेरोजगारांना आधार कार्ड ऑनलाइन लिंक करण्याचे आवाहन




नागपूर, दि. 5 : राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाइन लिंक करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्र. गं. हरडे यांनी केले आहे.
नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना सर्व सेवा सुविधा वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाइन देण्यात येत आहे. राज्यभरात वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध रोजगार मेळाव्याची सर्व माहिती मिळविणे व त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळविणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे व सहभाग घेणे, आपली शैक्षणिक पात्रता वाढ करणे, पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल यामध्ये दुरुस्ती करणे, वेगवेगळ्या उद्योजकांनी वेळोवेळी अधिसूचित केलेली रिक्त पदांची माहिती मिळवून उमेदवारीचा अर्ज सादर करणे आदी बाबींचा  त्यात समावेश करण्यात आला आहे.
उद्योजकांनी वेळोवेळी गरज व मागणीनुसार डाऊनलोड केलेल्या उमेदवारांचा याद्यांमध्ये समावेश होण्यासाठी नोंदणीस आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. आधार कार्ड लिकं न केल्यास उमेदवारांना विविध योजनांचा लाभ घेता येणार नाही. उमेदवाराने विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर वर जाऊन आपल्या नोंदणी क्रमांकाला तात्काळ आधार कार्ड ऑनलाईन लिंक करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.
****

कलमापन व अभिक्षमता चाचणीचा अहवाल पोर्टलवर उपलब्ध





नागपूर, दि. 5 :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये घेण्यात आलेल्या कलमापन व अभिक्षमता चाचणी मोबाईल आणि संगणकाद्वारे घेण्यात आली. या चाचणीचा अहवाल दिनांक 1 मे 2020 पासून मंडळाच्या www.mahacareermitra.in या पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी कृषी, कला व मानव्यविद्या, वाणिज्य, ललित कला, आरोग्य व जैविक विज्ञान, तांत्रिक आणि गणवेशधारी सेवा या सात क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे कल जाणून घेण्यासाठी घेण्यात आली. विद्यार्थी त्याच्या एस. एस. सी. बोर्ड बैठक क्रमांकाच्या आधारे त्याचा कल, अभिक्षमता चाचणी अहवाल प्राप्त करु शकतात. त्यासाठी www.mahacareermitra.in या पोर्टलवर जाऊन मुख्य पृष्ठावर त्यांनी आपला बैठक क्रमांक नमूद केल्यानंतर त्यांना त्यांचा अहवाल मिळू शकेल.
 विद्यार्थ्यांना त्यांचा कल कोणत्या क्षेत्रामध्ये आहे हे जाणून घ्यायला, कलचाचणी व्हिडिओवर पाहू शकतात. त्याच बरोबर त्यांचा कल असलेल्या कलक्षेत्रात पुढील शिक्षणासाठी त्यांच्या क्षमता पुरेशा आहेत काय याबाबत आपली अभिक्षमता विद्यार्थी जाणून घेवू शकतात.
कल अभिक्षमता चाचणी सत्र 2020  मध्ये  राज्यातील 22,478 शाळांमधून इयत्ता 10 वीच्या 15,76,926 विद्यार्थ्यांची कल अभिक्षमता चाचणी मोबाईल आणि कॉम्प्यूटरच्या माध्यमातून घेण्यात आली होती. 19.3 टक्के विद्यार्थ्यांनी 7 कल क्षेत्रांपैकी ‘गणवेशधारी सेवा’ आणि 17.7 टक्के ‘ललितकला’ या क्षेत्रांना पहिले प्राधान्य दिले. 20 टक्के मुलांचा पहिला प्राधान्य कल ‘गणवेशधारी सेवा’ क्षेत्रात आणि 19.8 टक्के मुलींचा पहिला प्राधान्य कल     ललितकला या क्षेत्रामध्ये आहे. 16.8 टक्के विद्यार्थ्यांचे ‘वाणिज्य’ हे कल क्षेत्र दुसरे प्राधान्य आहे. 16.1 टक्के मुलींचे ‘तांत्रिक’ आणि 16 टक्के ‘वाणिज्य’ ही दुसरी प्राधान्य असलेली कल क्षेत्रे आहेत.
महाराष्ट्रामधील 9 विभागांपैकी 6 विभागांमध्ये गणवेशधारी सेवा आणि 2 विभागांमध्ये ललितकला या क्षेत्रांना पहिले प्राधान्य असून 9 पैकी 8 विभागांमध्ये ‘वाणिज्य’ या कला क्षेत्राला दुसऱ्या क्रमांकाचे प्राधान्य असल्याची माहिती मंडळाचे विभागीय सचिव रविकांत देशपांडे यांनी दिली आहे.
****

राज्यातील व परराज्यातील परवानगीबाबत निर्णय दिनांक 6 मे पासून कळविण्यात येईल--रविंद्र ठाकरे



* - पास प्रणाली अर्जाबाबत 8 मे पासून निर्णय
                               * प्रवास परवानगीबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांच्या परवानगी नंतरच  मंजुरी

       नागपूर, दि. 5 :  राज्यातील  इतर जिल्ह्यात तसेच  बाहेरच्या राज्यातील  जिल्ह्यात प्रवासाच्या  परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज  केले त्याची परवानगीबाबत 6 मे रोजी कळविण्यात येईल, तसेच ई- पास संदर्भात दिनांक 2 मे नंतर च्या अर्जाबाबत 8 मेपासून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार परवानगीचा अर्ज ज्या जिल्ह्यासाठी आहे त्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता  घेतल्यानंतर  परवानगी देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
            परवानगी मिळण्याबाबतच्या अर्जामध्ये 4 हजार 490 अर्ज शासनाच्या वाहन व्यवस्था करावी याबातचे आहेत, रेल्वेची व्यवस्था झाल्यावर मोबालवर अर्जदारास कळविण्यात येणार आह. स्वतःच्या वाहनाने जाण्याबाबत 2 हजार 472 अर्ज प्राप्त झाले आहेत, यापैकी 83 अर्ज नागपूर शहरातील कॅन्टोन्मेंट झोनमधील असल्यामुळे रद्द करण्यात आले आहे. 226 अर्जदारांनी नागपूर येथील त्याचा पत्ता नमूद केला नाही व अपूर्ण आहे. 
            उर्वरित 2 हजार 153 अर्जामध्ये ते ज्या जिल्ह्यात जाणार आहेत त्याबाबत  संबंधित जिल्हाधिकारी याचे सोबत पत्रव्यवहार करण्यात आला. या 2 हजार 153 अर्जदारांना  दिनांक 6 मे रोजी  महानगरपालिका क्षेत्रात जिल्हाधिकारी कार्यालय येथील सेतू  अथवा तहशील कार्यालय मधून परवानगीचे वितरण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील 862 अर्जदाराच्या परवानगीचे वितरण संबंधित तहसीलदार कार्यालयातून केल्या जाणार आहे.
            परवानगीसाठी  महाराष्ट्र पोलीस ई- पास प्रणालीवर ज्या अर्जदारांनी नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या बाहेरील क्षेत्रातून अर्ज केले आहे, त्याबाबत  ऑनलाईन दिनांक 8 मे पासून कळविण्यात येईल असे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी कळविले आहे.
****